मेट्रोविरुद्ध पीएमपी टिकणार कशी?

महामेट्रोकडून पुढील महिनाभरात वनाज ते रुबी हॉल आणि पिंपरी ते शिवाजीनगर या दोन मार्गांवर मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. हे दोन्ही मार्ग वर्दळीचे असून पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) उत्पन्न मिळवून देणाऱ्या मार्गांपैकी महत्त्वाचे मार्ग आहेत. मेट्रो सेवेमुळे या मार्गावरील पीएमपीचे प्रवासी कमी होऊ शकतात, अशी चर्चा पीएमपीमध्येच आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 4 Apr 2023
  • 01:02 am
मेट्रोविरुद्ध पीएमपी टिकणार कशी?

मेट्रोविरुद्ध पीएमपी टिकणार कशी?

वर्दळीच्या मार्गावर मेट्रो धावल्यावर आधीच तोट्यात असलेल्या पीएमपीचे प्रवासी अन् उत्पन्नही घटणार, प्रशासन बेफिकिर

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@rajanandmirror

महामेट्रोकडून पुढील महिनाभरात वनाज ते रुबी हॉल आणि पिंपरी ते शिवाजीनगर या दोन मार्गांवर मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. हे दोन्ही मार्ग वर्दळीचे असून पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) उत्पन्न मिळवून देणाऱ्या मार्गांपैकी महत्त्वाचे मार्ग आहेत. मेट्रो सेवेमुळे या मार्गावरील पीएमपीचे प्रवासी कमी होऊ शकतात, अशी चर्चा पीएमपीमध्येच आहे. आधीच मोठा तोटा सहन करत असलेली पीएमपी या मार्गांवर मेट्रोला कशी टक्कर देणार, याबाबत प्रशासन फारसे गंभीर नसल्याचे समोर आले आहे. अद्याप या मार्गांबाबत कसलीही चर्चा झालेली नाही.

पुण्यात सध्या कोथरूड ते गरवारे कॉलेज आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाली आहे. या दोन्ही सेवेला फारसा प्रतिसाद मिळत नाही. अंतर कमी असल्याने प्रवाशांना ते सोईचे ठरत नाही. आता मेट्रोकडून हे मार्ग वाढविले जाणार आहेत. वनाजहून निघालेली मेट्रो थेट रुबी हॉलपर्यंत धावणार आहे. तर फुगेवाडीहून थेट शिवाजीनगरपर्यंत मेट्राने प्रवास करता येणार आहे. तिथून दुसऱ्या मेट्रोने रुबी हॉलपर्यंत जाता येईल. हे दोन्ही मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी आशा महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना आहे. याचा फटका पीएमपीला बसू शकतो. केवळ फिडर सेवांवरच पीएमपीला समाधान मानावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. मात्र, या सेवेसाठीदेखील अद्याप बस मिळालेल्या नाहीत.

दोन्ही शहरांमधील रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या वाढत चालली आहे. पीएमपीच्या ताफ्यात पुरेशा बस नाहीत. ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी व्हायचे नाव घेत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या तुलनेत अपेक्षित बस मार्गावर येत नसल्याने ठराविक गाड्या तुडुंब भरून वाहतात. याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांसह रुग्ण, महिलांना होतो. बसच्या या स्थितीमुळे अनेकदा रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. रिक्षाची भाडेवाढ झाल्याने सर्वसामान्यांना ते भाडेही परवडत नाही. तसेच वाहतूक कोंडीमुळे रिक्षालाही विलंब लागतो. मेट्रोचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर पीएमपीसह रिक्षालाही त्याचा फटका बसणार आहे.

पीएमपीमधील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, ‘‘पीएमपीमध्ये सुमारे दररोज १२ लाख नागरिक प्रवास करतात. त्यातील अनेक नागरिक हे दैनंदिन प्रवास करणारे असतात. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी पास आहे. इतर प्रवाशांनाही पासची व्यवस्था आहे. पण लाखो प्रवासी हे दररोज बसने जात नाहीत. ते कामानुसार घराबाहेर पडतात. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी, परगावाहून आलेल्यांचा समावेश असतो. हे प्रवासी मेट्रो सुरू झाल्यानंतर बसला टाळू शकतात. दोन्ही मार्ग हे लांबपल्ल्याचे असून यावर पीएमपीला चांगले उत्पन्न मिळते. हे प्रवासी मेट्रोकडे वळल्यानंतर पीएमपीची प्रवासी संख्या तसेच उत्पन्न काही प्रमाणात कमी होऊ शकते.’’

पिंपरी ते बोपोडीपर्यंत बीआरटी मार्ग असल्याने तिथे फारसा परिणाम होणार नाही, असा दावा पीएमपीचे बीआरटी प्रमुख अनंत वाघमारे यांनी केला. ‘‘या मार्गावर बसची वारंवारिता चांगली आहे. प्रवाशांचा प्रतिसादही चांगला आहे. त्यामुळे बसचे प्रवासी मेट्रोकडे वळण्याची शक्यता नाही. बसचे प्रवासी हे सर्वसामान्य मजूर, नोकरदार, विद्यार्थी असे अधिक आहेत. त्यांना दररोज मेट्रोचा प्रवास आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही. मात्र बोपोडीनंतर पुण्याकडे 

जाण्यासाठी बीआरटी नसल्याने तिथून पुढे काही प्रमाणात फटका बसू शकतो,’’ अशी भीतीही वाघमारे यांनी व्यक्त केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story