सीविक मिरर ब्यूरो
feedback@civicmirror.in
जबरी चोरीच्या उद्देशाने घरात घुसून पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकारी विनय ओहोळ यांच्या पत्नी शीतल यांचा खून करणाऱ्यास अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनाविली आहे. निगडी प्राधिकरण येथे २०११ मध्ये ही घटना घडली होती.
शीतल विनय ओहोळ (वय ३२, रा. सेक्टर २६, निगडी प्राधिकरण) यांचा खून केल्याप्रकरणी लक्ष्मण प्रभू वाघ (रा. गणेश तलाव, आकुर्डी, मूळ रा. मु. पो. फुलारवाडी ता. पाथरी, जि. परभणी) याला वडगाव मावळ सत्र न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच पाच हजार रुपये दंड, पुरावा नष्ट करणे या गुन्ह्यासाठी तीन महिने साधा कारावास आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यासाठी सात वर्षे सक्षम कारावास व तीन हजार रुपये दंडाची अशी शिक्षा सुनावली असल्याची माहिती विशेष सरकारी वकील लीना पाठक यांनी दिली. शीतल ओहोळ या घरात एकट्या असताना २६ ऑगस्ट २०११ रोजी दुपारच्या सुमारास आरोपी त्यांच्या घरात आला होता. तेव्हा त्याने तुमच्या पतीने मला बगीचाचे काम करण्यासाठी पाठविल्याचे सांगितले होते. शीतल यांचे पती विनय हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत अधिकारी आहेत. ते महापालिकेत गेल्यानंतर काही वेळाने लुटण्याच्या उद्देशाने लक्ष्मण हा घरी आला होता. त्यामुळे शीतल यांनी पती विनय यांना फोन करून, तुम्ही बगीचाचे काम करण्यासाठी कोणाला पाठविले आहे का, याची विचारणा केली होती. त्यावर मी कोणालाही पाठविले नसल्याचे पतीने सांगताच काही सेकंदात शीतल यांचा मोबाईल बंद झाला होता. पतीने तुम्हाला पाठविलेले नाही. तुम्ही कोण अशी विचारणा करताच लक्ष्मण याने शीतल यांचा मोबाईल बंद करून, त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यात धारदार शस्त्राने वार केले होते. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शीतल यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा २ लाख १४ हजार रुपये किमतीचा ऐवज लुटून लक्ष्मण पसार झाला होता.
पत्नीचा फोन लागत नसल्याने आणि आसपासचे लोकही कामानिमित्त घरी नसल्याने विनय हे काळजीने घराकडे आले असता त्यांना एका परिचिताने आतून कोणी दार उघडत नसल्याचे सांगितले होते. तसेच त्यानंतर तत्काळ त्या परिचिताने पोलिसांना घटनास्थळी पाचारण करून, शीतल यांना नजिकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले होते. तेथे उपचारादरम्यान शीतल यांचा मृत्यू झाला होता. ओहोळ दाम्पत्याची मुले शाळेत गेल्याने या हल्ल्यातून ते बचावले होते. या सर्व घटनेनंतर विनय ओहोळ यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तेव्हा गुन्ह्याचा तपास तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक तथा निवृत्त सहायक पोलीस आयुक्त राम जाधव यांनी केला होता.
गुन्ह्याचा तपास करत असताना लक्ष्मण वाघ हा शीतल ओहोळ यांच्या घरासमोर असलेल्या महादेवाच्या मंदिरात अनेकदा बराच वेळ विनाकारण बसत होता, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा आकुर्डी, प्राधिकरण परिसरात शोध घेतला परंतु तो सापडला नव्हता. त्यामुळे पोलिसांच्या एका पथकाने त्याच्या मूळ गावी जाऊन त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. घटनेनंतर २४ दिवसात पोलिसांनी लक्ष्मण वाघ याला १९ सप्टेंबर २०११ ला अटक करून त्याच्याकडून लूटमारीचा सर्व ऐवज जप्त केला होता. सहायक पोलीस आयुक्त राम जाधव यांच्यासह पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक फौजदार किरण आरुटे, हवालदार सतीश कुदळे, दादा जगताप यांनी आरोपीला अटक केली होती. तसेच लक्ष्मण याला कडक शिक्षा होण्यासाठी वेळोवेळी न्यायालयाचे आवश्यक कामकाज पोलीस अंमलदार अल्ताफ आणि बाळू तोंडे यांनी काम पाहिले होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.