क्रोधो नाशयते सर्वं...
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
सहायक पोलीस आयुक्त असलेल्या काकाने काकूवर केलेल्या गोळीबाराचा आवाज ऐकून व्यवसायाने वकील असलेल्या पुतण्याने मास्टर कीने बेडरूमचे दार उघडून आत्महत्या करणाऱ्या काकाला वाचविण्याचा केलेला प्रयत्न त्याच्याच जिवावर बेतला. काकाने सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आधी पत्नीचा खून केला आणि अडविणाऱ्या पुतण्यालाही गोळ्या घालून नंतर स्वत:च्याही डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली. बाणेर भागात सोमवारी (दि. २४) भल्या पहाटे घडलेल्या घटनेने शहर हादरून गेले.
सध्या अमरावती येथील राजापेठ विभागात नियुक्तीस असणारे सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड (वय ५७) हे बाणेर येथील कुटुंब राहात असलेल्या घरी आले होते. रात्री जेवण करून बेडरूममध्ये गेल्यावर पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी पत्नी मोनी गायकवाड (वय ४४) यांच्यावर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांचा पुतण्या ॲड. दीपक गायकवाड (वय ३५) हा आणि गायकवाड यांचा मुलगा बेडरूमच्या दिशेने धावले, पण दार आतून बंद होते. त्यामुळे गायकवाड यांच्या बंगल्यातील मास्टर बेडरूममधून मास्टर की आणून दीपकने दार उघडले असता, भारत गायकवाड यांनी संतापाच्या भरात दीपक याच्यावर गोळीबार केला. तेव्हा मुलाला ‘‘तू बाहेर निघून जा,’’ म्हणत स्वत:च्या डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली.
अवघ्या काही मिनिटांत घडलेल्या या भयंकर प्रकाराने गायकवाड कुटुंबीय हादरून गेले. यावेळी गायकवाड यांच्या मुलाने हॉस्पिटलला फोन करून ॲम्ब्युलन्स मागवून घेतली. तेव्हा हॉस्पिटलने ‘‘तुम्ही पोलिसांनाही कळवा,’’ असे सांगत तीन ॲम्ब्युलन्स घटनास्थळी पाठविल्या. दरम्यान, गोळीबार झाला असून, तिघांना गोळ्या लागल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्यात आल्यावर पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस दलात रात्रगस्तीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
अनेक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा फौजफाटा गायकवाड राहात असलेल्या बंगल्यात दाखल झाला. तोपर्यंत तिघांनाही हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. परंतु, तिघांचाही हॉस्पिटलमध्ये पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
गायकवाड हे १९८९ मध्ये फौजदार म्हणून पोलीस खात्यात भरती झाले होते. त्यांची पहिली नियुक्ती मुंबई येथील आरपीएफ पोलीस ठाण्यात झाली होती. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक होईपर्यंत गायकवाड यांनी सर्व नोकरी मुंबई येथेच केली. मुंबईतील अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त म्हणून त्यांची अमरावती शहर येथे बदली झाली होती.
वाडिया कॉलेजचे विद्यार्थी असलेले गायकवाड हे मूळचे पुणेकरच होते. त्यांच्याबरोबर फौजदार म्हणून भरती होऊन सहायक पोलीस आयुक्त पदावरून अनेक जण निवृत्त झाले आहेत. गायकवाड हे पुढील वर्षी निवृत्त होणार होते. ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ दया नायक यांनी निरीक्षक म्हणून पोलीस दलात पुन्हा प्रवेश केल्यानंतर त्यांनी काही काळ गायकवाड यांच्याबरोबर काम केले होते.
गायकवाड यांचा एक मुलगा चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहे, तर एक मुलगा मॉडिफाईड कार व्यवसायाशी निगडित आहे. निवृत्तीच्या तोंडावर अशी घटना घडल्याने संपूर्ण गायकवाड कुटुंबीय आणि त्यांचे मित्र हादरून गेले आहेत.
पुणे शहराचे आयुक्त रितेशकुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच गायकवाड यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची चौकशी केली. त्याचबरोबर दोघांचा खून करून आत्महत्या करण्यापर्यंत असे काय घडले, याचा सर्वांगीण तपास करण्याच्या सूचना आयुक्त रितेशकुमार यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे यांना दिल्या.
नियंत्रण कक्षाचे कॉल हिंजवडीला
गोळीबार झाल्याची घटना घडल्यानंतर या बाबतची माहिती पोलीस नियंत्रण कक्षावरून पुणे शहरासोबतच पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी पोलिसांनाही देण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय होण्यापूर्वी येथील उपायुक्तांकडे चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचा भाग येत होता. तसेच एकच आयुक्तालय असल्याने आजही या भागातील नियंत्रण कक्षाला करण्यात आलेले अनेक फोन पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे वर्ग होत आहेत. त्यामुळे सहायक आयुक्तांनी गोळीबार केल्याचा प्रकार हिंजवडी पोलिसांना कळवून त्यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.