सीसीटीव्ही नसेल, तरच करायचा चोरी
#पुणे
आपण केलेली चोरी सापडू नये म्हणून पुण्यातील गुन्हेगाराने चांगलीच शक्कल लढवली आहे. मात्र, पुणे पोलिसांनी त्याचा हा प्लॅन हाणून पाडला आहे. गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जातात. हे चोराला माहीत असल्याने त्याने ज्या परिसरात सीसीटीव्ही नाहीत तेथे जाऊन चोरी करण्याचा प्लॅन केला. त्यानंतर काही ठिकाणी चोरीही केली मात्र पोलिसांच्या तावडीतून तो सुटू शकला नाही. पुणे पोलिसांनी तपास करून सीसीटीव्ही नसलेल्या परिसरातही चोरी करणाऱ्या चोराला बेड्या ठोकल्या आहेत.
मागील काही महिन्यांत पुणे ग्रामीण आणि अहमदनगर जिल्ह्यातील दुर्गम भागात दरोडा आणि जबरी चोरी प्रमाण वाढले होते. या गुन्ह्यांचा शोध घेऊन पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून १८ गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी १७ लाख ६४ हजार रुपयांचे तब्बल ३० तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना तसेच, चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सराफलाही नगरमधून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ गुन्ह्यांमध्ये ७ घरफोडी, ५ दरोडे, ४ जबरी चोरी आणि २ किरकोळ चोरी या गुन्ह्यांचा समावेश आहे. आरोपींची झडती घेतली असता, त्याच्याकडून गुन्ह्यातील सोन्याचे दागिने, चोरलेली दुचाकी, घड्याळ, ब्रेसलेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हल्ली ग्रामीण भागात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ग्रामीण किंवा दुर्गम भागात जास्त लोकसंख्या नसल्याने शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरी आणि दरोड्यांचे प्रमाण जास्त आहे. जसे पोलिसांना आरोपींची 'मोडस ऑपरेंडी' ज्ञात असते. तशीच आरोपींनासुद्धा पोलिसांच्या तपासाचे मार्ग माहीत असतात, म्हणून या आरोपींनी चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यांतील तीन आरोपींना पकडणे शक्य झाल्याचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले आहे.
feedback@civicmirror.in