इथेही 'एक ते चार'
तन्मय ठोंबरे/ रोिहत आठवले
tanmay.thombre@civicmirror.in
rohit.athavale@civicmirror.in
TWEET@tanmaytmirror @RohitA_mirror
पुणेकरांच्या दुपारच्या झोपेच्या सवयीबद्दल नेहमीच चर्चा होत असते. मात्र आता शहरातील काही प्रमुख पोलीस चौक्यांना दुपारी एक ते चार दरम्यान कुलूप लावल्याचे 'सीविक मिरर'च्या पाहणीत उघड झाले आहे. त्यामुळे पुण्यातील गुन्हेगार दुपारी एक ते चार झोपतात, असा समज करून बहुदा पोलीसही या वेळेत झोपा काढतात की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
कायमच वर्दळीचा परिसर आणि गुन्ह्यांच्या बाबतीत संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मजी पोलीस चौकी (समर्थ पोलीस ठाणे), सोलापूर बाजार पोलीस चौकी (लष्कर), चारबावडी पोलीस चौकी (लष्कर), सोमवार पेठ पोलीस चौकीची (समर्थ) दारे दुपारी कुलूपबंद असल्याचे दिसून आले. मात्र, सायंकाळ होताच या चौक्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची वर्दळ सुरू होते. तक्रारदार आणि दररोज या-ना -त्या कारणाने चौकीच्या परिसरात घुटमळणारे हमखास सायंकाळ झाली की गोळा होत असतात. परंतु, दुपारी चोरी, हाणामारी, दागिने हिसकावणे, रस्त्यावरील छेडछाड, लूटमार असे काहीच शहरात घडत नाही असा बहुदा पोलिसांचा समज झाला असावा. शहरातील सर्वच गुन्हेगार दुपारी एक ते चार झोपा काढतात आणि अंधार पडू लागल्यावरच रस्त्यावर गुन्हे करण्यासाठी येतात, असे समजून चौक्यांना दुपारी कुलूप लावले जात असावे, असे आता मिश्किलपणे बोलले जाऊ लागले आहे.
पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राचा परिसर मोठा असल्याने नागरिकांना तत्काळ मदत उपलब्ध व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या चौक्यांमध्ये गुन्हे दाखल न होणे आणि त्यामुळे कामात ‘रसच’ उरला नसल्याने कर्मचारी दुपारी चौक्यांना कुलूप लावून अन्यत्र भटकत असतात, अशी चर्चा पोलीस वर्तुळात आहे. शहरातील प्रातिनिधिक स्वरूपात चार चौक्यांच्या पाहणीत ही परिस्थिती दिसून आली आहे. परंतु, शहरातील बहुतांश चौक्यांमध्ये अशीच परिस्थिती असते.
देशातील सर्व पोलीस ठाणी सीसीटीएनएस प्रणालीने एकमेकांना जोडली गेली आहेत. पूर्वी चौकीत गुन्हा दाखल होत असे. मात्र, चौकीच्या अधिकाऱ्यांनी परस्पर एखादा उद्योग केल्यास त्याची ‘खबर’ निरीक्षकांना मिळेपर्यंत उशीर झालेला असायचा. यातून अनेकदा अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याची उदाहरणे आहेत.
या सर्व बाबींचा विचार करता सीसीटीएनएस प्रणाली सुरू होण्यापूर्वीच शहरातील गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल होतील, असा आदेश तत्कालीन अधिकाऱ्यांनी काढला होता. त्याच्यापुढे जाऊन आता सीसीटीएनएस प्रणाली कार्यान्वित झाल्याने हे कारण पुढे करून पुणे जिल्ह्यातील सर्वच चौक्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याचे काम बंद करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रारदारांना बोलावून पुढील सोपस्कार पार पाडले जातात. तर परिसरातील नागरिकांना मदत व्हावी म्हणून चौक्यांमध्ये एक-दोन अधिकारी आणि १० ते १५ कर्मचाऱ्यांची दोन शिफ्टमध्ये नियुक्ती करण्यात आलेली असते. परंतु, चौक्यांमध्ये गुन्हे दाखलच होणार नाहीत. तक्रारदार आल्यावर त्याचे म्हणणे ऐकून घेऊन गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात पाठवावे लागणार असल्याने बहुतांश चौक्यांमधील कर्मचारी निर्धास्तपणे इतरत्र फिरत असल्याचे दिसून येते.
पोलीस नियंत्रण कक्षाला एखाद्या घटनेची माहिती मिळाल्यावर त्या ठिकाणी जाऊन परिस्थितीचा आवाका पाहून पुढील कार्यवाही दोन कर्मचाऱ्यांकडून केली जाते. त्यानंतर सुरुवातीला चौकीतील आणि गरज पडल्यास पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले जाते. परंतु, आता चौक्यांसाठी नियुक्ती केलेले कर्मचारी कुलूप लावून दुपारी गायब होत असल्याने अचानक तत्काळ मदत हवी असल्यास आणि चौकीत नागरिक आल्यास त्यांना दाराला कुलूप पाहून परतावे लागत आहे. पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रापैकी एखादा परिसर आणि ठाणे यामध्ये किमान ४-५ किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे चौक्यांमध्ये २४ तास कर्मचारी उपस्थित असणे क्रमप्राप्त आहे. परंतु, केवळ येणाऱ्यांची गाऱ्हाणी ऐकून त्यांना पोलीस ठाण्यात धाडणे या पलीकडे फारसे काम आता चौक्यांमधील कर्मचाऱ्यांना उरले नसल्याचा समज, या अंमलदारांना झालाय का, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
घात-अपघाताच्या ठिकाणी नियंत्रण कक्षाला मिळालेल्या माहितीनंतर ‘मार्शल’ आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत चौक्यांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पोहोचणे आवश्यक असताना भर दुपारी दररोज कुलूप लावून हे पोलीस जातात कुठे याचा शोध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. शहरभरातून खरेदी आणि अन्य कारणांसाठी नागरिकांची गर्दी होणारा परिसर म्हणून पुणे लष्कर परिसराकडे पाहिले जाते. प्रातिनिधीक स्वरूपात 'सीविक मिरर'ने पाहणी केलेल्या याच परिसरातील चारही चौक्यांना कुलूप लावल्याचे दिसून आल्याने पोलिसांना या परिसराबाबत खरोखरीच किती गांभीर्य आहे, हे वरिष्ठ अधिकारी या चौक्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात यातून स्पष्ट होणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.