कोयत्याच्या भरघोस यशानंतर 'आता आरोपी पकडा गुण मिळवा'
रोिहत आठवले
rohit.athavale@civicmirror.in
TWEET@RohitA_mirror
पोलिसांकडून दैनंदिन कामकाज करून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमिष दाखवावे लागत असून, 'कोयता पकडा गुण मिळवा'च्या यशानंतर आता 'आरोपी पकडा गुण मिळावा' ही योजना लागू करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील फरारी घोषित केलेल्या २४ आरोपींना पकडल्यास प्रत्येकी २५ गुण तर पाहिजे असलेल्या १४५९ आरोपींना पकडल्यास प्रत्येकी ५ गुण देण्यात येणार आहेत. तसेच अजामीनपात्र वॉरंट बजावून आरोपीला अटक केल्यास एक गुण देण्यात येणार असून, गुन्हा करून पसार झालेल्या आणि सापडत नसलेल्या आरोपीला कोर्टाकडून प्रक्रिया करून फरार घोषित करून घेतल्यास प्रत्येकी १० गुण देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मंगळवार (७ फेब्रुवारी) ते शुक्रवार (१० मार्च) या दरम्यान ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
एखादा गुन्हा घडल्यानंतर त्यातील आरोपींना पकडणे हा पोलिसांच्या दैनंदिन कामकाजाचा भाग आहे. शहरात दिवसाला सरासरी सुमारे २५ ते ४५ गुन्हे दाखल होत असतात. त्यातील आरोपींची संख्या ही प्रत्येकी एक किंवा त्यापेक्षा अधिक असू शकते. गुन्हा घडल्यानंतर चौकशी तसेच अन्य प्रकारे तपास करून आरोपींना अटक केल्यावर न्यायालयासमोर हजर करणे हे पोलिसांचे काम असताना गेल्या अनेक महिन्यांपासून सापडत नसलेल्या आरोपींच्या अटकेसाठी
पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना गुण, बक्षीस आणि स्पर्धा का लावावी लागत आहे, हा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये यापूर्वी कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्यांना पकडल्यास गुण दिले गेले. त्यात पिस्तूल पकडल्यास अधिक गुण मिळत असल्याने त्याचीही चढा-ओढ आयुक्तालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये रंगली होती. स्पर्धेत अग्रेसर असल्याचे दाखविण्यासाठी पोलिसांकडून चुकीच्या गोष्टींचा अवलंब केला जाऊ शकतो ही शक्यता वरिष्ठ अधिकारी लक्षात घेत नसल्याचे नव्याने पुन्हा योजना लागू केल्यावरून दिसून येत आहे. खून, दरोडा, फसवणूक, विनयभंग, बलात्कार आदी स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यातील २४ आरोपी हे अटक झाल्यानंतर न्यायालयात खटला सुरू असताना अथवा अद्याप अटकच न झाल्याचे आणि ते कुठेही सापडत नसल्याचे निश्चित झाल्यामुळे त्यांना न्यायालयामार्फत फरार घोषित करण्यात आले आहे. यामध्ये देहूरोड परिसरातील पाच, भोसरी परिसरातील पाच, भोसरी एमआयडीसीचे चार, हिंजवडी, वाकड, पिंपरी, आळंदीचे प्रत्येकी दोन आणि चिंचवडच्या एका आरोपीचा समावेश आहे.
त्याच बरोबर शहरात दररोज दाखल होणाऱ्या विविध स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये प्रामुख्याने हाणामारी, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, घरफोडी, चोरी, फसवणूक, अवैध व्यवसाय या स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यांसह अन्य किरकोळ गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेले (वॉन्टेड) असे १४५९ आरोपी अद्याप अटक करण्यात आलेले नाहीत. पाहिजे असलेल्या आरोपींमध्ये सर्वाधिक आरोपी हे पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यातील असून, त्यांची संख्या ही २४६ एवढी आहे, तर त्या खालोखाल हिंजवडीमधील २०५, तळेगाव १९६, चाकण १५८, सांगवी १४६, वाकड ११६, भोसरी ९८, भोसरी एमआयडीसी ७४, चिंचवड ५६, निगडी ४८, म्हाळुंगे ३०, चिखली २५, देहूरोड १५, आळंदी १४, तळेगाव एमआयडीसी १०, दिघी ८, शिरगांव ६ असे आरोपी अद्याप गुन्हा दाखल झाल्यापासून अटक करण्यात आलेले नाहीत.
शहरातील सर्व १८ पोलीस ठाणी, गुन्हे शाखेचे पाच युनिट आणि अन्य पाच विभाग असे सर्वजण आता वरील आरोपींचा शोध घेणार आहेत. शहरात चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून या निवडणूक कार्यक्रम कालावधीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये. कायदा सुव्यवस्था शहरातील बिघडू नये, यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन वरील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी अशा स्वरूपाचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर वरील विशेष मोहिमेअंतर्गत दररोज कोणकोणती पोलीस ठाणी, गुन्हे शाखेच्या विविध विभागांनी आरोपींना अटक केली किंवा कसे याबाबतचा अहवाल वरिष्ठ निरीक्षक यांच्या मार्फत गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि त्यांच्याकडून पोलीस आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून अशा स्वरूपाच्या विशेष मोहिमा या राबविल्या जात असतात. यामध्ये स्पर्धा लावण्याचा हेतू नसून, हा दैनंदिन कामकाजाचा भाग असल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पण पुण्यात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुणे शहर पोलिसांनी जाहीर केलेल्या "आरोपी पकडा आणि बक्षीस मिळवा" या योजनेचा खरपूस समाचार घेतला होता; एखादा वीरप्पन पकडण्यासाठी बक्षीस जाहीर करणे आणि सरसकट सगळेच आरोपी सापडत नसताना त्यांना पकडल्यास गुण आणि बक्षीस देणे योग्य नसल्याची टिपणी यावेळी पवार यांनी केली होती. त्यानंतरही पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पुणे शहर पोलिसांच्या पावलावर पाऊल टाकत "आरोपी पकडा गुण मिळवा" ही योजना जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांनी गर्दीच्या वेळी गस्त घालण्याचे आदेश आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिले होते, या योजनेची कॉपी आता पुणे शहर पोलिसांकडून सुरू झाली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.