जहाँ शाह, वहाँ ‘राह’!

जी-२० परिषदेच्या निमित्ताने पुणेकरांनी महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा अनुभव घेतला. आता पुन्हा असाच अनुभव नवले पूल ते कात्रज चौकापर्यंतच्या महामार्गावर येत आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या मार्गावरून प्रवास करणार असल्याने हा रस्ता चकाचक करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) सरसावले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 17 Feb 2023
  • 10:51 am
जहाँ शाह, वहाँ ‘राह’!

जहाँ शाह, वहाँ ‘राह’!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीमुळे नवले ब्रीज ते कात्रज चौक रस्त्याने टाकली कात

महेंद्र कोल्हे/ राजानंद मोरे

mahendra@punemirror.com

TWEET@@mahendrakmirror

जी-२० परिषदेच्या निमित्ताने पुणेकरांनी महापालिका प्रशासनाच्या  कार्यक्षमतेचा अनुभव घेतला. आता पुन्हा असाच अनुभव नवले पूल ते कात्रज चौकापर्यंतच्या महामार्गावर येत आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या मार्गावरून प्रवास करणार असल्याने हा रस्ता चकाचक  करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) सरसावले आहे.

शहरातील रस्त्यांवरून प्रवास करताना पुणेकरांना कंबरतोड समस्यांचा सामना दररोज करावा लागतो. प्रशासनातील अधिकारी हे उघड्या डोळ्याने पाहात असतात. मात्र, नागरिकांच्या समस्या कमी करण्यासाठी इकडची काडी तिकडे होत नाही. जी-२० परिषदेच्या निमित्ताने पुणेकरांनी प्रशासनाची अचाट कार्यक्षमता अनुभवली होती. आता असाच अनुभव नवले पूल ते कात्रज चौकापर्यंतच्या महामार्गावर येत आहे. या रस्त्यावरून दस्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रवास करणार असल्याने हा रस्ता चकचकीत करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने  (एनएचएआय) पुढाकार घेतला आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारण्य़ात येत असलेल्या ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. अमित शाह यांच्या हस्ते रविवारी (१९ फेब्रुवारी) शिवजयंतीनिमित्त त्याचे लोकार्पण होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आंबेगाव ब्रुद्रुक परिसरात होत असलेली ही शिवसृष्टी महामार्गालगतच आहे. या महामार्गावरून शाह यांच्या वाहनांचा ताफा शिवसृष्टीपर्यंत पोहचणार आहे. 

पंधरा दिवसांपूर्वी या महामार्गावर नागरिक, वाहनचालकांन विविध समस्यांचा सामना करावा लागत होता.  शाह यांचा दौरा निश्चित झाल्यानंतर प्राधिकरणाकडून डागडुजी सुरू करण्यात आली आहे.

नवले ब्रीज ते कात्रज चौकापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी डांबर उखडले होते. त्यामुळे रस्त्यावर खडी पसरली होती. याच खडीवरून दुचाकी घसरून पडण्याचा धोकाही होता. महामार्ग असल्याने वाहने वेगात असतात. उखडलेला रस्ता आणि खडीमुळे दुरुस्ती करण्याची गरज  होती. रस्त्याच्या कडेला दगड-मातीचे ढिगारे पडले होते. रस्ता दुभाजकावर असलेली मातीही रस्त्यावर येत होती. परिसरात चार ते पाच शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची सततची वर्दळ असते. त्यांना रस्ता ओलांडण्यासाठी कसरत करावी लागते. ज्येष्ठ नागरिक, महिलांनाही जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. पदपथ नसल्याने रस्त्यावरूनच ये-जा करावी लागते. काही ठिकाणी सेवा रस्ता बंद असून ठिकठिकाणी कामे सुरू आहेत. याचा फटकाही नागरिकांना बसत आहे.

शाह यांच्या दौऱ्यामुळे परिसरातील रस्त्याचे वेगात डांबरीकरण केले जात आहे. रस्ता दुभाजकांची डागडुजी सुरू असून रस्त्यावरील माती-दगड बाजूला सारले जात आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांत रस्त्याचे रुपडेच पालटणार आहे. शिवसृष्टी परिसरातील सेवा रस्ताही तात्पुरत्या स्वरूपात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना नागरिकांच्या अडचणी कमी होणार आहेत. मात्र, त्यासाठी मंत्री येण्याची वाट यंत्रणा पाहात असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या समस्या यंत्रणांना दिसत असतात. मात्र त्यावर तातडीने कारवाई होत नाही. मंत्री किंवा परदेशी पाहुणे येणार असल्यासच प्रशासन खडबडून जागे होते. त्यानंतर पुन्हा जैसे थे स्थिती होते. जी-२० परिषदेवेळीही हेच पाहायला मिळाले, अशी टीका नागरिकांकडून होत आहे.

गृहमंत्र्यांचे कार्यक्रम 

 अमित शाह हे १८ आणि १९ फेब्रुवारीला पुणे दौर्‍यावर असणार आहेत. या दोन दिवसांत ते अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहतील. त्यामध्ये प्रामुख्याने आंबेगाव बुद्रुक येथील शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्याचा समावेश आहे. तसेच, भाजपचे पुण्याचे  खासदार गिरीश बापट यांची ते भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी करणार आहेत. 

अमित शाह १८ तारखेला काश्मीरमध्ये शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलींसोबत ‘जे डब्ल्यू मेरियेट’ येथे संवाद साधतील. त्यानंतर मोदी @ २० पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहणार असून, हा कार्यक्रम झाल्यावर ओंकारेश्वर मंदिरात जाऊन ते दर्शन घेतील. रात्री साडे नऊच्या सुमारास खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणार आहेत. दुसर्‍या दिवशी म्हणजेच, १९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता आंबेगाव येथील शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर अमित शाह हे कोल्हापूरला जाणार आहेत.

कात्रज चौक ते नवले ब्रीज या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामास सुरुवात झाली तेव्हा बराच राजकीय गाजावाजा झाला होता. काम सुरू झाल्यापासून ते काम सलग होत नव्हते. मात्र, मंत्री या रस्त्याने जाणार आहेत म्हटल्यावर संबंधित यंत्रणेने कंबर कसली. या रस्त्यावर बरेच दिवसांपासून अस्तित्वात असलेले खड्डे क्षणार्धात नाहीसे झाले, रस्ता गुळगुळीत झाला. काही का असेना, स्थानिक रहिवाशांकरता ही आनंदाची बाब आहे. याच रस्त्यावर असणाऱ्या अशोका आगम येथील दत्तनगरला जोडणारा जो भुयारी मार्ग आहे तेथूनसुद्धा एखाद्या मंत्र्यांना नेले तर भुयारी मार्गात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर देखील तत्काळ उपाय निघेल असे मला वाटत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story