शाळेने पेटवलेली होळी बेतली चिमुकल्याच्या जीवावर

अकॅडमिक हाईट पब्लिक स्कूल या शाळेने आवारातच पेटवलेल्या होळीत पडून तिसरी इयत्तेत शिकणारा चिमुकला गंभीररीत्या भाजला. त्यानंतर शाळा व्यवस्थापनावर दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी पालकांवर दबाव आणल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी आता चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 30 Mar 2023
  • 11:06 am
शाळेने पेटवलेली होळी बेतली चिमुकल्याच्या जीवावर

शाळेने पेटवलेली होळी बेतली चिमुकल्याच्या जीवावर

चिखलीतील शाळा व्यवस्थापनाने जबाबदारी झटकली; पालकांची पोलिसांत तक्रार

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

अकॅडमिक हाईट पब्लिक स्कूल या शाळेने आवारातच पेटवलेल्या होळीत पडून तिसरी इयत्तेत शिकणारा चिमुकला गंभीररीत्या भाजला. त्यानंतर शाळा व्यवस्थापनावर दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी पालकांवर दबाव आणल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी आता चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्याध्यापिका ज्योतिका मलकानी, शाळेचे संचालक दिलीप तीलवानी, मुकेश तीलवानी, रिया तीलवानी आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुलाचे पालक अविनाश बाजपेयी (वय ४२, रा. चिखली) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.  बाजपेयी यांचा नऊ वर्षांचा मुलगा आर्यन हा पाटीलनगर, चिखली मधील अकॅडमिक हाईट पब्लिक स्कूल या शाळेत तिसऱ्या इयत्तेत शिकतो. होळीच्या दिवशी आर्यन याची परीक्षा होती. पेपर झाल्यानंतर शाळेच्या आवारातील पटांगणात व्यवस्थापनाने होळी पेटवली होती. सगळ्या मुलांना होळीसाठी पटांगणात आणून होळी दाखविल्यावर परत वर्गात नेण्यात आले होते. त्यानंतर शाळा सुटल्यावर सर्वांना स्कूल बसने घरी पाठविण्यात आले. मात्र, आर्यनच्या स्कूल बसला उशीर झाल्याने तो आणि अन्य मुले पटांगणात खेळत होती. तेव्हा होळी पेटती असल्याने खेळताना तोल जाऊन आर्यन हा होळीत पडल्याने गंभीररीत्या भाजला. त्यानंतर आहे त्या अवस्थेत तो शाळेच्या आत पळत गेला तेव्हा इतरांना हा प्रकार समजला.

शाळा प्रशासनाने आर्यनला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेत त्याच्या आईला घडलेली हकीकत कळविली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. त्यानंतर आवश्यक डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्याला अन्यत्र उपचारासाठी नेण्यात आले. आर्यनवर वश्यक उपचार करून त्याला दुसऱ्या दिवशी परत उपचारासाठी घेऊन येण्यास सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी आर्यन याच्या गंभीर जखमा पाहून डॉक्टरांनी स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती कळवली. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन आर्यन तसेच त्याच्या आई वडिलांना घटना कशी घडली हे विचारून शाळा प्रशासनाबाबत काही तक्रार आहे का, याची विचारणा केली. आम्हाला आधी मुलावरील उपचार होणे महत्वाचे असून, यामध्ये शाळा प्रशासनाकडून कोणीही अद्याप मदतीसाठी पुढे आले नसल्याचे सांगितले. त्यानंतर याबाबत पोलिसांनी प्राथमिक अहवाल नोंदवून घेतला. दरम्यान, तिसऱ्या दिवशी शाळा प्रशासनाशी संबंधित एक संचालक बाजपेयी यांच्या घरी गेला आणि त्याने तक्रार मागे घेण्यास सांगितले.

शाळा प्रशासन उपचारासाठी मदत करत नसताना तक्रार मागे घेण्यास दबाव आणत असल्याने अविनाश बाजपेयी यांनी पोलीस ठाणे गाठून त्याबाबत तक्रार केली. परंतु, गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. अखेरीस अविनाश बाजपेयी यांनी पोलीस आयुक्त कार्यालय आणि उपायुक्तांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली. ६ मार्चला ही घटना घडल्यावर डॉक्टरांनी दोन दिवसांनी पोलिसांना याबाबतची माहिती कळवली होती. मात्र, मदत करण्याऐवजी दबाव आणला जात असल्याने पालकांनी तक्रार केल्यावर वीस दिवसांनी २८ मार्चला याबाबत शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story