उद्योगनगरीत भलतेच उद्योग
सीविक मिरर ब्यूरो
विनयभंग आणि बलात्काराचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी विनयभंगाचे चार गुन्हे दाखल झाले आहेत.
बरेचदा भांडणातून अथवा हाणामारीनंतर परस्परविरोधी गुन्हे दाखल होत असून, त्यामध्ये विनयभंग झाल्याच्या तक्रारीही पोलिसांकडे येत आहेत. दिघी पोलीस ठाण्यात एका २९ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली असून, कुणाल सोपान गायकवाड (वय २३, रा. हडपसर) या युवकाला अटक करण्यात आली आहे. संबंधित महिला आणि कुणाल पूर्वी एकाच सरकारी कार्यालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत होते. दोघांची पूर्वी मैत्री होती. परंतु, कालांतराने संबंधित महिलेने कुणालला भेटण्यास मज्जाव केला. यावरून दोघांमध्ये वाद झाले. याबाबत संबंधित महिलेने कार्यालयात तक्रार केल्यानंतर कुणालला कामावरून काढून टाकले होते. यामुळे तो चिडून होता. शुक्रवारी (दि. २) कुणालने संबंधित महिला आणि तिच्या पतीला भेटायला दिघी भागात बोलाविले. तेथे तिघांमध्ये हाणामारी होऊन तक्रारदार महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची तक्रार दिघी पोलिसांकडे दाखल झाली.
पिंपळे निलख भागात ४२ वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून रुपेश बालवडकरवर गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित महिलेच्या मालकीच्या जागेत रुपेश फरशीचे तुकडे लावत होता. त्यावरून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर रुपेशने अश्लील शिवीगाळ करीत विनयभंग केला, अशी तक्रार सांगवी पोलीस ठाण्यात संबंधित महिलेने दिली.
निगडी येथील ओटास्कीम भागात शंकर भालेराव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला नातेवाईक महिलांशी बोलत होती. तेव्हा भालेरावने पिण्यासाठी पाणी मागितले. परंतु, पाणी न दिल्याने त्याने महिलांना शिवीगाळ करीत तक्रारदार महिलेचा विनयभंग केला.
चाकणनजीक रासे गावात २१ वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरुन सयाजी मुंगसे आणि त्याच्या नातेवाईक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही तरुणी स्वच्छतागृहात असताना आरोपींनी तिचे मोबाईलमध्ये व्हीडीओ शूटिंग केल्याची तक्रार तिने दिली. आरोपींनी मारहाण करून ितचा विनयभंग केला. व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने सयाजीला चाकण पोलिसांनी अटक केली.