मर्जी है आपकी, आखिर सिर है आपका !
विजय चव्हाण/ महेंद्र कोल्हे
TWEET@rvijayCmirror @mahendrakmirror
शहरातील प्राणांतिक अपघातांचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट शहर पोलिसांनी ठेवले होते. शहरात होणाऱ्या अपघाती मृत्यूंमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी त्यांनी हेल्मेटचा वापर करावा, असा आग्रह शहर पोलिसांनी धरला. त्यानुसार गेल्या वर्षी एक जानेवारीपासून शहरात हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याला पुणेकरांनी नेहमीप्रमाणे कडाडून विरोध केला. मात्र पुढे दबावापोटी कारवाई थंडावली. 'सीसीटीव्ही'द्वारे कारवाई करून घरपोच चलन पाठविण्याची सूचना करण्यात आली आणि पुढे हेलमेट्स कपाटात गेली, ती कायमचीच.
परिस्थितीचा फायदा घेत अनेक दुचाकीस्वार आता बिनदिक्कत विनाहेल्मेट रस्त्यावर फिरत आहेत. काहीजण तर पोलिसांना वाकुल्या दाखवत हेल्मेट चक्क गाडीच्या हँडलला किंवा कॅरियरला लॉक लावून फिरत आहेत.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या २०२१ च्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या वर्षी हेल्मेट न घातलेल्या ४६,५९३ लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यापैकी ३२,८७७ चालक आणि १३,७१६ मागे बसलेले प्रवासी होते. २०२२ मध्ये हीच परिस्थिती असून ४५,००० लोक प्राणास मुकले आहेत. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये हा आकडा ९९० आणि ९०० च्या आसपास आहे.
मूळ उद्देशच लक्षात न आल्याने शेकडो तरुण वेगाच्या नशेत डोक्याला जखमा होऊन अकाली मृत्युमुखी पडत आहेत किंवा कायमचे जायबंदी होत आहेत. केस गळण्याच्या किंवा गरम होत असल्याच्या काही भ्रामक कल्पनांमुळे असे हेल्मेट गाडीला अडकवून चालवणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. पोलीसही लायसन्स तपासणी करण्यात आणि चिरिमिरीच्या मागे लागतात, पण त्यांचे प्रबोधन करताना दिसत नाहीत.
पुण्यात पुन्हा १ एप्रिल २०२२ पासून हेल्मेटसक्तीचा निर्णयही घेण्यात आला होता. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी तसे आदेशही जारी केले होते. मात्र, नेहमीप्रमाणे लोकाेपवादाच्या भयाने पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेटसक्ती नसेल असं स्पष्ट करण्यात आले. मात्र शासकीय कर्मचारी, शाळा आणि महाविद्यालयांतील दुचाकीधारक अधिकारी, कर्मचारी यांना हेल्मेट बंधनकारक करण्यात आले असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तसेच, हेल्मेटसक्तीचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं होतं. मात्र, देशमुख यांनी कोणत्याही प्रकारची हेल्मेटसक्ती नसेल असे नंतर स्पष्ट केले आणि लगोलग कारवाई जी थंडावली ती अगदी आजपर्यंत. एखादा दुचाकीस्वार विनाहेल्मेट सापडलाच तर कारवाई इतर वाहतूक नियमभंगासाठी होते. हेल्मेटची कारवाई मात्र सीसीटीव्हीच्या माध्यमातूनच होते, असे सांगितले जाते.
या संदर्भात वाहतूकतज्ज्ञ सुमेघ दाते, म्हणाले, " पुण्यात रस्ते अपघातामध्ये मृत्यू होणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. यात हेल्मेटशिवाय गाडी चालवल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन दगावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कार चालकांच्या तुलनेत दुचाकी वाहन चालकांचा अपघात होऊन मृत्यू होण्याचा धोका सातपट वाढलाय. रस्ते अपघातात जीव गमावलेल्यांपैकी ६२ टक्के चालकांचा मृत्यू डोक्याला इजा झाल्यामुळे झालाय. हेल्मेटसक्तीमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता ८० टक्के आहे. त्यामुळे हेल्मेट सक्तीचा निर्णय हा नागरिकांच्या जिवाच्या दृष्टीने योग्य आहे," असेही ते म्हणाले.
या संदर्भात वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, "वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने विरुध्द दिशेने येणे, सिग्नल तोडणे, एकाच दुचाकीवरून तिघांनी प्रवास करणे आणि झेब्रा क्रॉसिंगवर उभे असलेल्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. डोक्यात हेल्मेट नाही म्हणून वाहन अडवून कारवाई करणे पोलिसांकडून थांबविण्यात आले आहे, पण इतर कारणांसाठी वाहन अडविले असल्यास आणि हेल्मेट नसल्यास काही वेळा विनाहेल्मेटचाही दंड घेतला जातो. विनाहेल्मेटची कारवाई प्रामुख्याने चौकाचौकांमध्ये बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे केली जात आहे. सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनांचे फोटो या कॅमेराद्वारे काढले जातात. त्यानुसार संबंधित वाहनाच्या नोंदणी क्रमांकानुसार मालकाला मोबाईलवर दंडात्मक कारवाईचा संदेश पाठविला जातो. सध्या या कारवाईवरच पोलिसांचा जोर आहे."
याविषयी पुणे पोलीस वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे म्हणाले, ‘रस्त्यावर पोलिसांकडून हेल्मेटबाबत कारवाई केली जात नाही. झेब्रा क्रॉसिंग, ट्रिपल सीट, सिग्नल तोडणे, विरुध्द दिशेने वाहन नेणे या चार प्रमुख कारणांसाठीच अधिक कारवाई केली जाते. विना हेल्मेटची कारवाई केवळ सीसीटीव्हीद्वारेच केली जात आहे. रस्त्यावर पोलिसांकडून हेल्मेटबाबत कारवाई केली जात नाही. झेब्रा क्रॉसिंग, ट्रिपल सीट, सिग्नल तोडणे, विरुध्द दिशेने वाहन नेणे या चार प्रमुख कारणांसाठीच अधिक कारवाई केली जाते. विना हेल्मेटची कारवाई केवळ सीसीटीव्हीद्वारेच केली जात आहे.’
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.