शंभरीतील आजोबांचे वोट फ्राॅम होम!
तन्मय ठोंबरे
वय वर्षे १००! वयाच्या ९७ वर्षांपर्यंत मतदान केंद्रात जाऊन न चुकता त्यांनी मतदान केले. यावेळी मात्र ते चांगलेच थकले होते. मतदान केंद्रापर्यंत जाणे शक्य नव्हते. त्यामुळे मतदान करता येईल की नाही, याबाबत साशंकता होती, पण निवडणूक आयोगामुळे त्यांना घरातूनच मतदान करण्याची सुविधा मिळाली अन् त्यांनी शंभराव्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला! त्यामुळे तेही भारावून गेले होते. हरकिसन मोरारजी कापडिया हे या जागरूक मतदाराचे नाव!
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. २६) मतदान पार पडले. पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी कमी असली तरी निवडणूक चुरशीची असल्याने सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाधिक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी जोर लावला होता. ज्येष्ठ, रुग्ण, दिव्यांगांसाठी वाहनांसह आवश्यक ती सर्व सुविधा उपलब्ध करून दिली जात होती. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर रांगा होत्या. काही केंद्रांवर तर मतदानाची वेळ संपून गेल्यानंतरही रांगा दिसत होत्या, तर काहींनी घरात बसून आपला मतदानाचा हक्क बजावला.
निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसह दिव्यांग नागरिकांसाठी टपाली मतदान अर्थात घरात बसून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या दृष्टीने विधानसभा मतदारसंघात निवडणूकविषयक अधिकारी, कर्मचारी घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांना मतदानासाठी उपलब्ध सुविधांची माहिती देत होते. त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात आले होते. त्यानुसार कसबा पेठ मतदारसंघात टपाली मतदानासाठी नोंदणी केलेले ८० वर्षांवरील २९९ ज्येष्ठ नागरिक आणि ४ दिव्यांग मतदारांना प्रत्यक्ष घरातून मतदानाची सुविधा देणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते.
त्यानुसार बुधवार पेठेत राहणारे हरकिसन कापडिया यांनी टपाली मतदान केले. त्यांच्या घरी निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि कर्मचारी आले होते. ते पहिल्यांदाच घरातून मतदान करणार होते. त्यामुळे कापडिया यांना संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. नंतर मतपत्रिका त्यांच्या हातात देऊन सर्व कर्मचारी तसेच कुटुंबातील इतर सदस्य खोलीतून बाहेर गेले. कापडिया यांनी मतपत्रिकेवर एका उमेदवाराच्या नावासमोर खूण करून ती मतपत्रिका घडी घालून पाकिटात ठेवली. त्यानंतर कर्मचारी पाकीट ताब्यात घेऊन निघून गेले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.