Industrial water : ‘औद्योगिक पाणी’ पेटले...

ऐन उन्हाळ्यात महापालिका आणि पाटबंधारे विभागात पाणीप्रश्नावरून जुंपली आहे. महापालिकेला पाटबंधारे विभागाने पाठवलेली औद्योगिक पाणी वापराची श्रेणीच मंजूर नसून, कमर्शिअल (वाणिज्य) पाणी वापरही मोठ्या प्रमाणावर दाखवून वाढीव बिल लावले जात असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यामुळे औद्योगिक पाणीवापर नसलेले आणि कमर्शिअल पाणीवापर १०७.९९ दशलक्ष लिटर (एमएलडी) प्रमाणे ग्राह्य धरावा, अशी मागणी केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 23 Apr 2023
  • 12:25 am
‘औद्योगिक पाणी’ पेटले...

‘औद्योगिक पाणी’ पेटले...

महापालिकेला औद्योगिक पाणीपट्टी मान्य नाही; पाटबंधारे िवभाग म्हणतो, आकारणी राहणारच

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

ऐन उन्हाळ्यात महापालिका आणि पाटबंधारे विभागात पाणीप्रश्नावरून जुंपली आहे. महापालिकेला पाटबंधारे विभागाने पाठवलेली औद्योगिक पाणी वापराची श्रेणीच मंजूर नसून, कमर्शिअल (वाणिज्य) पाणी वापरही मोठ्या प्रमाणावर दाखवून वाढीव बिल लावले जात असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यामुळे औद्योगिक पाणीवापर नसलेले आणि कमर्शिअल पाणीवापर १०७.९९ दशलक्ष लिटर (एमएलडी) प्रमाणे ग्राह्य धरावा, अशी मागणी केली आहे.  

पुणे शहराला प्रामुख्याने खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणातून पाणीपुरवठा केला जातो, तर पवना आणि भामा आसखेड धरणातून पूर्व पुण्यातील काही भागाला पाणीपुरवठा होतो. शहराला जवळपास २० ते २१ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी लागते. यंदा त्यातील १८.३६ टीएमसी पाणी खडकवासला प्रकल्पातून घेतले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पाण्याचा मंजूर कोटा आणि मंजूर कोट्यानंतर अधिकचे पाणी वापरल्यास दीड ते दुप्पट दराने होणारी पाणीपट्टीची आकारणी, घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्य या श्रेणीनुसार होणारा पाणी वापर यावरून महापालिका आणि पाटबंधारे विभागात वाद सुरू झाला आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी पुणे पाटबंधारे मंडळाला पत्र पाठवून औद्योगिक पाणी वापर शून्य असल्याचे सांगितले आहे. इतकेच काय तर, कमर्शिअल (वाणिज्य) पाणीवापर १०७.९९ दशलक्ष लिटर (एमएलडी) असल्याचे कळवले आहे. त्याचबरोबर महापालिकेस मंजूर पाणी १६.५२ टीएमसी आहे. त्यानुसार बिल मिळणे आवश्यक आहे. यापूर्वी केवळ घरगुती आणि औद्योगिक पाणी वापराचे बिल होते. जुलै २०२२ पासून घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्य याप्रमाणे पाणीवापराचे बिल देण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेचा औद्योगिक पाणी वापर शून्य असून, वाणिज्य पाणी वापर १०७.९९ दशलक्ष लिटर असल्याचे कळवले आहे. त्यानंतरही पाटबंधारे विभाग एकूण पाणी वापराच्या १५ टक्के (सुमारे ३ टीएमसी) वाणिज्य आणि ५ टक्के औद्योगिक (सुमारे १ टीएमसी) पाणी वापर दाखवते. त्यामुळे ‘आपण पाठवलेली बिलाची रक्कम वाढली आहे. या कारणामुळे आपण दाखवलेली थकीत बिलाची रक्कम आपल्याला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असे महापालिकेने पाटबंधारे विभागाला कळवले आहे.

खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील म्हणाले, ‘‘पुणे शहरात किती कारखाने आहेत, त्यांना किती पाणी जाते, याची माहिती कळवावी, असे आम्ही महापालिकेला सांगितले आहे. महापालिका म्हणते, आम्ही उद्योगांनादेखील केवळ पिण्यासाठीच पाणी पाठवतो. मात्र उद्योगांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पाणी लागतेच. त्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्यापैकी फार थोडे पाणी वापर कामगारांना पिण्यासाठी वापरले जाते. या कारणावरून उद्योगांना घरगुतीदराने पाणीपुरवठा करता येणार नाही. शिवाय महापालिकेकडे उद्योगांना नेमके किती पाणी दिले जाते, याची माहिती नाही. महापालिकेने औद्योगिक आस्थापनांना मीटरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जाणार असल्याचे सांगितले आहे. बदललेल्या नियमानुसार २०२२ पासून घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्य असा पाणी पुरवठा केला जातो. त्यात बदल करता येणार नाही. त्यामुळे औद्यागिक पाणीपट्टीची आकारणी कायम राहणार आहे.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story