हुश्श... तो वाघ नाही, वयाने मोठा बिबट्या!
विजय चव्हाण
पुणे जिल्ह्यात वाघांच्या आणि बिबट्यांच्या हल्ल्यात चांगलीच वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील पाबे गावात बिबट्याच्या हल्ल्यात एक गाय आणि दोन कुत्रे मृत्युमुखी पडले आहेत. गावातील विठ्ठलवाडी परिसरात शनिवारी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली होती. मात्र, बिबट्याला जेरबंद करण्यात अद्याप यश आलेले नाही.
दरम्यान, बिबट्या वयाने मोठा असल्याने त्याच्या पायाचे ठसेही मोठे होते. मात्र, पंजाचा मोठा ठसा आढळल्याने तो वाघ असल्याचा समज होऊन नागरिकांची भंबेरी उडाली. यापूर्वी पट्टेरी वाघ दिसण्याच्या सिंहगड व या परिसरात अनेक घटना घडल्या होत्या. त्यामुळे वनविभागाने प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्या पाहणीवरून हा वयाने मोठा असलेला बिबट्या असल्याची खात्री पटली.
वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) गोविंद लंगोटे यांच्या मते या बिबट्याचे पंजे खूप मोठे आहेत. वनविभाग त्याच्या मागावर असून, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय नियमाप्रमाणे मदत देण्यात येणार आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास एका वाघाने केलेल्या हल्ल्यात गाय आणि दोन कुत्र्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गावच्या सरपंच ज्योती रेणुसे, ग्रामपंचायत सदस्य सुनील रेणुसे पाटील यांच्यासह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी शेतकऱ्याची गाय आणि दोन कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडल्याचे लक्षात येताच याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. मात्र, आतापर्यंत बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. त्यामुळे गावकरी दहशतीच्या वातावरणात आहेत. त्यांना घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. तातडीने या वाघाला जेरबंद करावे, अशी विनंती गावकरी करत आहेत. घरातून बाहेर निघताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांनी आपले पाळीव प्राणी अनोळखी परिसरात सोडू नका, तसेच स्वत:ही बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी बाळगा. रात्रीच्या वेळी विजेरी (टॉर्च) सोबत ठेवा, अशा सूचना वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी पाबेमधील नागरिकांना दिल्या आहेत. पाबे ग्रामपंचायत सदस्य सुनील रेणुसे-पाटील म्हणाले, 'गावकरी दहशतीच्या वातावरणात आहेत. घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. दिवसाढवळ्या बाहेर पडण्यासही भीती वाटत आहे. तातडीने या वाघाला जेरबंद करावे, ही विनंती.'