कात्रजचे विद्यार्थी अडकले कात्रीत
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
वाहतूक कोंडी हा संपूर्ण शहराला भेडसावणारा प्रश्न असला तरी काही ठिकाणचा प्रश्न त्याहून अधिक गंभीर आहे. प्रचंड वाहतूक कोंडी असलेल्या कात्रजकरांना आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळेच सांगा शाळेत कसे सोडायचे, असा प्रश्न पालक विचारत आहेत.
पुण्याचे दक्षिणद्वार असलेल्या कात्रज परिसरात गेल्या काही वर्षांत लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. साताऱ्याच्या दिशेने जुन्या बोगद्यातून येणारी वाहतूक याच भागातून पुढे जाते. संतोषनगर, सुखसागरनगर आणि कात्रज गावठाण परिसर वाढला. तशी येथील वाहतूकही वाढली. कात्रज बाह्यवळण मार्गाद्वारे कोंढवा आणि सासवडकडे जाणाऱ्या जड वाहनांचे प्रमाण अधिक आहे. त्याच बरोबर कात्रजच्या मुख्य चौकात पीएमपीचा सतत गजबजलेला बस स्टॉप आहे. तर, कात्रजकडून कोंढवा रस्त्याकडे वळताना आणखी एक बस स्टॉप आहे. कात्रज येथील पोलीस चौकी ते गंधर्व लॉन्स दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाल्यांची आणि भाजीवाल्यांची गर्दी आहे. तर, मुख्य चौकात साताऱ्याकडे जाताना खासगी बसचा स्टॉपही तिथेच असतो. त्याचबरोबर सकाळी चाकरमान्यांची कामावर जाण्यासाठी धडपड सुरू असते.
अशा कोलाहलात पालकांना सातारा रस्ता ओलांडून कात्रज गावातील मोरे विद्यालयात आपल्या मुलांना सोडायला जावे लागते. सुखसागरनगर येथे हुजूरपागा शाळा आहे. तिथे जायचे असल्यास संतोषनगर आणि लगतच्या परिसरातून येणाऱ्या नागरिकांना सातारा रस्ता ओलांडण्याशिवाय पर्याय नाही. कात्रज रस्त्यावर रात्री दहा ते पहाटे पाच या काळात फारशी वाहतूक नसते. दिवसभर कायम वाहनांची वर्दळ सुरू असते. सकाळी, दुपारी आणि सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेस तसेच नोकरदारांच्या कामावर जाण्या-येण्याच्या वेळी अशीच गर्दी असते. अशा गर्दीतून नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना वाट काढून शाळेत जावे लागत आहे. 'सीविक मिरर'च्या प्रतिनिधीने सोमवारी शाळेच्या वेळेत कात्रज येथे जाऊन पाहणी केली असता विद्यार्थ्यांची रस्ता ओलांडताना होणारी धावपळ दिसून आली. कधी वाहनांना हात करून थांबवत तर कधी घाईत पुढे जाताना त्यांची त्रेधातिरपीट उडत होती. काँक्रीट मिक्स करणारे मोठे मिक्सर, बस, टेम्पो, दुचाकी, रिक्षा अशा गाड्यांच्या कोलाहलातून गटागटाने विद्यार्थ्यांचे लोंढे पुढे सरकत होते. काही पालक मुलांना हाताला धरून गाड्यांमधून वाट काढत होते. काही वाहनचालक सौजन्याने मुलांना वाट देत होते. तर, काही आपली वेळ पाळण्यासाठी वाहन पुढे दामटत होते. हा रस्ता ओलांडणे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक दिव्यच असल्याचे पाहायला मिळाले.
संतोषनगर येथील रहिवासी अर्चना काकडे म्हणाल्या, अनधिकृत भाजी विक्रेत्यांमुळे रस्ता आधीच अरुंद झाला आहे. एखादे चारचाकी वाहन आल्यास वाहतूक कोंडी होते. दुसरीकडे सातारा रस्ता ओलांडून मुलांना सोडण्यासाठी शाळेत जावे लागते. हा रस्ता कायमच वाहता असतो. परिणामी पालकांना मुलांना शाळेत सोडण्यासाठी कसरत करावी लागते. भाजीवाल्यांना पालिकेने एक तर हटवले पाहिजे अथवा सम-विषम तारखेनुसार बसण्याची व्यवस्था केली पाहिजे. स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते राजू कदम म्हणाले, रस्त्यावर बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांना मज्जाव केला पाहिजे. त्यांचे स्थलांतर अन्य ठिकाणी करायला हवे. सध्या पीएमपी स्थानकावर तशी जागा आहे. इथे बहुमजली भाजी मार्केट पार्किंगसह करता येईल. तसे झाल्यास चौकात रस्ता रुंदीकरण करणे शक्य आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांना निर्धोकपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी पादचारी उड्डाणपूल करायला हवा. ते त्यांच्या सोयीचे आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.