भक्तीचा जिहाद !
विजय चव्हाण
भवानी पेठेतील नवभारत सेवा मंडळातर्फे मुस्लीम बांधवांनी वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करीत हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडवले. पालख्यांचे सोमवारी (दि १२) शहरात आगमन झाल्यापासूनच मंडळातर्फे वारकऱ्यांच्या सेवेला सुरुवात केली. बुधवारी (दि. १४) पहाटेपर्यंत ही सेवा अखंडपणे सुरू होती.
सोमवारी रात्री भोजन, मंगळवारी सकाळी न्याहारी, दुपारचे भोजन आणि रात्रीचे भोजन अशी सर्व सोय मंडळातर्फे करण्यात आली. त्याचप्रमाणे वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिरदेखील आयोजित करण्यात आले होते. सुमारे पंधराशे वारकऱ्यांनी या आतिथ्याचा लाभ घेतला.
पालख्यांचे सोमवारी शहरात आगमन झाल्यापासूनच मंडळातर्फे वारकऱ्यांच्या सेवेला सुरुवात झाली होती. याबाबत मंडळाचे रशीद शेख म्हणाले, ‘‘गेल्या आठ ते दहा वर्षांपासून मुस्लिम बांधवांतर्फे वारकऱ्यांची सेवा केली जाते. शहरात धार्मिक सलोख्याचे वातावरण राहावे, हिंदू-मुस्लिम एकोपा टिकून राहावा, हा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. वारीत सहभागी होणारे वारकरी एवढ्या मोठ्या अंतरावरून चालत येतात. यापुढेही त्यांना मोठा पल्ला पार करायचा असतो. त्यांची सेवा करणे हे आमचे कर्तव्यच आहे, अशी आमची भावना आहे.’’
आचारी यासिन अत्तार झाले वारकरी
सातारा जिल्ह्यातील वाखरी येथील वारकरी यासिन अत्तार हे विठ्ठल सेवा मंडळ, खेड ब्रुद्रुक येथील दिंडी नंबर १०० मध्ये मागील २४ वर्षापासून सहभागी होतात. ते पुण्यातील गोपाळकृष्ण विकास मंडळ, गोखलेनगर येथे मुक्कामी होते. यावेळी त्यांनी आचारी ते पखवाज वादकांपर्यतचा आपला प्रवास सांगितला. ‘‘हिंदू आणि मुस्लिम यांचे रक्त सारखेच आहे. सगळेजण एकसारखे अन्न खातात, आम्ही मुस्लिम आहोत म्हणून, आमचे रक्त हिरवे नाही. राम-रहीम एकच असल्याचे आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवले आहे. गावाकडेदेखील आम्ही दिवाळी, दसरा, पोळा, रमजान ईद असे सर्व सण साजरा करतो. यासह नमाज अदा करणे, कुरान वाचणे सुरू असते. घराच्या आसपास कोणी मयत झाले असेल तर माझी पत्नी तीन दिवस त्यांना भाकरी, भाजी देत असते, गावातील वातावरण खेळीमेळीचे असते,’’ अशी माहिती अत्तार यांनी दिली.
पालखीरथाला मुस्लिम कारागीर
देतात चकाकी!
मुस्लिम बांधव (कारागीर) रथाला आणि पालखीला चकाकी देण्याचं काम दरवर्षी करतात. पालखी सोहळा म्हटलं की सर्वधर्म समभाव असा संदेश दिला जातो. त्याचे एक उत्तम उदाहरण यानिमित्ताने पाहायला मिळते.
घनश्याम गोल्ड यांच्याकडून दरवर्षी तुकोबांच्या पालखी तसेच रथाला चकाकी देण्याचे काम करण्यात येतं. मोठ्या श्रद्धेने मुस्लिम कारागीर रथाला चकाकी देण्याचे काम करतात. गेल्या सात वर्षांपासून हे काम अविरतपणे सुरू असल्याची माहिती कारागीरांनी दिली. जातीच्या पलीकडे जाऊन हे काम करण्याचा एक वेगळा अनुभव आणि त्याच समाधान असल्याचं कारागीर सांगतात.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.