कोयत्यासमोर पोलिसांची लाठी, आता बस !
विजय चव्हाण
vijay.chavan@civicmirror.in
पुणे शहरात गल्ली-बोळांत कोयता गँगची दहशत, वाहनांची तोडफोड आणि अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीत वाढलेले प्रमाण गंभीर बनत चालले आहे. गुन्हेगार पोलिसांनाच आव्हान देत आहेत. कोयता गॅंगचा बिमोड करण्यासाठी आता अडीचशे पोलिसांना कमांडोच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सिंहगड रस्ता परिसरात रात्री दहाच्या सुमारास दोघेजण कोयते घेऊन फिरत होते. दोघांनी मिळून परिसरात तब्बल २० मिनिटे धुडगूस घातला होता. अनेकांना जखमी करण्याचा प्रयत्न केला. सिंहगड पोलीस ठाण्याचे मार्शल धनंजय पाटील आणि अक्षय इंगवले हे वडगाव हद्दीत गस्त घालत होते. याबाबत त्यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा दोघेही आरोपी नागरिकांवर कोयते उगारत चालले होते. पोलिसांना बघताच दोघांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पाटील आणि इंगवले यांनी पाठलाग करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. धनंजय पाटील आणि अक्षय इंगवले या दोघांच्या जिगरबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक झाले, पण त्यांनी हे दिव्य केवळ एका काठीच्या जोरावर पार पाडले. गुन्हेगारांच्या हातात हत्यार असल्याने काहीही अनर्थ घडू शकला असता. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांशी चार हात करण्यासाठी अडीचशे पोलिसांना कमांडोच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षित सशस्त्र कर्मचाऱ्यांची नेमणूक प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात येणार आहे.
पुणे पोलिसांनी मागील तीन वर्षात सव्वाशे टोळ्यांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली. या टोळ्या कारागृहात असतानाही शहरात गुंडांचा धुडगूस सुरू आहे. शिवाय, दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचाऱ्यांना लुटण्याचा सपाटा लावला आहे. दागिने, मोबाइल हिसकावण्याचे प्रमाण मोठे आहे. हे रोखण्यासाठी पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी हे पथक गस्तीसाठी नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलीस ठाण्यात गस्तीसाठी असलेली सीआर मोबाइल व्हॅन तंत्रज्ञानाने अद्ययावत करण्यात येणार आहे. कामाचा ताण असणाऱ्या पोलीस ठाण्यात अशा दोन व्हॅन कार्यरत असतील. संवेदनशील ठिकाणे, गुन्हेगारीचे हॉटस्पॉट तेथे ही व्हॅन गस्तीवर असेल. ११२ या पोलीस हेल्पलाइनचे नियंत्रण मुंबईहून होते. तेथे कॉल गेल्यानंतर तो कोणत्या शहरातील आहे, हे पाहून तेथे वळविला जातो. मात्र, असेही काही कॉल स्थानिक पोलीस ठाणे, पोलीस आयुक्त कार्यालय, थेट पोलीस अधिकाऱ्यांना येतात. त्या सर्व कॉलची येथे तत्काळ दखल घेतली जाणार आहे. जीपीएसद्वारे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त रितेशकुमार यांना या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, ‘‘या पथकामुळे शहरात घडलेल्या प्रत्येक घटनेची माहिती सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एकाच वेळी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच नियंत्रण कक्षाला कॉल केल्यानंतर मदत मिळण्यासाठी लागणारा कालावधीसुद्धा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. शहरातील ‘स्ट्रीट क्राइम’ कमी करण्यासाठी कमांडोच्या धर्तीवर प्रशिक्षण घेतलेले २५० कर्मचारी गस्तीसाठी तैनात असतील. रस्त्यावरील गुन्हेगारी कमी करणे आणि अघटित घडल्यास तत्काळ घटनास्थळी धाव घेणे हे त्यांचे काम असणार आहे. यासाठी त्यांना १२५ अत्याधुनिक वाहनेही देण्यात येणार आहेत. एका वाहनावर दोन कर्मचारी असतील. पोलीस ठाण्यातील गस्तीवरील नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच ते कार्यरत असतील.’’
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.