केपीचे झाले मड आयलंड
विजय चव्हाण
महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची पावसाळापूर्व खोदकामे १५ मे पर्यंत पूर्ण करून रस्ते पूर्ववत करण्यास यंदा प्राधान्य दिले होते. जलवाहिन्यांची आणि त्याचप्रमाणे शहराच्या जुन्या भागांत जीर्ण झालेल्या सांडपाणी वाहिन्या बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले गेले होते. रस्ते खोदल्यानंतर १ जूनपर्यंत त्याचे पुनर्डांबरीकरण किंवा डागडुजी करावी असे आदेश देण्यात आले होते. मात्र उच्चभ्रू कोरेगाव पार्क त्याला अपवाद ठरले आहे. ऐन जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाळी वाहिन्या टाकण्याचे काम साऊथ मेन रोडच्या 'जी' लेनमध्ये रस्ता आणि मलनि:सारण विभागाने सुरू केले आहे. तातडीने काम संपवण्याऐवजी ठेकेदाराने गेले १५ दिवस काम बंद ठेवून राडारोडा तसाच ठेवला आहे. पावसामुळे त्याचा चिखल आता पूर्ण परिसरात पसरल्याने ‘‘पॉश कोरेगाव पार्कचे अक्षरश: 'मड' आयलँड झाले आहे,’’ अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
आजूबाजूला असलेले रहिवासी बंगले आणि सोसायट्यांपर्यंत हा चिखल आणि राडारोडा पोहोचल्याने स्थानिक संतप्त झाले होते. रहिवाशांनी बुधवारी (दि. २६) या संदर्भात रस्ता आणि मलनि:सारण विभागाच्या अधिकाऱ्यांना जागेवर बोलावून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. रस्ता उखडला गेल्यामुळे तसेच मोठमोठे सिमेंटचे पाईप रस्त्यावर आणि पदपथावर टाकण्यात आलेले असल्याने नागरिकांना चालणेही कठीण झाले होते. चिखल, राडारोड्यासोबतच पाण्याची डबकी साचल्याने आजूबाजूच्या परिसरात डासांचे साम्राज्य पसरले आहे.
या संदर्भात हवाई वाहतूक तज्ञ स्थानिक रहिवासी धैर्यशील वंडेकर म्हणाले, ‘‘पावसाळापूर्व कामे ऐन पावसाळ्यात सुरू करण्यामागचे गौडबंगाल कळायला मार्ग नाही. भर पावसात कामे सुरू केली तरी ती तातडीने संपवणे अपेक्षित होते, पण ते मुद्दाम रेंगाळत ठेवून संपूर्ण कोरेगाव पार्क परिसरात चिखल निर्माण होईल, याची काळजी घेतली आहे. आम्ही तातडीने अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची कानउघाडणी केली आहे. चिखल लोकांच्या पादत्राणे आणि वाहनांबरोबर घरातही जात आहे. शहरात सर्वाधिक कर भरणाऱ्या लोकांची ही अवस्था दयनीय आहे.’’
‘‘आम्ही पालिकेच्या अधिकाऱ्यांना तातडीने राडारोडा हटवण्याची विनंती केली आहे. तसेच रस्ता दुरुस्तही करण्याची मागणी केली आहे. पाऊस सुरू असल्याने अधिकचे मनुष्यबळ लावून काम तातडीने पूर्ण करावे अशीही मागणी केली आहे. पुढील चार दिवसांत चेंबरचे कामही संपवावे, असा इशारा आम्ही त्यांना दिला आहे,’’ अशी माहिती स्थानिक कार्यकर्ते आणि रहिवासी नितीन मंत्री यांनी दिली.
या समस्येसंदर्भात प्रशासनाची बाजू मांडताना पालिकेच्या मलनि:सारण विभागाचे उपअभियंता अशोक झुळूक म्हणाले, ‘‘स्थानिक नागरिकांच्या मागणीनंतर आम्ही तातडीने धाव घेऊन लोकांना समस्या सोडवण्यासंदर्भात आश्वस्त केले आहे. पावसाळी वाहिन्या टाकल्यानंतर लगेचच रस्ता पूर्ववत केला जाईल. शक्य तितक्या लवकर राडारोडा उचलून रस्ते धुवून स्वच्छ केले जातील.’’
शहरातील पावसाळापूर्व कामांचा आढावा घेत पालिका आयुक्तांनी नालेसफाई २५ मे पर्यंत पूर्ण करण्याची आणि अन्य खोदकामे पूर्ण करण्यासाठी ३० मे पर्यंतची मुदत दिली होती. नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला होता, मात्र वस्तुस्थिती पूर्णत: वेगळी असल्याचे निष्पन्न झाले. तात्पुरते डांबरीकरण किंवा काँक्रिट टाकलेल्या भागांत पावसामुळे रस्त्यावर चिखल साठण्याचे, रस्ते निसरडे झाल्याचे दिसून आले. पालिकेच्या नियोजनशून्यतेचा फटका नागरिकांना सहन करावा लागत असल्याने त्याबाबत पथ विभागासह पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या. अखेर, महापालिकेला खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे लक्षात आले असून, सर्व कामे तातडीने थांबविण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी काढले होते, तरीही कोरेगाव पार्कमधील ही कामे कशी सुरू राहिली, याबाबत नागरिक आश्चर्य व्यक्त करीत होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.