किरीट सोमय्या पुणे मनपा पायरी प्रकरण
पुणे महापालिकेच्या पायरीवरील आंदोलनादरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गेल्या वर्षी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. यात सोमय्या जखमी झाले होते. या प्रकरणी ठाकरे गटाच्या चार जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर इतर ४ जणांना जामीन मंजूर झाला आहे. विशेष बाब म्हणजे १४ महिन्यानंतर या प्रकरणात ८ जणांची नावे जोडण्यात आले आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ५ फेब्रुवारी २०२२ रोजी महापालिकेच्या पायऱ्यांवरती आंदोलन केले होते. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांना धक्काबुक्की करत मारहाण केली होती. या प्रकरणी १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर १४ जणांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी संबंधित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जामिनही मिळाला होता. मात्र, या प्रकरणात १४ महिन्यानंतर ८ जणांची नावे जोडण्यात आले होते. याबाबत मेहरबान मुदलियार कोर्टात सुनावणी पार पडली. यात सुनावणीत चार जणांना येरवडा कारागृहात पाठवण्यात आले आहे.
निलेश रामचंद्र राऊत, अजिंक्य प्रकाश पगारे, संदीप गणपत गरुड आणि विक्रम उर्फ (विकी) कैलास धोत्रे यांना येरवडा तुरुंगात पाठविण्यात आले आहे. तर पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह इतर चार जणांना जामिन मंजूर झाला आहे.
कोर्टाच्या या निर्णयावर बोलताना ठाकरे गटाचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे म्हणाले की, “पुणे महापालिकेत झालेल्या आंदोलनामधे माझ्यासह १४ जणांवर गुन्हा दाखल करून मेहरबान कोर्टाने जामिनावर सोडले आहे. तरीही किरीट सोमय्या यांनी स्वतःच्या मानसिक समाधानासाठी सत्तेचा गैरवापर करून पोलिसांवर तीन महिन्यांपासून राजकीय दबाव टाकला आणि आणखी ८ शिवसैनिकांना अटक करून गुन्हा दाखल करण्यासाठी आटापिटा केला”, असा गंभीर आरोप मोरे यांनी केला आहे.