हायवे हिप्नोसिस' रोखण्या कंत्राटदार मिळेना

गेल्या वर्षी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोटार अपघातात मृत्यू झाला. विनायक मेटे यांचा अपघात होण्यामागे ‘हायवे हिप्नोसिस’ हे कारणही सांगितले गेले. समृद्धी महामार्गावर १ जुलै बुलढाणा येथे बसला भीषण अपघात झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vijay Chavan
  • Sun, 16 Jul 2023
  • 11:12 pm

हायवे हिप्नोसिस' रोखण्या कंत्राटदार मिळेना

‘वे साइड अॅमेनिटीज’साठी कंत्राटदारच मिळत नसल्याने महामंडळाने दुसऱ्यांदा काढली निविदा, मेटे अपघात, बुलढाणा बसजळीत याच कारणाने झाल्याचे निष्पन्न

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@VijayCmirror

गेल्या वर्षी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा  पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोटार अपघातात मृत्यू झाला. विनायक मेटे यांचा अपघात होण्यामागे ‘हायवे हिप्नोसिस’ हे कारणही सांगितले गेले. समृद्धी महामार्गावर १ जुलै बुलढाणा येथे बसला भीषण अपघात झाला. त्यानंतर बसने पेट घेतल्याने २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातासही हीच बाब कारणीभूत असल्याचे नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेच्या चार विद्यार्थ्यांनी  केलेल्या अभ्यासात निष्पन्न झाले. 

यात चालकाला डुलकी लागणे, अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटणे, अतिरिक्त भार असलेले वाहन चालवणे, ताण, रस्ता संमोहन, लक्ष विचलित होणे आदी कारणांमुळे अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

मात्र कारणांचे निदान झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा विविध सोई-सुविधा उभ्या करण्याचे नियोजन राज्य रस्ते विकास महामंडळाने केले, परंतु, या सुविधांसाठी कंत्राटदारच मिळत नसल्याने महामंडळाला दुसऱ्यांदा निविदा काढावी लागली आहे.

डिसेंबरमध्ये उद्घाटन झाल्यानंतर आतापर्यंत  मुंबई-नागपूर समृद्ध  महामार्गाने शंभरावर बळी घेतले आहेत. ‘वे साइड  अॅमेनिटीज’ सुविधांचा अभाव, हे या अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. त्यासाठीच अशा एकूण १६ ठिकाणी सुविधा उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) फेब्रुवारीत निविदा काढली गेली. त्यात केवळ एकाकडून प्रतिसाद आला. परिणामी आता महामंडळाला पुन्हा दुसऱ्यांदा निविदा काढावी लागली आहे.

‘वे साइड  अॅमेनिटीज’मध्ये इंधन पंपांपासून ते हॉटेल, रेस्टॉरंट, स्वच्छतागृह, खरेदीची ठिकाणे, वाहन दुरुस्ती केंद्र आदींचा समावेश असेल. दोन्ही बाजूने अर्थात १६ ठिकाणी अशा सुविधांची उभारणी होणे अपेक्षित आहे. त्यासाठी महामंडळाने निविदा काढली असून, २६ जुलै निविदेची अंतिम तारीख आहे.

या अंतर्गत या प्रत्येक ठिकाणी चार हेक्टर जागेवर सुविधा उभ्या होणार आहेत. प्रत्येक जागेसाठी किमान ५० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. संबंधित कंत्राटदाराला पाच वर्षांच्या कालावधीत या सुविधा टप्प्याटप्प्याने उभ्या करायच्या आहेत.

‘हायवे हिप्नोसिस’ झालेल्या चालकाला गाडीचा अपघात होईपर्यंत किंवा ती गाडी आदळेपर्यंत शेवटच्या १५ मिनिटात काहीही आठवत नाही. गाडीचा चालक किती वेगाने गाडी चालवत आहे, तो काय करतोय याचे त्याला काहीही भान नसते. विशेष म्हणजे समोरच्या दिशेने एखादी गाडी येत असेल तर त्याचा अंदाजही त्याला लावता येत नाही. तसेच हायवेवरील गाड्यांचा वेग हा साधारण ८० ते १०० कि.मी असतो. त्यामुळे जर गाड्यांची टक्कर झाली तर प्रचंड नुकसान होते. प्रसंगी माणसाला जीवही गमवावा लागतो.

नाव न  सांगण्याच्या अटीवर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे एक वरिष्ठ अधिकारी सीविक मिररशी बोलताना म्हणाले, "वाढत्या अपघातांमुळे समृद्धी महामार्ग वापरणाऱ्या वाहनांची संख्या काहीशी कमी झाला आहे. सद्यस्थितीत दररोज सरासरी १० हजार वाहने ये-जा करीत आहेत. मात्र, सुविधा उभारणीसाठी किमान ५० कोटी रुपये गुंतवणुकीचा आकडा मोठा आहे. ५० कोटी रुपये किमान गुंतवून त्याचा परतावा मिळेल अथवा नाही, किंवा कधीपर्यंत मिळेल, याबाबतच्या साशंकतेमुळेच सुविधा उभे करणाऱ्या मोठ्या कंपन्या फारशा उत्सुक नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

‘हायवे हिप्नोसिस’ म्हणजे काय?

हायवे हिप्नोसिस’ याला रोड हिप्नोसिस असेही ओळखले जाते. हिप्नोसिस या शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे संमोहन. ‘हायवे हिप्नोसिस’ ही अशी एक शारीरिक स्थिती आहे ज्याची कल्पना बहुतांश चालकांना अजिबातच नसते. एखाद्या मोठ्या हायवेवर गाडी चालवताना चालकामध्ये किवा गाडीत बसलेल्या प्रवाशांना एका विशिष्ट प्रकारची मोनोटोनी येते. यामुळे लक्ष विचलित होते. यालाच ‘हायवे हिप्नोसिस’ असे म्हणतात. रस्त्यावर वाहन चालवताना साधारण २.५ तासांनी ‘हायवे हिप्नोसिस’ होऊ शकते.

यावेळी संमोहीत चालकाचे डोळे उघडे असतात, पण मेंदू मात्र क्रियाशील राहत नाही. तो डोळ्यांनी काय पाहतो हे त्याला समजत नाही. याचे परिणाम चालकावर स्पष्टपणे दिसतात. तुमच्यासमोर उभ्या असलेल्या वाहनाला अचानक गाडी धडकणे, मागून एखादी गाडी आपल्या गाडीला येऊन धडकणे असे प्रकार हायवेवर घडण्यामागचे मूळ कारण ‘हायवे हिप्नोसिस’ आहे. मुंबईत किंवा ट्राफिकच्या ठिकाणी गाडी चालवताना हे प्रकार सहसा आढळत नाहीत. कारण या ठिकाणी गाडी चालवताना तुमच्यासमोर अनेक अडथळे असतात. यामुळे आपण संमोहित होत नाही.

धोका कसा टाळावा

रोड हिप्नोसिसमुळे अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी अपघात टाळण्यासाठी तासाभरानंतर एखाद्या पेट्रोल पंपावर थांबावं. चहा किंवा कॉफीसारखे पेय प्यायल्याने सुस्ती दूर होईल. गाडी थांबवल्यानंतर खाली उतरून चालावे. डोळ्यावर पाणी मारुन डोळ्यावरील ताण कमी करावा. तसेच रात्रीच्या प्रवासाआधी निघताना चालकाने चांगली झोप घेणे गरजेचं आहे. गाडीत म्युझिक सुरु ठेवा.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story