नियमबाह्य ‘स्क्रॅप’ जोरात
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
वाहने ठराविक कालावधीनंतर मोडीत काढण्यासाठी नियमावली आहे. परंतु, या नियमावलीला फाटा देत चिखली-कुदळवाडी भागात अनेक दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहने मोडीत काढली जात असून, राज्यभरातून येथे येणाऱ्या वाहनांची नोंद राहावी यासाठी आता व्यावसायिकांना सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आता अनेक जुनी वाहने मोडीत काढण्यासाठी शासनाकडून नवे स्क्रॅप धोरण आखण्यात आले आहे. २० वर्षांपूर्वीची वाहने मोडीत काढण्याचा पूर्वीचा नियम आहे, तर अनेक अपघातग्रस्त वाहनेही मोडीत काढली जातात.
मात्र, चोरीची आणि एखाद्या गुन्ह्यात वापरली गेलेली वाहने मोडीत काढण्याचा प्रकार कुदळवाडी भागात होत असल्याचा आरोप होत आहे. चिखली आणि कुदळवाडी भागात अनेक दुकानांमध्ये वाहने तोडण्याचे काम चालते. राज्य परिवहन विभागाच्या प्रादेशिक विभागाकडून (आरटीओ) ना-हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर पोलीस विभागाकडे या वाहनांवर कोणत्या स्वरूपाचा गुन्हा अथवा दंड आहे का, हेदेखील तपासणे बंधनकारक आहे. परंतु, बहुतांश व्यावसायिकांकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेतले जात नाही. अशांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सदाशिव तळेकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे देण्यात आले आहे.
चिखली, कुदळवडी आणि पवारवस्ती या भागांमध्ये बेकायदेशीररित्या दुचाकी-चारचाकी वाहने तसेच सहा आणि १२ चाकी अवजड वाहने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता स्क्रॅप केली जात आहेत. गुन्ह्यातील वाहनांची आणि चोरीच्या वाहनांची अशाप्रकारे संपूर्णत: विल्हेवाट लावली जात असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
मागील काही वर्षांमध्ये या भागातील दुकानांमध्ये वाहनांची तोड करण्याचे प्रमाण वाढले आहे. स्क्रॅपसाठी आलेली वाहने कोणाची आहेत? कोणत्या भागातून ही वाहने आणण्यात आली आहेत? परजिल्ह्यातून आणि परराज्यातून वाहने चिखली-कुदळवाडीतच का आणली जात आहेत? आणि ते आणणारे कोण आहेत, याची खातरजमा होत नसल्याचेही दिसून येत आहे.
केवळ स्क्रॅपचा व्यवसाय करण्यापलीकडे गुन्ह्यातील वाहनांना लपविण्याचा हा प्रकार तर नाही ना, अशी शंका तळेकर यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे. आरटीओ आणि पोलिसांबरोबरीनेच वाहनाच्या मालकाचे पत्र वाहन स्क्रॅप करण्यासाठी घेण्यात आले आहे का, याची तपासणी होण्याचीही आवश्यकता आता निर्माण झाली आहे. जुन्या वाहनांसाठी आवश्यक असणारे अनेक स्पेअरपार्ट्स चिखली-कुदळवाडीत विक्रीला ठेवण्यात आलेले असतात. स्पेअरपार्ट्सचा व्यवसाय करणाऱ्या अधिकृत डीलरपेक्षा कमी किमतीत वाहनांचे सुटे भाग उपलब्ध होत असल्याने नागरिकांकडूनही येथे खरेदीसाठी गर्दी होत असते. स्क्रॅप वाहनांचे स्पेअर पार्ट्स सुस्थितीत असल्याने कोणत्या वाहनांची तोड येथे झाली, हे पडताळून पाहण्याची आवश्यकता आहे.
पोलीस म्हणतात, आम्हाला असे आढळले नाही...
‘‘कुदळवाडी, चिखली, पवारवस्ती या भागातील व्यावसायिकांना दुकानांमध्ये सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच प्रत्येक वाहनाची नोंद या व्यावसायिकांनी करणे बंधनकारक आहे. आमचे कर्मचारी, अधिकारी अचानक जाऊन या दुकानांची तपासणी करीत असतात. चोरीची अथवा गुन्ह्यातील वाहनांची या भागात तोडणी होणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत. अद्याप तरी असा प्रकार आढळून आलेला नाही,’’ असे चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डी. बी. काटकर यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.