Spine road accident : माणुसकीच जखमी

नागरिकांचा अपघात झाल्यावर त्यांना तत्काळ मदत पोहचविण्यासाठी सदैव तत्पर राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला स्वत:च्या अपघातानंतर वेळेवर मदत मिळाली नाही. अपघातानंतर तब्बल अर्ध्या तासाने घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्या जखमी कर्मचाऱ्याला उचलून उपचारासाठी दाखल केले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Fri, 4 Aug 2023
  • 11:58 am
माणुसकीच जखमी

माणुसकीच जखमी

नागरिकांच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहणारा पोलीस कर्मचारी अपघातानंतर रस्त्यावर अर्धा तास रक्ताच्या थारोळ्यातच; मदतीची किंवा अपघाताची माहिती पोलिसांना देण्याचीही तसदी 'सुजाण' पुणेकरांनी घेतली नाही

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

'पीएमपी' चालकाची संवेदनशीलता

मोशी स्पाइन रोड हा २४/७ वाहता रस्ता आहे. या भागात बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, तसेच येथे मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. त्यामुळे कायम वर्दळ असते. अवजड वाहनांसाठी दुचाकी-कारची येथे कायमच ये-जा सुरू असते. परंतु, रस्त्यावर एक व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत पडल्यानंतर त्याला मदत करावी किंवा याबाबत पोलिसांना माहिती द्यावी, अशी तसदीही कोणीच घेतली नाही. गॅस भरण्यासाठी आलेल्या पीएमपी चालकाला ही घटना समजली. त्याने त्याच वेळी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीला थांबवून पोलिसांना ही माहिती दिली. त्यामुळे अपघाताचा   उलगडा झाला.

नागरिकांचा अपघात झाल्यावर त्यांना तत्काळ मदत पोहचविण्यासाठी सदैव तत्पर राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला स्वत:च्या अपघातानंतर वेळेवर मदत मिळाली नाही. अपघातानंतर तब्बल अर्ध्या तासाने घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्या जखमी कर्मचाऱ्याला उचलून उपचारासाठी दाखल केले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मोशी स्पाईन रोडवर बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात घडला. दिवस-रात्र वर्दळीच्या असलेल्या या रस्त्यावर एक व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्यानंतर त्याला मदत करण्याची किंवा त्याबाबत पोलिसांना माहिती देण्याची तसदीदेखील एकाही नागरिकाने घेतली नाही. यामुळे पुन्हा एकदा समाजातील माणुसकीच संपते आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राजेश नामदेव कौशल्य (वय ३४, रा. संतनगर, स्पाइन रोड, मोशी) असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, अंतर्गत रक्तस्राव झाला आहे. कौशल्य यांची नियुक्ती सध्या पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेंतर्गत असलेल्या दरोडा प्रतिबंधक विभागात आहे. कौशल्य आणि अन्य अधिकारी व कर्मचारी बुधवारी (दि. २ ऑगस्ट) एका गुन्ह्यातील आरोपीच्या शोधासाठी गेले होते. संबंधित आरोपीला पकडून आणल्यानंतर सर्व अधिकारी-कर्मचारी बुधवारी मध्यरात्री घरी परतले. 

कौशल्यदेखील त्यांच्या दुचाकीवरून घरी परतत होते. ते मोशी स्पाइन रोडवर आल्यानंतर त्यांचा खंडेवस्ती चौकापुढे आल्यानंतर अपघात झाला. 

घटनास्थळी एक श्वान मृतावस्थेत पडलेले आढळून आले, तर कौशल्य यांच्या हाता-पायाला जखमा झाल्या होत्या आणि त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे भटक्या श्वानाला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना कौशल्य दुचाकीवरून पडले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

मोशी जाधववाडी येथे सीएनजी गॅस पंप आहे. या ठिकाणी पीएमपीएमएलच्या बस रोज रात्री गॅस भरण्यासाठी येतात. पंपावर गर्दी होत असल्याने काही बस स्पाइन रोडवरही थांबलेल्या असतात. शक्यतो रात्री दोननंतर येथे बस रांग लावून थांबतात.

दरम्यान, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत एक गुन्हा घडल्याने काही अधिकारी-कर्मचारी संबंधित ठिकाणी गेले होते. तेथून रात्री अडीचच्या सुमारास हे अधिकारी पोलीस ठाण्याकडे परतत होते, तेव्हा एका पीएमपी बसचालकाने पोलिसांचे वाहन पाहून त्यांना थांबवले आणि एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे सांगितले. कौशल्य हे गुन्हे शाखेत असल्याने ते वर्दीत नव्हते. त्यामुळे ते पोलीस आहेत, हे घटनास्थळी गेलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले नाही. परंतु, नेहमीप्रमाणे अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ मदत करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली. 

मधल्या काळात कौशल्य पोलीस असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे कौशल्य यांच्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि कुटुंबीयांना याबाबत माहिती देऊन एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तत्काळ कौशल्य यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले. परंतु, कौशल्य यांना अर्ध्या तासाहून अधिक काळ तातडीची मदत मिळाली नसल्याने अतिरिक्त रक्तस्राव झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच, कौशल्य यांना पुढील उपचारासाठी अन्यत्र नेण्याची विनंतीही अधिकाऱ्यांना केली. तोपर्यंत दरोडा प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कदम, साहाय्यक निरीक्षक अंबरीष देशमुख आणि अन्य कर्मचाऱ्यांनी वायसीएम रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांच्या विनंतीनंतर कौशल्य यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story