Pimpri Chinchwad Corporation
रोहित आठवले
rohit.athavale@civicmirror.in
TWEET@RohitA_mirror
करसंकलन विभागाच्या तुघलकी कारभाराचा फटका भोसरी, चिखली परिसरातील ऐश्वर्यम् कोर्टयार्ड या बड्या हाऊसिंग सोसायटीत राहणाऱ्या ६०० सदनिकाधारकांना बसला. या सोसायटीतील काही सदस्यांनी मालमत्ता कर न भरल्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने थेट ६०० सदनिकाधारकांचे पाणी बंद केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. याबाबत बराच गदारोळ झाल्यानंतर सायंकाळी उशिरा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाच्या वादग्रस्त कारभाराचे अनेक मुद्दे गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. मालमत्ता कर वसूल करण्यासाठी या विभागाने यापूर्वी घेतलेले अनेक निर्णय वादात सापडले असतानाच, सोमवारी काही ठराविक सदनिकाधारकांनी मालमत्ता कर न भरल्याने थेट सोसायटीला होणारा पाणीपुरवठा तोडल्याने कोणत्या कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
ऐश्वर्यम् कोर्टयार्ड ही सोसायटी विकासकाकडून अद्याप सदनिकाधारकांना हस्तांतरित झालेली नाही. त्यामुळे सोसायटीला पदाधिकारी नसल्याने सदनिकाधारकांना अनेक समस्यांचा झगडा वैयक्तिक पातळीवर करावा लागत आहे. सोमवारी दुपारी अचानक सोसायटीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलनवाहिनीतून जोडण्यात आलेली पाईपलाईन कापून त्याला कुलूप लावले. जोपर्यंत थकबाकीदार सदनिकाधारक कर भरत नाहीत, तोपर्यंत पाणीपुरवठा सुरू न करण्याचा पवित्रा या अधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे सोसायटीत एकच खळबळ उडाली. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने अनेक सदनिकांमधील नागरिक हे नोकरीनिमित्त बाहेर होते. त्यांना आम्ही आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपव्दारे ही माहिती कळवून घरी येण्यास सांगितले. त्यानंतर हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे पदाधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. सोसायटी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यावर सायंकाळी उशिरा आमचा पाणीपुरवठा पूर्ववत केला असल्याची माहिती ऐश्वर्यम् कोर्टयार्डमध्ये राहणाऱ्या काही नागरिकांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना दिली.
महापालिकेने सहकार्याची अपेक्षा ठेवू नये
शहरात यापूर्वी असाच प्रकार घडला आहे. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावरून ही कारवाई केल्याचे सांगितले गेले होते. आजही करसंकलन विभागाच्या सहायक आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांनी दिलेल्या आदेशावरून ही कारवाई केल्याचे सांगितले. परंतु, अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांकडे विचारणा केली असता, त्यांनी असे आदेश दिले नसल्याचे सांगत हात वर केले. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी हे भिन्न विषय असताना पाणी तोडले गेले. यापुढे असे प्रकार झाल्यास महापालिकेने सोसायटीकडून सहकार्याची अपेक्षा ठेवू नये. वेळप्रसंगी महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आम्ही सोसायटीच्या आवारात येण्यास मज्जाव करण्यासही मागे-पुढे पाहणार नसल्याचे चिखली-मोशी-चऱ्होली हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी सांगितले.
महापालिकेसाठी सोसायटीत राहणारे सदनिकाधारक सॉफ्ट टार्गेट झाले आहेत. कोणताही नियम लागू करायचा झाल्यास तो नियमांचे पालन करणाऱ्या सोसायटीधारकालाच लागू केला जात आहे. सोसायटीला एकतर पाणी विकत घ्यावे लागत आहे. रस्ता, कचरा, पाणी, आणि अतिक्रमण अशा समस्यांना तोंड द्यावे लागत असताना आज करसंकलन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कहर केला. ठराविक लोकांनी मालमत्ता कर भरला नाही म्हणून थेट सर्वांचे पाणी तोडणे हे बेकायदा असून, आम्ही आता कायदेशीर प्रक्रियेचा आधार घेणार आहोत.
– दत्तात्रेय देशमुख, अध्यक्ष पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन
मालमत्ता कर अथवा अन्य देयके असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. परंतु, एखाद्यावरील कारवाईचा फटका संपूर्ण सोसायटीला बसणे योग्य नाही. कर न भरणाऱ्यांवर मालमत्ता जप्तीची नोटीस तसेच अन्य प्रक्रिया असते. पाणी पुरवठा खंडित झाल्याचे आमच्या निदर्शनास येताच तत्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.