पिंपरीत कोयता गँगने मेडिकल दुकानात घातला धुडगूस
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
‘हत्यारे पकडा अन् बक्षीस मिळवा’ या पोलिसांसाठी राबवलेल्या योजनेला भरपूर प्रतिसाद मिळाल्यानंतरही पिंपरी गावात कोयता गँगने पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून मेडिकल दुकानातील युवकावर खुनी हल्ला चढवला. तसेच या दुकानाची तोडफोड केली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चारजणांकडून या हल्ल्यापूर्वी पिंपरीमधीलच खराळवाडी परिसरात वाहनांची तोडफोड करून चार हजार रुपये लुटल्याचा गुन्हा उघड झाला आहे.
मेडिमार्ट मेडिकलमध्ये शुक्रवारी (२८ एप्रिल) मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास हा प्रकार घडला आहे, तर यापूर्वी याच टोळक्याने खराळवाडी येथे वाहनांची तोडफोड करीत एका व्यक्तीकडून पैसे लुटले आहेत. किरण प्रकाश डोंगरे (वय १९, रा. मिलिंदनगर, पिंपरी), प्रेम प्रकाश डोंगरे (वय १८), मोहित सिंग (वय १९), अनिकेत हातमकर (वय १९), सुबोध गायकवाड (वय १८), अवी निंबाळकर (वय १९), राहुल यादव (वय १९), साईनाथ पाटोळे (वय १९) व सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करून, मोहीत, अनिकेत, साईनाथ, सुबोध या चौघांना अटक करण्यात आली आहे, तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
अर्जुन नानकचंद वाल्मीकी (वय २७, रा. अशोकनगर, लिंकरोड, पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
अर्जुन वाल्मीकी पिंपरी येथील मेडिमार्ट या मेडिकल दुकानात काम करतात. त्यावेळी त्यांच्या तोंड ओळखीचा किरण डोंगरे हा इतर आरोपींसोबत मेडिकल दुकानात आला. तेव्हा वाल्मीकी यांनी किरणकडे पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितले. त्यामुळे किरण याने तुला पैसे पाहिजेत काय, तुला आता सोडणार नाही, तुला आता खल्लास करून टाकतो, के. डी. भाईच्या पोरांना पैसे मागतो का, असे म्हणत धमकावले आणि या टोळक्याने मेडिकल दुकानात घुसून वाल्मीकी यांच्यावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. तसेच दुकानाची तोडफोड करण्यात आली. यानंतर तेथून पळून जाताना टोळक्याने दुकानातील फ्रिजवर ठेवलेले अडीच हजार रुपये जबदस्ती करत काढून घेतले. तसेच मेडिकल दुकानातील फ्रिजमधील शीतपेयांच्या बाटल्याही पळवल्या. काउंटरच्या काचा फोडून काउंटरचे ३० हजार रुपयांचे नुकसान केले.
या घटनेनंतर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आणि मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून चौघांना अटक केली. तेव्हा या टोळक्याने खराळवाडी येथे एका युवकाला मारहाण करीत, वाहनांची तोडफोड करून चार हजार रुपये लुटल्याचे उघड झाले. दरम्यान या घटनेमुळे पिंपरीत व्यापारी भीतीच्या सावटाखाली आहेत. पुन्हा एकदा कोयता गॅंगची चर्चा सुरू झाली आहे.
‘सीसीटीव्ही’ त घटना कैद
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रात्री-अपरात्री औषधे सहज उपलब्ध होण्यासाठी पिंपरीतील काही मेडिकल दुकानांची सेवा २४ तास सुरू असते. त्यात पिंपरी येथील मेडिमार्ट या मेडिकल दुकानात रात्री उशिरा तोडफोड झाली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांकडून त्याआधारे तपास सुरू आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.