जयकर ग्रंथालय शुल्काची विद्यापीठ करतेय सक्ती
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएच.डी. साठी प्रवेश घेतलेल्या सर्वच विद्यार्थ्यांकडून प्रत्येक वर्षी ग्रंथालय शुल्क आकारले जात आहे. मात्र यातील अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या बाहेर दूरवरच्या भागात असल्याने त्यांना ग्रंथालयातील ग्रंथ घेण्यासाठी विद्यापीठात येणे शक्य होत नाही. त्यामुळे जे ग्रंथालयाचा वापर करणार आहेत त्यांच्याकडूनच हे शुल्क आकारण्यात यावे. ग्रंथालय शुल्काची सक्ती असू नये, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सातत्याने विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. पीएच.डी. ला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वर्ष उलटून गेले तरीही वार्षिक प्रवेश शुल्काचे चलन दिले जात नाही. तसेच दरम्यानच्या काळात वार्षिक चलन न भरल्यामुळे असे विद्यार्थी जयकर ग्रंथालय, विभागाचे ओळखपत्र अशा विविध सुविधांपासून वंचित राहात आहेत. वर्ष उलटून गेल्यावर वार्षिक चलन प्राप्त होते. विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचा वापर केलेला नसतानाही विद्यार्थ्यांकडून ग्रंथालयाचे शुल्क वसूल करत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
या संदर्भात विद्यार्थी संबंधित अधिकाऱ्यांना भेटायला गेल्यावर तेथील अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत वेगवेगळ्या टेबलांवर त्या विद्यार्थ्यांना फेऱ्या मारायला भाग पाडत आहेत. तसेच या प्रकरणात विद्यार्थ्यांनी कितीही पाठपुरावा केला तरी त्यांना सुधारित चलन न देता सक्तीने ग्रंथालय शुल्कासह संपूर्ण चलन भरायला सांगितले जात आहे. वेळ वाया जाऊ नये आणि शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नाईलाजाने काहीही कारण नसताना वाढीव आर्थिक चलन भरत असल्याची कैफियत विद्यार्थ्यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना मांडली आहे.
२ मे २०२२ रोजी माझा पीएच.डी. प्रवेश झालेला असून तब्बल १ वर्ष पूर्ण झाल्यावर मला वार्षिक चलन देण्यात आले.
मागील वर्षभरात चलन नसल्यामुळे मला जयकर ग्रंथालयात प्रवेश दिला जात नव्हता. मात्र आता तरीसुद्धा सक्तीने ग्रंथालयाचे चलन भरायला सांगत आहेत. शुल्कात सवलत मिळावी या संदर्भात संबंधित ३ ते ४ अधिकाऱ्यांची भेट घेतली, मात्र त्यांनी एकमेकांकडे बोट दाखवत यांना भेटा-त्यांना भेटा, असे सांगत टाळाटाळ केली असल्याचे संशोधक विद्यार्थी तुषार पाटील यांनी सांगितले. बहुतांश पीएच.डी. संशोधक-विद्यार्थ्यांना वर्षाच्या सुरुवातीला चलन न देता वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात दिले जाते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना चलन नसल्यामुळे त्या वर्षभराच्या काळात कोणत्याही सुविधांचा लाभ घेता येत नाही. मात्र वर्षअखेरीस चलन प्राप्त झाल्यावर कोणत्याही सुविधांचा
लाभ घेतला नसतानाही विद्यार्थ्यांना सक्तीने चलन भरायला विद्यापीठ प्रशासन भाग पाडत असल्याचेही ते म्हणाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.