आवारे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
किशोर आवारे यांच्या हत्येच्या तपासासाठी आता पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या एसआयटीत तळेगाव दाभाडेबाहेरील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी (१२ मे) नगरपरिषदेत भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने घाव घालून हत्या करण्यात आली. याप्रकरणी आवारे यांच्या मातोश्री आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष सुलोचना आवारे यांनी फिर्याद दिली होती. तर राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनिल शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे आणि अन्य चार ते पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर अवघ्या काही तासात आवारे यांचे प्रत्यक्ष मारेकरी शाम अरुण निगडकर (वय ४६, रा. डोळसनाथ आळी, तळेगाव दाभाडे), प्रवीण संभाजी धोत्रे (वय ३२), संदीप उर्फ नन्या विठ्ठल मोरे (वय ३२, रा. आकुर्डी), श्रीनिवास उर्फ सिनु व्यंकटस्वामी शिडगळ (रा. देहूरोड) आणि या आरोपींना मदत करणारा आदेश विठ्ठल धोत्रे (वय २८, रा. नाणे, ता. मावळ) तसेच आवारे यांच्या हत्येची सुपारी दिली म्हणून माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे आदींना अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हेशाखेच्या विविध पथकांनी वरील आरोपींना अटक केली असून, एका आरोपीला पुण्यातील खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती.
दरम्यान, आमदार सुनिल शेळके यांनी पत्रकार परिषद घेत, राजकीय सूड भावनेतून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले होते. मावळ तालुक्यातील हिंसाचाराच्या घटनांची संख्या लक्षात घेत किशोर आवारे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी घेतला. महत्त्वाचे म्हणजे देहूरोड सहायक आयुक्तांऐवजी या एसआयटीचे प्रमुख चाकण विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांना करण्यात आले आहे. तर पिंपरी, वाकड पोलीस ठाण्याचे निरीक्षक, एक सहायक निरीक्षक यांचा समावेश एसआयटीमध्ये करण्यात आला आहे. तसेच तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील केवळ एका अधिकाऱ्याला या एसआयटीत स्थान देण्यात आले असून, स्थानिक हस्तक्षेप टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. गुन्हेशाखेच्या उपायुक्त स्वप्ना गोरे, अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी आणि पोलीस सहआयुक्त डॉ. संजय शिंदे एसआयटीच्या तपासावर लक्ष ठेवून आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.