महापालिकेच्या शाळा नव्हे 'कोंडवाडे'
सीविक मिरर ब्यूरो
पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असूनही शाळांची दुरवस्था झाली आहे. शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षकच नसल्याने गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना क्रीडांगणे नाहीत, स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था उपलब्ध नसल्याबद्दल आमदार माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत संताप व्यक्त केला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शाळांना शिक्षणमंत्र्यांकडून अचानक भेट देऊन तपासणी करण्याचे आश्वासन दिले.
मिसाळ यांनी पुण्यातील महापालिका शाळांतील दुरवस्थेचा प्रश्न लक्षवेधीद्वारे मांडला. एखाद्या दुर्गम भागातील शाळांप्रमाणे महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये गैरसोयी आहेत. सध्या महापालिका शाळांमध्ये ७२७ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. आंतरजिल्हा बदलीतून २९९ शिक्षकांना मान्यता दिली आहे. मात्र, शिक्षण विभागाने हा प्रस्ताव अडवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या मराठी, उर्दू, कन्नड, इंग्रजी माध्यमाच्या एकूण २८४ शाळा आहेत. त्यामध्ये अंदाजे ९३ हजार विद्यार्थी आहेत. या शाळांची दुरवस्था झालेली असतानाही तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली गेलेली नाही, अशी तक्रारही आमदार मिसाळ यांनी केली आहे.
'कित्येक शाळांमध्ये शिक्षक नाहीत. आठवी, नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना कुठल्यातरी संस्थेला कंत्राट देऊन त्यांचे शिक्षक शिकवायला येतात. याच संस्थांचे मुख्याध्यापकही आहेत. शाळेत सफाई कर्मचारी नाहीत, सुरक्षारक्षक नाहीत. मुले व मुलींसाठी एकच स्वच्छतागृह आहे. मुलींना तिथे जाणेही शक्य नाही. शाळेचे मैदान खासगी संस्थांना चालवायला दिले आहे. शाळेतील मुलेच तिथे जाऊ शकत नाहीत', असे माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
आयुक्तांच्या सूचनेनंतरही कार्यवाही नाही
बिबवेवाडी गावातील सरसेनापती हैबतराव शिळीमकर माध्यमिक शाळा येथील विविध समस्यांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी महापालिका आयुक्तांना १९ एप्रिल २०२३ रोजी निवेदन दिले होते. शाळेतील शौचालय, पाणी, नीजपुरवठा, अस्वच्छता, सी.सी.टीव्ही, सुरक्षा रक्षकांचा अभाव आहे. क्रीडांगण हे खाजगी संस्थेला दिल्यामुळे विद्यार्थ्यांना मैदान उपलब्ध होत नाही, अशी तक्रार करण्यात आली होती. आयुक्तांनी त्यावर सूचना देऊनही कार्यवाही झाली नाही.
कंत्राटी शिक्षकांची अनियमितता
इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक उपलब्ध करण्यासाठी शिक्षण मंडळाने एका संस्थेची निवड केली आहे. मात्र, हे कंत्राटी शिक्षक शाळेत नियमित जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. संतप्त नागरिकांनी शिक्षण मंडळ नियुक्त करत नसेल तर स्वखर्चाने शिक्षक नेमू असा इशारा दिला आहे.
अतिरिक्त आयुक्तांकडून झाडाझडती
पुणे महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्याकडून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली जाते. शिक्षकांची नियुक्ती न केल्याचा आदेश त्वरित काढ़ा अन्यथा कारवाई करण्याची धमकी अतिरिक्त अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी दिल्याचा आरोप आमदार माधुरी मिसाळ यांनी केला.
शिक्षक नियुक्तीचे घोंगडे भिजतच
शालेय शिक्षण विभागाकडून 'पवित्र' पोर्टल या संगणक प्रणालीव्दारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीसाठीची कार्यवाही अंतिम टप्यात असून, त्यानुसार राज्यात सुमारे ३०,००० शिक्षकांची भरती करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. पवित्र प्रणाली सुरू झाल्यानंतर त्याप्रमाणे कायमस्वरूपी रिक्त पदे भरण्यात येणार आहे. तथापि विद्यार्थ्या शैक्षणिक सोय करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीने, एकवट मानधनावर शिक्षक उपलब्ध करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. वर्गावर शिक्षक उपलब्ध करण्याकरीता शालेय मुख्याध्यापकांमार्फत आवश्यकतेप्रमाणे वर्ग जोडून सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविण्यात येत आहे, असे उत्तर शिक्षणमंत्र्यांनी दिले.