मलाही मुख्यमंत्री व्हायचंय - आमदार रवींद्र धंगेकर
मलाही मुख्यमंत्री व्हायचे आहे, अशी इच्छा पुण्यातील कसबा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली होती. सोमवारी करमाळा येथे काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, बोलण्याच्या ओघातून मी असे बोललो आणि मुख्यमंत्री व्हायला मलाच नाही तर कोणालाही व्हायला आवडेल असे स्पष्टीकरण आज पुण्यात धंगेकर यांनी दिले आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना धंगेकर म्हणाले की, “सोमवारी करमाळा येथे काँग्रेस पक्षाचा कार्यालयाचे उद्घाटन होते. त्यावेळी पत्रकारांनी विचारल्यावर बोलण्याच्या ओघात अजित दादांनाच काय मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे मी बोलून गेलो. अजितदादा हे एक मोठे नेते आहेत, महाविकास आघाडीमध्ये देखील त्यांचे मोठे काम आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील मुख्यमंत्री व्हायला आवडेल, मात्र मला माझी उंची माहीत आहे, मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवते, याबद्दल आता काही बोलणार नाही”, असे स्पष्टीकरण धंगेकरांनी आज दिले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “भाजपाला पराभूत करायचे असेल तर महाविकास आघाडीने एकत्र राहायला हवे, येत्या काळातील निवडणुका या महाविकास आघाडी म्हणूनच लढायला हव्यात, भाजपचे हुकूमशाहीचे राज्य थांबवायचे असेल तर एकत्र राहणे गरजेचे आहे.”
“पुण्यातील वेताळ टेकडीबाबत भाजपची दूटप्पी भूमिका आहे. भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी या वेताळ टेकडी वाचवण्याच्या बाजूने आहेत. मात्र, चंद्रकांत पाटील हे पुण्याचे नाहीत, त्यांना पुण्याची नाळ माहीत नाही,” असेही धंगेकर यावेळी बोलताना म्हणाले.