बालविवाह प्रकरणातील पतीचा भाऊ, मौलानास खंडणी विरोधी पथकाकडून अटक
सीविक मिरर ब्यूरो
एका अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याच्या आरोपाखाली पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने पती आणि मौलानास अटक केली आहे. पुणे बालकल्याण समितीच्या सुचनेनुसार सामाजिक कार्यकर्त्याने देहूरोड पोलिसांत तक्रार केल्यावर २४ तासांत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली. पती उमर कासिम शेख, लग्न लावणारा मौलाना आणि अन्य सहा जणांविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात बालविवाहासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे.
बलात्कार, लहान बालकांचे लैंगिक शोषण करणे, फसवणूक करणे, खोटी कागदपत्रे बनवणे, तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणे आदी गंभीर स्वरूपाचे आरोप पोलिसांनी तक्रारीत नमूद केले आहेत. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होते. दरम्यान आरोपी पतीचा भाऊ वसीम कासिम शेख याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली असून अन्य सहा आरोपी फरार आहेत. सामाजिक कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी तक्रार दाखल केली होती.
रमेशन म्हणाले की, "पीडित मुलीचे नातेवाईक तक्रार देत नसल्याने आम्हाला पुढाकार घ्यावा लागला. यामागे एखादे रॅकेट सक्रिय असू शकते. पोलिसांनी सामाजिक दृष्टीने तपास करणे आवश्यक आहे. तसेच अन्य आरोपींना तातडीने अटक करणे आवश्यक आहे."
देहूरोड पोलिसांनी तपासादरम्यान पीडितेचे वय लपवण्यासाठी बनावट आधारकार्ड बनवले असल्याचा संशय व्यक्त केला होता. मुख्य आरोपी उमर कासिम शेख, फरार असून त्याचा भाऊ आणि बालविवाह लावणारा मौलाना मुख्तार यांना अटक केली आहे. बनावट आधारकार्ड तयार करण्यासाठी तसेच आरोपींना मदत करणाऱ्या इतरांचा पोलीस तपास करत आहेत. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती देहूरोड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद गेजेवार यांनी दिली.