कॅलिफोर्निया राज्यातील छत्रपतींचा पुतळा चोरीला
सीविक मिरर ब्यूरो
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅन होसे येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर अमेरिकेतील शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता.
सॅन होसे येथील ग्वाडलपे रिव्हर पार्क या उद्यानामध्ये हा अश्वारुढ पुतळा होता. सॅन जोसच्या उद्यान विभागाने ट्विट करून हा पुतळा चोरी झाल्याची माहिती दिली आहे. यानंतर आता याचे पडसाद महाराष्ट्रातदेखील पाहायला मिळत आहेत. ‘‘पुणे शहराने ‘सिस्टर सिटी’ मोहिमेअंतर्गत अमेरिकेतील सॅन होजे शहराला दिलेला आणि तेथील उद्यानात बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली चोरी संतापजनक आहे. हा आपल्या आणि तेथील मराठी जनतेच्या भावनेचा विषय आहे,’’अशा प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रातून उमटत आहेत.
पुणे शहराकडून अमेरिकेतील सॅन जोसे शहराला हा पुतळा भेट देण्यात आला होता. या दोन्ही शहरांमधील अनेक बाबतीत साधर्म्य असून दोन्ही शहरांना समुद्ध वारसा आहे. दरम्यान उत्तर अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता. या पुतळ्याची चोरी झाल्यामुळे सॅन जोसे शहरातील नागरिकांना दुःख झाले असून या घटनेबाबतच्या अपडेट लवकरच दिल्या जातील, असेही उद्यान विभागाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.