पुण्यात बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तिकर विभागाचे छापे
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या संशयावरून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिकांशी संबंधित सुमारे ४० ठिकाणांवर गुरुवारी एकाच वेळेस छापा टाकला. पिंपरी कॅम्प, चिंचवडगाव आणि पिंपळे-सौदागर येथील काही बड्या बांधकाम व्यावसायिकांच्या निवासस्थानी गुरुवारी सकाळीच आयकर विभागाचे पथक दाखल झाले होते. याचबरोबर औंधमधील सिंध सोसायटीतील काही बांधकाम व्यावसायिकांच्या घरावरही छापे मारण्यात आले.
पिंपरी-चिंचवडमधील तीन प्रमुख बांधकाम व्यावसायिकांनी दाखल केलेल्या आयकर विवरणपत्रात अनियमितता असल्याचे कारण देत हे छापे टाकण्यात आले. या छाप्यांव्यतिरिक्त २० ते ३० कोटी रुपयांच्या उत्पन्नावर अपेक्षित आयकर न भरलेल्या सात ते आठजणांच्या घरांची झडती घेण्यात आल्याचे समजते. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभर चाललेल्या या छापेमारीबाबत स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती कळविण्यात आली नव्हती. तसेच स्थानिक पोलिसांची मदत देखील घेण्यात आली नव्हती.
आयकर विभागातील सूत्रांनी सांगितले की, या कंपन्यांचे आर्थिक व्यवहार आणि कर चुकवेगिरीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांची अनेक कागदपत्रे आणि फाइल्सची छाननी सुरू आहे. प्राप्तिकर विभागाची सुमारे चार ते पाच पथके पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आयकर विभागाने छाप्यांमध्ये लक्ष्य करण्यात आलेल्या व्यावसायिकांची नावे उघड केलेली नाहीत. तसेच जप्त करण्यात आलेल्या रकमेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. बांधकाम व्यवसायाची छाननी सुरू असून, आयकर विभाग या कारवाईवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. छापे हे करचोरी रोखण्यासाठी आणि कर नियमांचे पालन करण्यासाठी विभागाच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहेत. छाप्यांदरम्यान अधिकार्यांनी संगणकांमधून कागदपत्रे आणि काही इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले, परंतु आयकर विभागाने त्याबद्दल काहीही उघड केले नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.