खुल्या मैदानात बेघर महिलेवर बलात्कार
नितीन गांगर्डे
वर्दळीच्या पदपथाशेजारी खुल्या मैदानात एका तीस वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येरवडा येथील फुलेनगर परिसरात आरटीओ ऑफिसशेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात मंगळवार दि. २५ एप्रिलच्या रात्री हा सर्व प्रकार घडला आहे. पिडीत महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
या प्रकरणातील फिर्यादी आणि आरोपी परस्पराचे नातेवाईक आहेत. पिडीत महिला मूळची इंदापूर तालुक्यातील आहे. सर्व आरोपी मुळचे सांगली जिल्ह्यातील मिरजेचे रहिवासी आहेत. पिडीत महिला गेल्या काही वर्षांपासून फुलेनगर परिसरात राहत आहे. या ठिकाणी भीक मागून ती आपला उदरनिर्वाह करते. या प्रकरणी चारजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. विजुत शिरसाइल भोसले (वय २५), काश्मीर शिरसाइल भोसले (वय २२), विश्वनाथ शिरसाइल भोसले (वय २०), जयश्री आप्पा भोसले (वय २१) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण सांगली जिल्ह्यातील आहेत. सध्या ते कोणत्या ठिकाणी राहतात याचा पोलीस शोध घेत आहेत.
या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही भीक मागून आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. फुलेनगर येथील आरटीओ ऑफिस शेजारी असणाऱ्या मोकळ्या मैदानात गेल्या काही दिवसांपासून ती कुटुंबासह राहत आहे. मंगळवारी, २५ एप्रिलच्या रात्री त्या जेवणानंतर पदपथावर झोपल्या होत्या. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्या लघुशंकेसाठी थोड्या अंतरावरील भिंतीच्या कडेला गेल्या. त्यावेळी आरोपीने त्यांना पकडले. चारही आरोपींनी पिडीत महिलेला पकडून ओढत बाजूला नेले. आरोपीतील महिलेने पिडीतेचे केस आणि तोंड घट्ट पकडले. त्यानंतर एका आरोपीने जबरदस्तीने शरीर संबंध केले. बाकीच्या आरोपींनी याकामी मदत केली. त्यानंतर सारे आरोपी तेथून पसार झाले. येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आरटीओ ऑफिस शेजारी असणाऱ्या मोकळ्या मैदानात हा सर्व
प्रकार घडला.
याबाबत फिर्यादीने तक्रार दाखल करताच येरवडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, पोलीस निरीक्षक जयदीप गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रवींद्रकुमार वारंगुळे आणि सुरेखा गाताडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरु आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरेखा गाताडे या पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपींवर भारतीय दंड विधान कलम ३७६ (ड)३४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.