कसबा भाजपला ‘रास ना’ आया...

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांना धूळ चारली. त्यांचा हा विजय महाराष्ट्रात चर्चेचा ठरला आहे. त्यांच्या विजयाची अनेक कारणे आता लोक सांगत आहेत. महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांची एकजूट हे त्यामागील प्रमुख कारण सांगितले जात असले, तरी दुसरेही एक वेगळेच कारण धंगेकर यांच्या विजयासाठी महत्त्वाचे ठरले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 3 Mar 2023
  • 05:59 am
कसबा भाजपला ‘रास ना’ आया...

कसबा भाजपला ‘रास ना’ आया...

चारचाकीत फिरणाऱ्या रासनेंपेक्षा स्कुटरवर सहज कुठेही पोहोचणारे धंगेकर मतदारांना भावले

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@VijayCmirror

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांना धूळ चारली. त्यांचा हा विजय महाराष्ट्रात चर्चेचा ठरला आहे. त्यांच्या विजयाची अनेक कारणे आता लोक सांगत आहेत. महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांची एकजूट हे त्यामागील प्रमुख कारण  सांगितले जात असले, तरी दुसरेही एक वेगळेच  कारण धंगेकर यांच्या विजयासाठी महत्त्वाचे ठरले आहे. धंगेकर म्हणजे हाक मारताच मदतीला येणारा कार्यकर्ता. त्यांना ही ओळख दिली आहे त्यांच्याकडे अनेक वर्षांपासून असलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्कूटरने. त्यामुळे धंगेकर यांच्या विजयात ह्या ॲॅक्टिवाचाही मोठा वाटा आहे.

याउलट सामान्य गणेश मंडळाचा कार्यकर्ता अशी प्रतिमा रंगवणारे हेमंत रासने मात्र स्थायी समितीच्या प्रभावामुळे म्हणा, 'हायएंड' गाड्यांमधून फिरताना दिसले. अगदी त्यांचे कार्यकर्तेही ' श्रीमंतीचा थाट मिरवतान दिसले. सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरलेले हेमंत रासने हे दगडूशेठ गणपती ट्रस्टचे ट्रस्टी आहेत. सोबतच दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्टनं स्थापन केलेल्या सुवर्णयुग सहकारी बँकेचेही ते अध्यक्ष आहेत. जवळपास २००९ पासून ते या बँकेच्या संचालक मंडळाचा भाग आहेत. माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार या बँकेच्या २२ शाखा, १३३५ कोटींचा व्यवसाय आणि ८०९ कोटींच्या ठेवी आहेत.

२०१९ पासून हेमंत रासने हे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी आहेत, महापालिकेची मुदत संपल्यानंतरही स्थायी समितीचं अध्यक्षपद आपल्याकडे राहावं यासाठी त्यांनी कोर्टातही धाव घेतली होती.

धंगेकर हे नेहमी अनेकांना स्कूटरवर प्रवास करताना दिसतात, त्यांचे घर ते महापालिका कार्यालय हा रोजचा प्रवास ही दुचाकी करते. या दुचाकीवरून  ते अनेकांच्या भेटी घेतात, मतदारांशी संपर्क ठेवतात. 

पान १ वरून

या स्कूटरमुळेच साधा कार्यकर्ता म्हणून त्यांना ओळख मिळाली. ही ओळखच या निवडणुकीत त्यांची जमेची बाजू ठरली. त्यांच्या गाडीचा क्रमांक एम एच -१२ /जीयू/४५९३ असून अनेकांनी गुरुवारी दुपारी विजयानंतर त्यांच्या गाडीसोबतदेखील फोटो काढून घेतले.

 

धंगेकर माणसात मिसळणारा माणूस :

रवींद्र धंगेकर हा जनमानसात मिसळणारा कार्यकर्ता असल्याची त्यांची प्रतिमा आहे. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. यामुळे ते सामान्य मतदारांना नेहमी उपलब्ध असतात. यामुळे मतदारांना धंगेकर आश्वासक चेहरा वाटल्याने, मतदारांची पसंती धंगेकरांना मिळाली. 

'कोण आहे धंगेकर ?' अशा आशयाचे मीम्सदेखील गेल्या काही दिवसांत सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात फिरले. भाजपच्या गणेश बिडकर यांना पराभूत करणारे, गिरीश बापट यांना लढत देणारे म्हणूनही त्यांची ओळख सोशल मीडियात आता फिरत आहे. त्यांच्या विजयामुळे शहरात काँग्रेसला तब्बल ८ वर्षानंतर पुणे शहरातील विधानसभेसाठी आमदार मिळाला आहे. २०१४ आणि २०१९ या दोन सलग विधानसभा निवडणुकात  कॉंग्रेसला पराभव बघावा लागला. 

शहरात  एकही उमेदवार निवडून आलेला नव्हता, धंगेकर यांच्या रूपाने आता विधानसभेतील आमदार पुणे शहरात काँग्रेसला मिळाला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला याआधी १९९२ च्या पोटनिवडणुकीत विजय मिळाला होता. त्यानंतर तब्बल ३० वर्षांनंतर काँग्रेसचा पंजा गुलालात न्हावून निघाला आहे. या विजयाने भाजपचा हा बालेकिल्ला काँग्रेसने हिसकावून घेतला आहे. या निवडणुकीत धंगेकरांना एकूण ७२  हजार ५९९ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हेमंत रासने यांना ६१  हजार ७७१ मते मिळाली. धंगेकर एकूण ११  हजार ४०  मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच धंगेकरांनी आघाडी घेतली. ही आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. सुरुवातीच्या मतमोजणीत फारशी आघाडी नव्हती. त्यानंतर आघाडी वाढत गेली. दहाव्या फेरीनंतर दोघांच्या मतातील फरक मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यानंतर धंगेकरांच्या समर्थकांनी विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली. काही फेऱ्यांमध्ये चुरस निर्माण झाली होती. 

पेठ भागात भाजपचे मताधिक्य घटले...

कसबा पेठेत भाजपचे वर्चस्व असताना प्रभाग क्रमांक १५ मध्ये सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठेत भाजपचे मताधिक्य काहीअंशी घटल्याची चर्चा आहे. या भागातील निर्णायक मते धंगेकरांच्या पारड्यात पडलेली आहेत. तर काही मते भाजपपसून दुरावली आहेत.

या भागाने भाजप आणि भाजप उमेदवाराला नेहमीच साथ दिली. बापट आणि टिळकांना या भागाने नेहमीच मताधिक्य मिळवून दिले. मात्र यंदा धंगेकरांनी भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत, निर्णायक मते आपल्याकडे खेचली आहेत.

कसब्यात २०१९ विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार प्रभाग क्रमांक १५ मध्ये ४१ हजार ७७७ जणांनी मतदान केले होते. यापैकी ६८ टक्के मते भाजपच्या पारड्यात पडली होती. या भागातून एकट्या भाजपला तब्बल २१ हजार २९ मतांचे मताधिक्य प्राप्त झाले होते. आताच्या पोटनिवडणुकीत येथून ५१ टक्के मतदान झाले. मागच्या वेळेच्या तुलनेत ४ हजार ५४० मतदारांनी निरुत्साह दाखवत, मतदान केले नाही.

लोकमान्यनगर, नवी पेठ या भागातूनही मागील विधानसभा निवडणुकीत २२ हजार १०९ मतदारांनी मतदानाचा बजावला. पण आताच्या निवडणुकीत १९ हजार १२० जणांचे मतदान झाले आहे. यामुळे २ हजार ९८९ जणांचे मतदान कमी झाले. याचाच फटका रासनेंना बसला व धंगेकरांनी निर्णायक विजयी आघाडी घेतली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story