अखेर न्याय
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
प्रसूतीसाठी आलेल्या महिलेवर उपचारांमध्ये निष्काळजीपणा केल्याने अर्भक मृत जन्माला आल्याचा ठपका ठेवत जिल्हा औंध रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ, अन्य एक डॉक्टर आणि तीन परिचारिकांना पिंपरी न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. संबंधित महिलेच्या वडिलांनी १२ वर्ष यासाठी न्यायालयीन संघर्ष केला असून, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सांगवी पोलीस ठाण्यातील तत्कालीन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास केला होता.
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अर्पिता प्रदीप बावरकर, डॉ. आत्माराम व्यंकटराम शेजूळ, परिचारिका मनीषा जोशी, उज्ज्वला नागपुरे, शुभांगी कांबळे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. गजभिये यांनी हा निकाल दिला आहे. पुण्यातील येरवडा मनोरुग्णालयात वाहनचालक म्हणून काम करणारे भगवान दौलत वाकोडे यांनी त्यांची मुलगी मनीषा निकेश आरू यांना प्रसूतीसाठी २९ नोव्हेंबर २०१० रोजी जिल्हा औंध रुग्णालयात दाखल केले होते. वाकोडे यांना औंध रुग्णालय परिसरातील सरकारी निवासस्थान राहण्यासाठी देण्यात आल्याने त्यांची मुलगी प्रसूतीसाठी केशवनगर, वडगाव शेरी येथून माहेरी सांगवी येथे आली होती.
वाकोडे यांनी २९ नोव्हेंबर २०१० रोजी सकाळी मुलीला प्रसूतीसाठी दाखल केले होते. दाखल करण्यापूर्वी त्यांच्या मुलीची तपासणी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. बावरकर यांनी केली होती. त्यानंतर काही वेळाने मनीषा यांना त्रास होऊ लागल्याने वाकोडे यांनी आरोपींपैकी तिन्ही परिचारिकांना वेळोवेळी याबाबत पाहणी करण्यास सांगितले होते. त्याचबरोबर स्त्रीरोग तज्ज्ञ बावरकर यांना बोलावून घेण्याची विनंती केली होती. दिवसभर मनीषा यांना त्रास होत होता. पहाटे साडेतीनच्या सुमारास मनीषा यांना त्रास असह्य झाल्याने कुटुंबीय हवालदिल झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी साडे नऊच्या सुमारास वाकोडे यांनी डॉ. शेजूळ यांना रुग्णालयात शोधून त्यांची भेट घेतली होती. मनीषाला खूप वेदना होत असल्याचे वाकोडे यांनी शेजूळ यांना सांगितले. त्यावर डॉ. शेजूळ यांनी, कालच तुम्ही मुलीला रुग्णालयात दाखल केले आहे, त्यामुळे लगेच तुमची मुलगी प्रसूत होणार आहे का, असा सवाल करून त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केल्याचे तसेच डॉ. बावरकर नंतर तपासणीसाठी न आल्याचे वाकोडे यांचे म्हणणे होते.
दरम्यान, मनीषा यांना त्रास होत असल्याने पावणे दहाच्या सुमारास त्यांची प्रसूती करण्यात आली होती. मात्र, यामध्ये मृत अर्भक जन्माला आले. त्यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ झाला. वाकोडे कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत अर्भकाचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका त्यावेळेस घेतली होती. पोलिसांना रुग्णालयात पाचारण करण्यात आले होते. तेव्हा याबाबत प्राथमिक चौकशी करून, ससून सर्वोपचार रुग्णालयातील संबंधित समितीकडे याबाबतचा अहवाल पाठविण्यात येईल, असे आश्वासन तत्कालीन रुग्णालय प्रशासनाने दिले होते. त्यानंतर पुढील कार्यवाही झाली होती. त्यानंतर सात महिने याबाबत औंध रुग्णालय आणि कालांतराने ससून येथील मेडिकल बोर्डाने चौकशी केली. त्यावेळी दोन्ही चौकशी समित्यांनी संबंधित दोन डॉक्टर आणि तीन परिचारिकांवर दोषी असल्याचा ठपका ठेवल्याची माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी, निवृत्त पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना दिली.
त्यानंतर २२ जुलै २०११ मध्ये या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकारी नोकर असलेल्या वाकोडे यांनी पोलिसांकडे बराच पाठपुरावा केला होता. डॉक्टरांकडे किती वेळा विनंती केली, परिचारिकांना डॉक्टरांना बोलवा म्हणून सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केले. डॉक्टरांची भेट झाल्यावरही त्यांनी लक्ष दिले नाही, आदींबाबतचे काही पुरावे स्वत: वाकोडे यांनी तपास अधिकारी भुजबळ, तत्कालीन पोलीस हवालदार प्रदीप साबळे, संतोष गायकवाड, महिला हवालदार आर. एस. काळे यांना दिले होते. त्याचबरोबर तपास अधिकाऱ्यांनी रुग्णालयातील त्यावेळेसच्या अनेक नोंदी, उपस्थितीत अन्य रुग्णांचे नातेवाइक आणि कर्मचाऱ्यांकडे चौकशी करून तपास केला होता. तपासाअंती याबाबतचे दोषारोपपत्र पिंपरी न्यायालयात सादर करण्यात आले होते.
गेल्या बारा वर्षांत याबाबत अनेकदा सुनावणी झाली होती. सध्या याबाबतची सुनावणी न्यायाधीश एन. आर. गजभिये यांच्या न्यायालयात सुरू होती. न्यायालयाने सर्व पुरावे आणि साक्षीदारांचे, तपास अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवून घेत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर दोन्ही डॉक्टर आणि तिन्ही परिचारिकांना दोन वर्षे कारावास आणि प्रत्येकी ५० हजार रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. तसेच दंड न भरल्यास सात दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर आरोपींकडून जमा होणाऱ्या दंडाच्या रकमेतून एक लाख रुपये वाकोडे यांना देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. सहायक सरकारी अभियोक्ता साधना बोरकर, संजय राठोड यांनी वाकोडे यांच्या वतीने कामकाज पाहिले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.