फुगा मारल्याचा जाब विचारला म्हणून केले कोयत्याने वार

रस्त्याने जाताना पाण्याचा फुगा फेकून का मारला याचा जाब विचारला असता तरुणावर आणि त्याच्या वडिलांवर कोयत्याने वार करण्यात आले. काळेवाडी येथे नुकतीच ही घटना घडली आहे. घटनेनंतर चारही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून, त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 7 Mar 2023
  • 11:50 pm
फुगा मारल्याचा जाब विचारला म्हणून केले कोयत्याने वार

फुगा मारल्याचा जाब विचारला म्हणून केले कोयत्याने वार

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

रस्त्याने जाताना पाण्याचा फुगा फेकून का मारला याचा जाब विचारला असता तरुणावर आणि त्याच्या वडिलांवर कोयत्याने वार करण्यात आले. काळेवाडी येथे नुकतीच ही घटना घडली आहे. घटनेनंतर चारही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून, त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

अभिषेक हौसराव बचाटे (वय २०, रा. काळेवाडी) याने या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाटे हा तापकीर चौक येथून काळेवाडीकडे त्याच्या घरी पायी चालत जात होता. त्यावेळी रस्त्यात थांबलेल्या दोन अनोळखी तरुणांनी अभिषेकवर पाण्याने भरलेला फुगा मारला. त्याबाबत अभिषेकने तरुणांना विचारणा केली. त्यावरून आरोपींनी अभिषेकला बेदम मारहाण केली. घटना घडली तेथून जवळच मामाच्या घरात बसलेले अभिषेकचे वडील भांडण सोडवण्यासाठी आले. तेव्हा आरोपींनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतर अभिषेक यांच्या वडिलांवर कोयत्याने वार केला. तेव्हा अभिषेक मध्ये पडला असता आरोपींनी अभिषेकवरही वार केले. दोघांना जखमी करून आरोपी दुचाकीवरून पळून गेले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, या गर्दीतून आरोपी पसार झाले.

होळीच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली. त्यानंतर शहरातील सर्व मिश्र लोकवस्ती असलेल्या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. होळी आणि धूलिवंदन या दोन दिवसात शहरात वादाची मोठी घटना घडली नाही. मात्र, काळेवाडी येथे होळीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या घटनेमुळे सणाला गालबोट लागल्याची चर्चा शहरात होती. शहरातील अन्य कोणत्याही भागात अशी घटना घडू नये म्हणून दोन दिवस पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चौकाचौकात बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान वाकड पोलीस फरार आरोपींचा तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story