IT Park : आयटी पार्क नाव, पण विजेचा लपंडाव

उन्हाळा सुरू झाल्याने विजेचा वापर सध्या वाढला असतानाच म्हाळुंगे-बालेवाडी आयटी पार्क परिसरातील हाउसिंग सोसायटीतील फ्लॅटधारकांना गेल्या तीन दिवसांपासून विजेच्या लंपडावाचा त्रास सहन करावा लागत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 22 Apr 2023
  • 05:36 am
आयटी पार्क नाव, पण विजेचा लपंडाव

आयटी पार्क नाव, पण विजेचा लपंडाव

भर उन्हाळ्यात तीन दिवसांपासून नागरिक त्रस्त, अायटीयन्सच्या ‘वर्क फ्राॅम होम’ला फटका, सोसायट्यांतील लिफ्ट पडताहेत बंद

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

उन्हाळा सुरू झाल्याने विजेचा वापर सध्या वाढला असतानाच म्हाळुंगे-बालेवाडी आयटी पार्क परिसरातील हाउसिंग सोसायटीतील फ्लॅटधारकांना गेल्या तीन दिवसांपासून विजेच्या लंपडावाचा त्रास सहन करावा लागत आहे.

हिंजवडी आयटी पार्क परिसराला लागूनच असलेल्या या परिसरातील अनेक अभियंत्यांचे सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. त्यातच उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि वातावरणातील उकाड्याने विजेचा वापर वाढला आहे. मात्र, ‘‘वापर वाढला आणि समस्या सुरू झाली असे नाही, तर आम्हाला वर्षभर विजेच्या लपंडावाचा त्रास होत असतो,’’ अशा संतप्त प्रतिक्रिया या भागातील स्थानिकांकडून येत आहेत.

श्री शिवाजी छत्रपती क्रीडा संकुल परिसराच्या आसपास मोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. उंच इमारती असल्याने येथे प्रत्येक सोसायटीसाठी लिफ्टही अत्यावश्यक झाली असून, जनरेटर बॅकअप असूनही दिवसभरात सारखी वीज ये-जा करीत असल्याने लिफ्ट बंद पडत आहेत. त्यामु‌ळे वृद्ध लोकांना दिवस-दिवस घरातून बाहेर पडता येत नाही.

दुसरीकडे जनरेटर बॅकअप वाढविण्यासाठी डिझेलचा खर्च वाढत असून, वारंवार होणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे म्हाळुंगे-बालेवाडी हाउसिंग सोसायटी फेडरेशनने ट्विटरवरून महावितरणच्या कारभारावर टीका केली. ट्विटर प्रतिसाद देत महावितरणने हा प्रश्न लवकरच मार्गी काढला जाईल, असे सांगतानाच काही तासांत समस्येचे निराकरण झाल्याचे जाहीर केले. परंतु, त्यानंतरही ही समस्या संपलेली नसल्याने नागरिक अधिकच संतापले आहेत.

अत्यावश्यक दैनंदिन गरजांसाठीदेखील विजेचा वापर करता येत नसल्याने आम्हाला सोसायटी मेंटेनन्समध्ये वाढ करून जनरेटरचा खर्च भागवावा लागत असल्याचे या नागरिकांचे म्हणणे आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story