केवळ उदघाटनापुरती धावली लोकल
राजानंद मोरे
rajanand.more@civicmirror.in
TWEET@Rajanandmirror
पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी शिवाजीनगर स्थानकावरून लोणावळ्यासाठी लोकल सोडण्याचे केलेले नियोजन आज पाळले गेले खरे. मात्र, प्रवाशांना हवी असलेली दुपारी एकची लोकल केवळ उद्घाटनाच्या दिवसापूर्वीच धावणार असल्याने प्रवाशांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. यामुळे दुपारची लोकल सुरू होऊन आपली अडचण दूर होण्याच्या आशेवर असणाऱ्या प्रवाशांना दुपारची लोकल एक दिन की चांदनी ठरली असे म्हणावे लागेल.
पुणे ते लोणावळा दरम्यान दररोज ४० लोकल धावतात. मात्र दुपारी साडेअकरा ते तीन दरम्यान एकही लोकल नाही. त्यामुळे या काळात स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना ताटकळत थांबावे लागते. पुणे- लोणावळा लोकलने नोकरदार, विद्यार्थी, ग्रामस्थ वेगवेगळ्या कारणांसाठी प्रवास करत असतात. कोरोना काळात बंद झालेल्या लोकल टप्प्या-टप्प्याने चालू झाल्या. मात्र, सकाळी साडेअकरा ते दुपारी तीन दरम्यान एकही लोकल नसल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या साऱ्यांची मोठी अडचण होत होती. यामुळे बारा ते तीन दरम्यान असलेली एकची लोकल सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी गेल्या काही महिन्यांपासून प्रवासी करत होते. मात्र, दुरुस्ती किंवा रेल्वे मार्गाच्या विकासाचे कारण सांगत ही लोकल चालू करण्याबाबत रेल्वे प्रशासन हात-पाय हलवत नव्हते. शिवाजीनगर स्थानकावरील लोकलच्या वेगळ्या प्लॅटफॉर्मच्या उद्घाटनानिमित्त आज दुपारी दीड वाजता लोकल सोडण्यात आली. उद्घाटनाचा घाट घालण्यासाठी रेल्वे आग्रही असलेला ब्लॉकही बाजूला ठेवण्यात आला. ठरल्याप्रमाणे मंगळवारपासून एकूण चार लोकल शिवाजीनगरमधून सोडण्यात येतील. त्यापैकी तीन लोकल यापूर्वी पुणे स्थानकातून सुटत होत्या.
रेल्वे प्रशासनाने लोकलसाठी शिवाजीनगर स्थानकावर नवीन प्लॅटफॉर्म तयार केला आहे. या प्लॅटफॉर्म वरून केवळ लोकल गाड्या सोडण्यात येणार असल्याचे रेल्वेने यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास शिवाजीनगर ते तळेगाव अशी लोकल सोडत प्लॅटफॉर्मचे अधिकृतपणे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार सुनील कांबळे यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खासदार गिरीश बापट यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभाग घेतला. आज दुपारी धावलेली गाडी एका दिवसाचीच पाहुणी होती.
दरम्यान रेल्वेकडून शिवाजीनगर स्थानकातून सोडण्यात येणाऱ्या चार लोकलपैकी तीन लोकल यापूर्वी पुणे स्थानकातून सुटत होत्या. त्या लोकल आता पुणे स्थानकातून न सोडता शिवाजीनगर स्थानकातून सोडण्यात येतील. त्यामुळे पुणे स्थानकातून सुटणाऱ्या लोकलची संख्या कमी झाली आहे. त्याचा फटका पुणे स्टेशन परिसरात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. चार लोकलपैकी तीनही लोकल संध्याकाळच्या वेळेतील आहेत, तर एक लोकल शिवाजीनगर स्थानकातूनच सकाळी सुटणारी आहे. रेल्वे प्रशासनाने लोकलच्या वेळांचे नियोजन न करता केवळ शिवाजीनगर स्थानकातून लोकल सोडायच्या या उद्देशाने पुणे स्थानकातून सुटणाऱ्या लोकल रद्द करत त्या शिवाजीनगर स्थानकाला जोडल्या आहेत यावरूनही प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
दररोज लोकलने शिवाजीनगरला महाविद्यालयात येणारी रचना शिवले म्हणाली की, मी सकाळी कॉलेजला आल्यानंतर दुपारी बारा-साडेबारापर्यंत सुटते. त्यानंतर घरी जाण्यासाठी तीन वाजेपर्यंत लोकलची वाट पाहावी लागते. त्यामुळे अनेकदा महाविद्यालयातच थांबावे लागते. माझ्यासारखे अनेक विद्यार्थी सकाळच्या वेळेत पुण्यात येतात. त्यांना घरी जाण्यासाठी दुपारी एकही लोकल नसते. तीन वाजून पाच मिनिटांनी लोकल सुटते. त्या लोकलची वाट बघत दोन-अडीच तास घालवावे लागतात. साडेअकरा ते तीन या वेळेत एखादी लोकल सोडल्यास प्रवाशांना त्याचा खूप फायदा होऊ शकतो. अनेक प्रवासी या वेळेत लोकलने प्रवास करू शकतात.'
रचना हिच्याप्रमाणेच विश्वास कानगुडे यांनी रेल्वेच्या या कारभारावर नाराजी व्यक्त केली, ते म्हणाले नियमित सुटणाऱ्या लोकलच्या माध्यमातूनच फलाटाचे लोकार्पण करता आले असते. मग रेल्वेने दुपारी दीडची वेळ का निवडली हे प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. आम्ही अनेकदा दुपारीही लोणावळ्यापर्यंत जातो. पण त्यासाठी तीनपर्यंत थांबावे लागते. एक-दीडच्या दरम्यान एखादी लोकल उपलब्ध करून दिल्यास त्याचा विद्यार्थ्यांसह अनेक प्रवाशांना फायदा होईल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.