ईडीमुळे नाही जनहितासाठी सत्तेत
विजय चव्हाण
ईडीमुळे मी साहेबांची साथ सोडली नाही. मला ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्सची नोटीस आलेली नाही. कुठलेही व्यक्तिगत हित यामागे नाही. एका विद्वानाने सांगितले की, पराग आणि गोवर्धन डेअरीला नोटीस आली म्हणून हा निर्णय घेतला, हा आरोप चुकीचा आहे. जनहिताचा विचार करून मी सत्तेत गेलो असल्याचे सांगत दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. डिंभे धरणाच्या पाण्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले आहे.
वळसे पाटील यांनी त्यांच्या आंबेगाव मतदारसंघातील मंचर येथील कार्यकर्ता मेळाव्यात रविवारी हे वक्तव्य केले. मी राजकारणाला हपापलेलो नाही. मात्र, विकासाच्या दृष्टीने आपण काही निर्णय घेतले असल्याचे वळसे पाटील यांनी म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. अजित पवार यांनी केलेल्या बंडाच्या वेळी वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
ज्यांचे वय ३७ वर्षे आहे. मला राजकारणात येऊन ४० वर्षे झाली आहेत. माझे अनुभव पाहता त्यांचे वय कमी आहे. त्यांनी एक पोस्ट टाकली की साहेबांनी तुम्हाला आणखी काय द्यायला हवे? माझी आणि रोहित पवारांची एकदा भेट झाली. तुमच्या मतदारसंघाचा प्रश्न असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो आणि तुम्ही आंबेगाव विधानसभेतून उभे राहा. त्यामुळे या व्यतिरिक्त माझे कोणतेही भांडण नाही. मी साहेबांच्या कुटुंबाविरोधात कधीच जाऊ शकत नाही, असे स्पष्ट मत वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
एकनाथ शिंदे जेव्हा सगळे आमदार घेऊन गेले, तेव्हा दिलीप वळसे यांनी त्यांना गृहमंत्री म्हणून मदत केली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले की, उलट उद्धव ठाकरेंना सहा महिन्यांपासून आम्ही सांगत होतो, तुमचे आमदार फुटणार आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना कळवले होते. मग मी मदत करण्याचा प्रश्न येतो कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शरद पवार यांचे समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा आरोप केला होता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.