पत्नीनेच चिरला पतीचा गळा
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
लग्नानंतर महिनाभरात पतीकडून होणाऱ्या असह्य अत्याचाराला कंटाळून पतीचा खून केल्याची कबुली पत्नीने दिली आहे. या प्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली असून, तिला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गहुंजे येथे रविवारी दुपारी गळ्यावर वार करून पत्नीने आपल्या वडिलांच्या शेतात पतीचा खून केल्याची घटना घडली होती. त्यानंतर सोमवारी दुपारी खून झालेल्या युवकाच्या नातेवाईकांनी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेला. आरोपी महिलेच्या आई-वडिलांसह अन्य नातेवाईकांची चौकशी करून संशयित वाटल्यास त्यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
अंकिता सूरज काळभोर असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तर, सूरज राजेंद्र काळभोर (वय २९, रा. आकुर्डी) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी सूरज यांच्या आईने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी सकाळी अंकिताने सूरज यांना शिरगाव येथे प्रतिशिर्डी मंदिरात दर्शनासाठी नेले. तेथून तिने सूरज यांना गहुंजे येथील तिच्या वडिलांच्या शेतात फिरायला नेले. शेतात फिरताना सूरज बेसावध असल्याचे पाहून तिने त्यांच्यावर धारदार हत्याराने वार करून खून केला असल्याचे सूरज यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी अंकिताला अटक केली असून, तिला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अंकिता आणि सूरज या दोघांचा एक महिना पाच दिवसांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर केवळ १० दिवस अंकिता सूरजसोबत सासरी राहिली. या कालावधीत सूरजने आपल्यावर असह्य अत्याचार केल्याचा दावा अंकिता करत आहे. त्याने आपला गळा दाबला होता. त्यामुळे तो कधीही घात करू शकत असल्याची भीती वाटल्याने आपण जवळ सुरा बाळगत असल्याचे अंकिताने पोलिसांना सांगितले.
लग्नाला महिना झाल्यावर सासरी जेवायला बोलावले असल्याचे सांगून अंकिता पती सूरजला गहुंजे येथे घेऊन गेली. त्यानंतर शेत दाखविण्यासाठी ती त्याला शेतात घेऊन गेली. तिकडे दोघे गप्पा मारत बसले असताना स्वच्छतागृहात जाऊन येते असे सांगून ती बाजूला गेली आणि त्यानंतर येऊन थेट सूरजच्या गळ्यावर वार केला. गळ्याची मुख्य नस तुटल्याने सूरज रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर अंकिताने त्याच्या डोक्यात दगड आणि टिकावचा लाकडी दांडा मारून त्याचा खून केला.
पोलिसांच्या भीतीने चार लोकांनी येऊन लुटण्याच्या उद्देशाने आम्हाला मारहाण केली आणि त्यात सूरजचा मृत्यू झाला व मी बेशुद्ध पडले, असा बनाव अंकिताने केला होता. मात्र, पोलिसांसमोर तिचा बनाव टिकला नाही. तरीदेखील तिच्यासह या गुन्ह्यात अन्य कोणी साथीदार आहे का याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. तळेगाव दाभाडे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.