घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक, चार लाखांचा माल हस्तगत
#नारायणगाव
घरफोडी करणाऱ्या तिघांच्या सराईत टोळीला गुन्हे अन्वेषण विभाग व नारायणगाव पोलिसांच्या एकत्रित पथकाने अटक केली आहे. या टोळीने नारायणगावचे माजी उपसरपंच आशिष माळवदकर यांच्या बंगल्यात घरफोडी करून २२ लाख २ हजार ५०० रुपयांच्या ऐवजाची चोरी केली होती. ही टोळी जळगाव जिल्ह्यातील असून त्यांच्याकडून पोलिसांनी पाच तोळे सोने, तीन मनगटी घड्याळे असा ३ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींना कोर्टात हजर केल्यावर सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
पोलिसांनी महेंद्र ज्ञानेश्वर बोरसे (वय ३२ ), आकाश सुभाष निकम (वय २४), अमोल सुरेश चव्हाण (वय २८, सर्व रा. नांद्रा, ता. पाचोरा. जि. जळगांव) यांना अटक केली आहे. आरोपी हे घरफोडी करण्यात सराईत असून त्यांच्यावर जळगाव जिल्ह्यात घरफोडीचे बत्तीस गुन्हे दाखल असून यापैकी चौदा गुन्ह्यात त्यांना शिक्षा झाल्याची माहिती फौजदार सनील धनवे यांनी दिली.
आरोपी मे महिन्यात पुणे येथे क्रेटा गाडी खरेदी करण्यासाठी आले होते. त्यानंतर १४ मे २०२३ रोजी जळगावला जात असताना पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या माजी उपसरपंच माळवदकर यांच्या बंद बंगल्यातील फ्लॅटचा दुपारी एकच्या सुमारास कडी कोंयडा तोडून घरातील दागिने व रोख रक्कम असा २२ लाख २ हजार ५०० रुपयांचा माल लंपास केला. आरोपींचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, नारायणगाव पोलीस ठाणे यांची पाच पथके तयार करण्यात आली होती. या पथकातील पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस निरीक्षक सनील धनवे, पोलीस उपनिरीक्षक सावंत, पोलीस हवालदार दीपक साबळे, संदीप वारे, मंगेश लोखंडे, गोविंद केंद्रे, अक्षय नवले, महेश काठमोरे, शैलेश वाघमारे यांच्या पथकाने आरोपींना जळगाव येथून अटक केली. सी.सी.टी.व्ही. फुटेजची तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपासणी केली असता गुन्हा करतेवेळी आरोपींनी वापरलेल्या स्वीफ्ट गाडीच्या आधारे पोलिसांनी शोध घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
feedback@civicmirror.in