खबऱ्यावरून पोलिसांमध्येच जुंपली!

खबऱ्याने दुसऱ्या पोलिसाला माहिती दिल्याने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील एका पोलीस हवालदाराने त्याला शिवीगाळ करून धमकावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 7 Mar 2023
  • 11:53 pm
खबऱ्यावरून पोलिसांमध्येच जुंपली!

खबऱ्यावरून पोलिसांमध्येच जुंपली!

दुसऱ्या पोलिसाला माहिती दिल्याने शिवीगाळ करून धमकावले, हवालदार तातडीने निलंबित

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@vijayCmirror

खबऱ्याने दुसऱ्या पोलिसाला माहिती दिल्याने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील एका पोलीस हवालदाराने त्याला शिवीगाळ करून धमकावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

या घटनेची तातडीने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेतील पोलीस हवालदाराला निलंबित करण्याचे आदेश दिले. दीपक शिवराम लांडगे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

लांडगे गुन्हे शाखेच्या युनिट पाचमध्ये नियुक्तीस आहेत. एका खबऱ्याने आरोपीविषयीची माहिती लांडगे यांना न देता त्यांच्या सहकाऱ्याला दिली होती. हा प्रकार समजल्यानंतर लांडगेंनी खबऱ्याला गाठले आणि त्याला शिवीगाळ करून धमकावले. एवढ्यावरच न थांबता लांडगे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. सोमवारी (दि. ६) हा प्रकार घडला होता.

या प्रकाराची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. लांडगे यांचे वर्तन अशोभनीय आहे. अशा प्रकारच्या वर्तनामुळे समाजात चुकीचा संदेश गेल्याचा ठपका ठेवून लांडगे यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त झेंडे यांनी दिले.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, ‘‘खबरे पोलिसांचे कान आणि डोळे समजले जातात. त्यांच्या माहितीवरच पोलिसांनी अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. मात्र, अलीकडे तंत्रज्ञानाचा वाढता वापर, खबऱ्यांच्या वाढलेल्या अपेक्षा, मिळणारा अपुरा निधी अशा विविध कारणांमुळे हेच कान आणि डोळे पोलिसांपासून दुरावत चालले आहेत. त्यामुळे अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. खबरे सांभाळण्यासाठी पोलिसांना मिळणारा सिक्रेट फंड वेळेवर मिळत नाही. त्यामुळे पोलिसांचे खबर देणारे जाळे दिवसेंदिवस क्षीण होत चालले आहे.’’

‘‘गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांकडून तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला जाऊ लागला. तंत्रज्ञानात प्रगती झाल्यामुळे फोन टॅपिंग, मोबाइल लोकेशन, सीडीआर, सीसीटीव्ही कॅमेरे अशा तांत्रिक गोष्टींद्वारे अलीकडे अनेक गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे. तंत्रज्ञानावर आधारित माहिती गुप्तपणे संकलित करून त्याच्या आधारे आरोपींचा माग काढण्यावरच पोलिसांचा भर आहे. मात्र, ज्या गुन्ह्यात आरोपींनी तंत्रज्ञानाचा वापर केलेला नाही. अशा गुन्ह्यांमध्ये पोलिसांना खबऱ्यावरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे खबरे हेच पोलिसांचे गुप्तवार्ता मिळवण्याचे खरे साधन आहे,’’ असे प्रांजळपणे मान्य करीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी खबऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story