पुण्यातील इतिहासपुरुषांच्या इतिहासवास्तू इतिहासजमा
यशपाल सोनकांबळे
पुण्यात सध्या पुनर्विकास हा परवलीचा शब्द झाला आहे. जिकडे बघावे तिकडे पुनर्विकासाच्या नावाखाली जुन्या इमारती पाडून वाट्टेल ते करण्याचा उद्योग जोरात सुरू असल्याचे दिसते. या सर्व उन्मादी वातावरणात, पुण्याला जगाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ऐतिहासिक, शैक्षणिक, सांस्कृतिक यांसह विविध क्षेत्रांतील महापुरुषांच्या स्मृतींनादेखील नख लावण्याचे काम सुरू आहे. अशा महापुरुषांनी वास्तव्य केलेल्या इमारतींना त्या जागेवर मोठमोठे बांधकाम प्रकल्प उभारण्यासाठी जमीनदोस्त करणे सुरू आहे.
महिला सक्षमीकरणासह विविध सामाजिक सुधारणांशी संबंधित चळवळीचे नेतृत्व पुण्याने केले आहे. १९व्या शतकाच्या प्रारंभापासून २०व्या शतकाच्या अखेरपर्यंतच्या कालखंडातील घडामोडींवर नजर टाकल्यास ही बाब सहजपणे लक्षात येते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात पुण्याने मोठे योगदान दिले आहे. यासोबतच मराठी वाड्•मय, रंगभूमी, चित्रपट, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, शिक्षण या क्षेत्रांचाही उल्लेख आवर्जून करावा लागेल.
अनेक पुरुष आणि महिला पुणेकरांनी आपल्या असामान्य योगदानाद्वारे बौद्धिक आणि सर्जनशीलदृष्ट्या पुण्याला गर्भश्रीमंत केले. यापैकी बहुसंख्य महान आसामी डेक्कन जिमखाना परिसरातील बंगल्यांमध्ये वास्तव्यास होत्या. २०व्या शतकाच्या प्रारंभी लकडी पुलाच्या अलीकडे पेठांमध्ये वसलेले पुणे हे सर्वसामान्यांचे तर पुलाच्या पलीकडे बांधलेले बंगले हे उच्चभ्रू वर्गांचे निवासस्थान मानले जात होते. दगडांच्या साह्याने बांधलेले हे बंगले वसाहतकालीन अभियांत्रिकीचे उत्कृष्ट नमुने आहेत.
ख्यातकीर्त शिक्षणतज्ज्ञ आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू (१९५६ ते १९५९) रँगलर परांजपे यांनी वास्तव्य केलेला फर्ग्युसन महाविद्यालयाशेजारील बंगला अखेरची घटका मोजत आहे. आणखी एक प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू (१९७२ ते १९७५) जी. एस. महाजनी यांच्या बंगल्याच्या कंपाऊंडची भिंत बुधवारी (दि. ३) कोसळली. हा बंगला पाडण्यात येत नसून ती भिंत कमजोर झाली होती. ही भिंत पुन्हा बांधण्यात येणार आहे.
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील मोठे नाव असलेल्या शास्त्रीय गायिका ‘गानकोकिळा’ हिराबाई बडोदेकर यांचा बंगला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक ११ मध्ये आहे. सध्या हा वाडा उजाड पडलेला आहे. संगीतविश्वाला त्यांनी दिलेल्या प्रचंड योगदानाची माहिती सांगणारा नीलफलक तेवढा व्यवस्थित उरला आहे. हा बंगला बंद असूनही त्याच्या पुनर्विकासाचा घाट घातला जात आहे. उद्योजक एल. डी. भावे आणि लीलाताई भावे यांचे वास्तव्य असलेल्या प्रभात रस्त्यावरील बंगल्याच्या जागेवर आता देखणी बहुमजली बिल्डिंग उभी राहिली आहे.
मात्र, भावेंच्या योगदानाचा उल्लेख असलेला नीलफलक तेथे कायम ठेवण्यात आला आहे.
थोडक्यात सांगायचे झाल्यास, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रांमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्यांची निवासस्थाने आता सिमेंट-काॅंक्रिटच्या जंगलाचा एक भाग म्हणून परावर्तित होत आहेत. पुणे महापालिकेच्या ऐतिहासिक वारसास्थळ विभागाच्या प्रमुख हर्षदा शिंदे म्हणाल्या, ‘‘पुण्यातील ऐतिहासिक वारसास्थळांची तीन विभागांत विभागणी केलेली यादी आमच्याकडे आहे. नीलफलक असलेल्या पुण्यातील ऐतिहासिक इमारतींची यादी मात्र आमच्याकडे नाही. हे नीलफलक ‘टिळक स्मारक ट्रस्ट’ची संकल्पना आहे. आमच्याकडे अशा नीलफलकांचा डेटा उपलब्ध नाही.’’
‘टिळक स्मारक ट्रस्ट’चे अध्यक्ष दीपक टिळक म्हणाले, ‘‘माझे वडील जयंतराव टिळक यांनी पुणे ‘ऐतिहासिक स्मारक समिती’ची स्थापना केली होती. लंडनमध्ये असलेल्या नीलफलकांच्या धर्तीवर ‘टिळक स्मारक ट्रस्ट’च्या माध्यमातून त्यांनी पुण्यात ही संकल्पना राबवली. आधी यात पुणे महापालिकादेखील सहभागी होती. पण आता ट्रस्टच्या माध्यमातून स्वतंत्रपणे हे काम चालते.’’
‘‘कुणाला आपल्या निवासस्थानाला नीलफलक लावायचा असल्यास आम्ही त्यांना अर्ज करायला सांगतो. प्रसिद्ध व्यक्तीच्या मृत्यूला १० वर्षे झाल्याशिवाय आम्ही त्यांच्या निवासस्थानाला नीलफलक लावत नाही. संबंधित व्यक्तिमत्त्वाने दिलेल्या योगदानाची आम्ही माहिती घेतो आणि त्याची खातरजमादेखील करतो. ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर संबंधितांची परवानगी घेऊन नीलफलक लावतो. पुण्यात आम्ही असे १४० नीलफलक लावले आहेत. आता अनेक जुन्या बंगल्यांचा पुनर्विकास होत आहे. अशा स्थितीत संबंधित निवासी सोसायटीतील सदस्यांची परवानगी घेऊन आम्ही नव्याने नीलफलक लावतो,’’ अशी माहिती दीपक टिळक यांनी दिली.
राष्ट्रउभारणीत दिलेले अविस्मरणीय योगदान
राष्ट्रउभारणीत अविस्मरणीय योगदान देणाऱ्या १४० महापुरुषांच्या नावे पुण्यात नीलफलक आहेत. त्यापैकी देशाच्या इतिहासात ज्यांची नावे कधीच पुसली जाऊ शकत नाहीत, अशा महापुरुषांची नावे...
गोपाळ कृष्ण गोखले
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
गोपाळ गणेश आगरकर
महात्मा जोतिबा फुले
वामन शिवराम आपटे
क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके
क्रांतिवीर चाफेकर बंधू (दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव)
रॅंगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे
रॅंगलर जी. एस. महाजनी
शास्त्रीय गायिका हिराबाई बडोदेकर
पु. ल. देशपांडे
ग. दि. माडगुळकर
सी. रामचंद्र
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.