अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन सहा डुकरांना जिवंत जाळले

पिंपरी-चिंचवड येथे शुक्रवारी, १७ मार्च रोजी सात जिवंत डुकरांना जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पिंपरीतील रसरंग चौकातील एच. ए. या मैदानात सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 21 Mar 2023
  • 11:29 am
अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन सहा डुकरांना जिवंत जाळले

अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन सहा डुकरांना जिवंत जाळले

प्रदीर्घ आजारपण जाण्यासाठी केला अघोरी प्रकार; एच.ए मैदानावर दिवसा उजेडी घडला प्रकार

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

पिंपरी-चिंचवड येथे शुक्रवारी, १७ मार्च रोजी सात जिवंत डुकरांना जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पिंपरीतील रसरंग चौकातील एच. ए. या मैदानात सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पिंपरी परिसरातून एका छोट्या टेम्पोमध्ये डुक्कर भरून आणण्यात आले. पाय बांधून आणलेल्या या सात प्राण्यांना रसरंग चौकातील एच. ए. मैदानावर नेण्यात आले. प्राण्यांना टेम्पोमधून नेताना येथील स्थानिक नागरिक प्रज्वल कमलेश दुबे यांनी पाहिले. प्रज्वल दुबे हे पिंपरी-चिंचवड येथील रहिवासी असून ते पेशाने वकील आहेत. सकाळी न्यायालयात जात असताना त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला. यात काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्याने त्यांनी या ठिकाणी थांबत पुढे काय घडत आहे यावर लक्ष ठेवले. पाय बांधलेल्या अवस्थेतील सात प्राणी येथील मैदानावर उतरवून येथील दगडाला गुलाल, गंध लावत ते पूजा करू लागले. दुबे यांनी तत्काळ महानगरपालिकेतील पशुवैद्यकीय विभागाला फोन करून हा प्रकार कळवला. महापालिकेतील आरोग्य निरीक्षक श्रीकांत कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी येथील मैदानावर एक जिवंत डुक्कर पाय बांधलेल्या अवस्थेत दिसून आले. थोडे पुढे जात पाहणी केल्यास ओळीने सहा डुक्कर जळत असल्याचा धक्कादायक प्रकार दुबे यांच्या निदर्शनास आला. यावेळी चाळीस लोक त्यांना जाळण्यासाठी उपस्थित होते. दुबे यांनी या सर्व प्रकारचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये केले आहे. आणि तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत चौकशी केली असता तिघांनी हे प्राणी जाळल्याचे समोर आले. सुनील गजरे, बबन गजरे, रामदास गजरे असे त्यांची नाव आहेत.

यातील दोन आरोपी सुनील गजरे (वय २३) आणि बबन गजरे (वय १९)  हे एच.ए. मैदानाजवळील पालात राहात आहेत. येथे ते चार वर्षांपासून राहात असून मूळचे अहमदनगर येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.  तिसरा आरोपी रामदास (वय ४०)  हा ओझर, नारायणगाव येथील साखर कारखान्याजवळ राहतो. एच. ए. या मैदानाजवळील पालात एक वृद्ध महिला अनेक दिवसांपासून आजारी होती. तिचे आजारपण जाऊन बरी व्हावी यासाठी असा अघोरी प्रकार करण्यात आला असल्याचे दुबे यांनी सांगितले.

सहा डुकरे अत्यंत क्रूरपणे जाळून मारल्यामुळे याबाबत प्रज्वल दुबे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी यातील तीनही आरोपीना अटक करत त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ४२९, ३४, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० नुसार कलम (११) १ नुसार गुन्हा नोंदवला आहे. हा सर्व प्रकार अंधश्रद्धेतून झाला आहे. या घटनेतील पुढील तपास चालू आहे अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक रामनाथ पालवे यांनी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story