जखमी अन् आजारी बिबट्या आसऱ्यासाठी शिरला थेट घरात
सीविक मिरर ब्यूरो
आजारी असलेला एक बिबट्या आसऱ्यासाठी थेट घरात शिरल्याचा प्रकार आंबेगाव तालुक्यातील पाटण परिसरात घडला. रामचंद्र गणपत मसळे यांच्या घरात बिबट्या घरात शिरला त्यावेळी त्यावेळी घरात फक्त महिलाच होत्या. त्यांनी अत्यंत सावधानतेने बिबट्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. बुधवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली.
आदिवासी भागात असणाऱ्या पाटण गावच्या हद्दीत बिबट्या सकाळी मुसळे यांच्या घरात शिरला. भिजलेला बिबट्या जखमी अवस्थेत असल्याने घरात अडचणीच्या जागेत जाऊन बसला होता. त्याची शेपटी ही सडली होती. जखमी, आजारी असल्यामुळे त्याला घरातून बाहेर काढणे अवघड झाले होते. परंतु, वन विभागाच्या रेसक्यु टीममुळे व स्थानिकांच्या सहकार्याने त्याला जेरबंद करण्यात यश आले. बिबट्या आजारी असल्याने त्याच्यावर माणिकडोह बिबट निवारण केंद्रात उपचार करण्यात येणार असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी एम. बी. गारगोटे यांनी सांगितले.
जुन्नर, आंबेगाव, खेड या आदिवासी बहुल तालुक्यातील अनेक खेड्यात आणि वस्त्यांवर बिबट्यांनी प्रवेश करून जनावरे आणि माणसांवर हल्ले करण्याच्या घटना सतत घडत आहेत. यामुळे गावकऱ्यांत दहशतीचे आणि भीतीचे वातावरण आहे. यामुळे पहाटे आणि रात्री कोणी फारसे घराबाहेर किंवा गावाबाहेर पडत नाहीत. बिबट्या सातत्याने मानवी वस्तीत प्रवेश करत असल्याने गावातील व्यवहारांवरही मर्यादा पडत आहे. अगदीच निकडीचा किंवा आणीबाणीचा प्रसंग असेल तरच लोक रात्री बाहेर पडतात.