घरवापसी?

वडगाव शेरीतील ब्रम्हा सनसिटीत भटक्या श्वानांच्या हिंस्र हल्ल्यात एक सात वर्षांचा मुलगा गेल्या आठवड्यात गंभीर जखमी झाला. या घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 16 Feb 2023
  • 11:18 am
घरवापसी?

घरवापसी?

ब्रम्हा सनसिटीतून पकडलेले ५० भटके श्वान लवकरच स्वगृही परतणार आहेत. प्राणी कायद्यानुसार भटक्या श्वानांचे त्यांच्या मूळ जागीच पुनर्वसन करावे असं कायदा सांगतो.

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@rajanandmirror

वडगाव शेरीतील ब्रम्हा सनसिटीत भटक्या श्वानांच्या हिंस्र हल्ल्यात एक सात वर्षांचा मुलगा गेल्या आठवड्यात गंभीर जखमी झाला. या घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. 

पुणे महापालिकेने सुमारे ५० भटके श्वान पकडून त्यांना कोंडवाड्यात दहा दिवसांसाठी निरीक्षणाखाली ठेवले. निरीक्षण काळात श्वानांमध्ये रेबीजची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याने प्राणीविषयक कायद्यातील तरतुदीनुसार त्यांना पुन्हा ब्रम्हा सनसिटीत सोडण्यात येणार आहे. यामुळे भटक्या श्वानांच्या हिंस्त्र हल्ल्याच्या भीतीने तेथील नागरिकांना हाता काठ्या-लाठ्या घेऊनच सोसायटीत फिरावे लागणार आहे. सोसायटीतील बहुसंख्य श्वानविरोधक कितीही, काहीही म्हणत असले तरी कायद्यातील तरतुदीनुसार श्वानांना परत येण्यापासून ते रोखू शकणार नाहीत. श्वानप्रेमी अल्पसंख्य असले तरी त्यांचा आणि कायद्यातील तरतुदींचा विजय होणार आहे.  

शहराच्या विविध भागात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर बनला असून रात्री-बेरात्री अनेक दुचाकीस्वारांवर केलेल्या अनपेक्षित हल्ल्यांने किंवा बेभान पाठलागाने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. अनेक सोसायट्यांतही भटक्या आणि हिंस्र श्वानांच्या तक्रारी वाढल्या आहेत. मात्र, पालिकेचे हात कायद्याने बांधले असून ते मनमानी करून काही करू शकत नाही. त्यांनी काही करायचे ठरवल्यास अल्पसंख्य असलेले प्राणीप्रेमी त्यांना काही करू देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. 

अंदाजे दोन लाख श्वान शहरात  

दिवसागणिक भटक्या श्वानांचा प्रश्न हा गंभीर बनत असून पुण्यातील लोकसंख्येच्या तुलनेत तीन टक्के म्हणजे जवळपास दीड-दोन लाख भटके श्वान असावेत असा अंदाज आहे. त्यांना बंदिस्त करणे अवघड आहे.  प्राण्यांचे जन्म नियंत्रण (कुत्रे) नियम २००१ मधील तरतुदींनुसार, ज्या ठिकाणाहून भटके श्वान पकडले असतील, तेथेच त्यांना पुन्हा सोडणे बंधनकारक आहे. याच नियमाचे काटेकोर पालन पुणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून केले जात आहे. ब्रम्हा सनसिटीतील घटनेनंतर दोन दिवसांत या विभागाने कारवाई करून जवळपास ५० श्वान पकडले होते. त्यांना केशवनगर व नायडू रुग्णालयालगतच्या कोंडवाड्यामध्ये ठेवण्यात आले आहे. भटकी कुत्री पकडल्यानंतर महापालिकेकडून त्यांची नसबंदी आणि लसीकरण झाले आहे किंवा नाही याची नोंद घेतली जाते. त्यानुसार त्यांची नसबंदी आणि रेबीजचे लसीकरण केले जाते. त्यानंतर दोन ते चार दिवसांत त्यांना सोडून दिले जाते.

कारवाई तात्पुरती 

वडगाव शेरी परिसरातून पकडलेल्या कुत्र्यांबाबतही हीच प्रकिऱ्या राबवली जाणार आहे. त्यासाठी त्यांच्यावर दहा दिवस देखरेख ठेवली जाईल. दहा दिवसांमध्ये त्यांच्यामध्ये रेबीजची लक्षणे आढळून न आल्यास त्यांना पुन्हा पकडून आणले त्याठिकाणीच सोडले जाणार आहे. महापालिकेने 

कुत्र्यांना पकडले असले तरी ही कारवाई तात्पुरत्या स्वरुपाची असते. नियमानुसार पकडलेल्या कुत्र्यांना पुन्हा त्याच ठिकाणी सोडून द्यावे लागत असल्याने नागरिकांचा त्रास कमी होतच नाही. 

दरम्यान, ब्रम्हा सनसिटीतील श्वानविरोधक आणि श्वानप्रेमी आमने-सामने आले असून त्यांनी पोलिसांत परस्परांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.  

कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी २००१ मध्ये पशु जन्म नियंत्रण कायदा करण्यात आला. त्यानुसार भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी त्यांना संबंधित केंद्रावर नेण्यात येते. नसबंदीची शस्त्रक्रिया केल्यानंतर कुत्र्यांना जेथून आणले तेथेच सोडणे बंधनकारक आहे. असे केले नाही तर कारवाई होऊ शकते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story