सिंहगड रस्ता वाळीत

मागील काही वर्षांत वाहतूक कोंडीने पुणेकरांचे कंबरडे मोडणारा रस्ता म्हणून नरवीर तानाजी मालुसरे रस्त्याची (सिंहगड रस्ता) ओळख बनली आहे. राजाराम पूल ते धायरी फाट्यापर्यंत सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत रस्त्याचा जीव गुदमरून जातो. त्यातच उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने त्यात आणखीच भर पडली आहे. पण हा रस्ता महापालिकेसह वाहतूक पोलिसांनीही वाळीत टाकल्यासारखा झाला आहे. दोन्ही यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवत असून वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 16 Feb 2023
  • 12:01 pm
 सिंहगड रस्ता वाळीत

सिंहगड रस्ता वाळीत

राजाराम पूल ते वीर बाजी पासलकर चौक मार्गाला वाहतूक कोंडीसह महापालिका आणि वाहतूक विभागाच्या अनास्थेचे ग्रहण

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@Rajanandmirror

मागील काही वर्षांत वाहतूक कोंडीने पुणेकरांचे कंबरडे मोडणारा रस्ता म्हणून नरवीर तानाजी मालुसरे रस्त्याची (सिंहगड रस्ता) ओळख बनली आहे. राजाराम पूल ते धायरी फाट्यापर्यंत सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत रस्त्याचा जीव गुदमरून जातो. त्यातच उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने त्यात आणखीच भर पडली आहे. पण हा रस्ता महापालिकेसह वाहतूक पोलिसांनीही वाळीत टाकल्यासारखा झाला आहे. दोन्ही यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवत असून वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे.

संपूर्ण सिंहगड रस्त्यावर दोन-तीन अपवाद वगळता कुठेही ‘नो पार्किंग’ किंवा ‘नो हॉल्टिंग’ तसेच ‘ना फेरीवाला क्षेत्र’ दिसून येत नाही. तसेच पार्किंगसाठी पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रस्त्याला कुणी वाली आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जानेवारीत झालेल्या जी-२० परिषदेच्या बैठकीसाठी पुणे विमानतळ ते सेनापती बापट रस्ता चकाचक करण्यात आला. इतर रस्त्यांवरही डागडुजी करून ते देखणे करण्यात आले. पार्किंगचे पट्टे, ‘नो पार्किंग’ तसेच इतर दिशादर्शक फलक, नवीन विजेचे खांब लागले, रंगरंगोटी झाली. पण यातील काहीच सिंहगड रस्त्याच्या वाट्याला आले नाही. सारसबागेपासून हा रस्ता सुरू होतो. तिथून नवले पुलापर्यंत या रस्त्याची पाहणी करण्यात आली. या संपूर्ण पट्ट्यात सिग्नलचे चौक सोडले तर क्वचितच एखाद्या ठिकाणी नो पार्किंग, नो हॉल्टिंग, पार्किंगचे फलक आढळून आले. संपूर्ण रस्त्यावर कुठेही पार्किंगसाठी पांढरे पट्टे आढळून आले नाहीत.

सिंहगड रस्त्यावरून दररोज लाखो वाहनांची ये-जा होते. अनेक दुकाने, बँका, रुग्णालये, शाळा, निवासी इमारती या रस्त्यावर आहेत. त्यासाठी रस्त्यावर पार्किंगसह इतर फलक असणे आवश्यक आहे. तसे पांढऱ्या रंगाचे पट्टेही हवेत. जेणेकरून वाहनचालकांकडून त्याच ठिकाणी वाहने उभी केली जातील. सध्या राजाराम पूल ते नवले पुलाच्या अलीकडील चौकापर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काही ठिकाणचे पदपथ काढण्यात आले आहेत. पण दुचाकींसह चारचाकी वाहने कुठेही, कशीही उभी केली जात आहेत. एक चारचाकी वाहन, बस किंवा इतर मोठी वाहने उभी राहिली तरी मागील बाजूस वाहनांच्या रांगा लागतात. त्यातच अरुंद रस्त्यावरच वाहने  जात असल्याने कोंडीत भर पडते.

वाहनचालकांकडून पदपथही सोडले जात नाहीत. त्यातच रस्त्यावरील अतिक्रमणाकडेही पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. एखादी कारवाई केल्यानंतर त्याकडे अनेक महिने पाहिलेच जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. रस्त्यासह पदपथावरही भाजीविक्रेते, खाद्यपदार्थ्यांच्या गाड्या उभ्या असतात. परिणामी पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. गर्दीतून मार्ग काढताना ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांची तारांबळ उडते. हा ताण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महापालिकेला दोन महिन्यांपूर्वी पत्र देत विविध फलक लावणे, पार्किंगसाठी मार्किंग करण्याची विनंती केली आहे. पण असे पत्र आपल्याला मिळालेच नसल्याचा दावा महापालिकेच्या पथ विभागाकडून केला जात आहे.

काही ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून कारवाई करत वाहने उचलून नेली जातात. पण फलकच नसल्याने कारवाई कशी होते, असा सवाल नागरिकांकडून केला जातो. त्यावरून अनेकदा वादही होतात. याविषयी बोलताना सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक पांडूरंग वाघमारे म्हणाले, ‘‘नो पार्किंग, नो हॉल्टिंग तसेच पार्किंगचे पट्टे मारण्याबाबत पालिकेला दोन महिन्यांपूर्वीच पत्र लिहिले आहे. पुलाच्या कामामुळे ठिकठिकाणी रस्ता अरुंद झाला असल्याने कोंडी होत आहे. तसेच काही ठिकाणी अतिक्रमणही आहे. नो पार्किंग, नो हॉल्टिंग, ना फेरीवाला क्षेत्र असे फलक बसविल्यास किमान नागरिकांना त्याची माहिती होईल. सध्या फलक नसल्याने कुठे वाहने उभी केली जात आहे. कोंडी कमी करण्यासाठी कारवाई करावी लागते. सध्या ही कारवाई थांबविली आहे. गोयल गंगा इमारतीच्या परिसरात कारवाई सुरू आहे.’’

माणिकबाग प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाभाऊ पासलकर यांनी सिंहगड रस्ता झाल्यापासूनच याकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगितले. ‘‘कुठेही फलक नाहीत, पार्किंगसाठी पट्टे नाहीत. तरीही पोलीस कारवाई करतात. यावरून वादही होतात. रहिवाशांसह विविध कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना वाहन उभे करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. पालिकेने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले,’’ अशा शब्दांत पासलकर यांनी नाराजी व्यक्त केली. दररोज सिंहगड रस्त्याने ये-जा कऱणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमधील वाहक तानाजी कांबळे यांनीही वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सांगितले. ‘‘कोंडीमुळे बस वेळे पोहचत नाही. काहीवेळा मी बसमधून खाली उतरून वाहतूकीचे नियमन केले आहे. प्रवाशांनाही त्याचा फटका बसतो. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजना करायला हव्या,’’ असे कांबळे म्हणाले.

पोलिसांनी पत्र पाठवल्याचा दावा पालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता विजय कुलकर्णी यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, ‘‘पोलिसांकडून आम्हाला याबाबतचे कोणतेही पत्र मिळालेले नाही. पोलिसांनी पत्र दिल्यानंतर त्यातील मागणीनुसार आम्ही फलक बसविण्याचे काम करतो. पण तसे पत्र आम्हाला मिळालेले नाही.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story