इनोव्हाची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
नितीन गांगर्डे
पुणे- पानशेत रस्त्यावर खडकवासला चौपाटी परिसरात शुक्रवार, ५ मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास दुचाकीला इनोव्हा कारने समोरून जोरदार धडक दिली. या धडकेने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून दुसऱ्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. इनोव्हाचा वेग जास्त असल्याने तिने दुचाकीला सुमारे वीस ते तीस फूट अंतरापर्यंत फरफटत नेले.
नितीन भाऊसाहेब मुसमाडे (वय ३२) असे अपघातात मुत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो नऱ्हे, ता. हवेली येथील रहिवासी आहे. दुचाकीवरील दुसऱ्या तरुणाचे नाव राम गणपत राठोड (वय २७) असे असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर काशीबाई नवले रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खडकवासला चौपाटीवरील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे अडीचच्या सुमारास दुचाकीस्वार डोणजे गावाकडून पुण्याकडे जात होते. रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर वाहतूक कमी होती. यामुळे वाहने वेगात होती. या वेळी पुण्याकडून वेगाने येणाऱ्या इनोव्हाची दुचाकीला धडक बसली. इनोव्हाचा वेग जास्त असल्याने तिने दुचाकीला सुमारे वीस ते तीस फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. अपघातानंतर अंधाराचा फायदा घेऊन इनोव्हा चालक काही क्षणातच पसार झाला.
यावेळी सुरक्षारक्षकांनी अपघाताची माहिती तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, पोलीस उपनिरीक्षक डी. पी. शिंदे घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका आल्यानंतर राम राठोडला खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. अपघातात मृत्यू झालेल्या नितीन मुसमाडे याचा मृतदेह तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून इनोव्हाचा शोध घेण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी सांगितले. खडकवासला चौपाटी परिसरात रस्त्यावर खड्डे आहेत. तसेच रस्ता अरुंद आहे. त्यामुळे वाहनाचा वेग, खड्ड्यातून गाडी स्लिप होणे हे अपघाताचे कारण असण्याची शक्यता खडकवासलाचे सरपंच मते यांनी व्यक्त केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.