इथे शेकडो बहाणे, असंख्य कारणे!
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
रस्त्याचे काम किती रेंगाळू शकते याचा अनुभव सध्या कोथरूडकर घेत आहेत. आशिष गार्डन येथील बधाई चौक परिसरातील रस्त्याचे काम एक-दोन महिने नव्हे तर तब्बल वर्षभर रेंगाळले आहे. कधी पावसाळा, कधी जी-ट्वेन्टी परिषद तर कधी मेट्रोमुळे रस्त्याचे काम रेंगाळल्याचा दावा महापालिका प्रशासन करीत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. मुळात हा रस्ता निमुळता आहे आणि तेथे खडी पसरल्यामुळे अपघाताची शक्यता अधिक आहे. आता हे काम पूर्ण व्हायला एप्रिल महिनाही जाणार असल्याचे महापालिका प्रशासनानेच सांगितल्याने आणखी किमान दोन महिने तरी अपघाताच्या भीतीच्या सावटाखाली नागरिकांना ये-जा करावी लागणार आहे.
शहरातील अत्यंत नियोजनबद्ध काम केलेले उपनगर म्हणून कोथरूडकडे पाहिले जाते. इतर उपनगरांच्या तुलनेत कोथरूडमधील बराचसा भाग चांगल्या पद्धतीने विकसित झाला आहे. टोलेजंग इमारती, मोठे रस्ते, बागा ठिकठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर शहरातील मेट्रोचा पहिला मार्ग गरवारे ते वनाज याच परिसरात सुरू झाला. मात्र कामाचे नियोजन नसल्याने कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रातील परांजपे हायस्कूल, गणंजय सोसायटी, बधाई चौक परिसरातील रस्त्याची, पदपथाची कामे वर्षभराहून अधिक काळ रेंगाळली आहेत. नागरिकांना चालतानाही त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या जागेत कचरा साठला आहे. काही ठिकाणी येथे कचरा टाकू नये अशी पाटी लावूनही तेथे कचरा टाकण्यात येत आहे.
त्यामुळे वाहतुकीच्या त्रासावर कचऱ्याची समस्या मोफत मिळाली असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
याबाबत बधाई चौकातील अखिल गणंजय मित्रमंडळाचे अध्यक्ष जितेंद्र कोंढरे म्हणाले, या परिसरातील रस्ता किमान वर्ष-दीड वर्षापासून टप्प्या-टप्प्याने होत आहे. अर्धवट रस्त्यामुळे खडी अस्ताव्यस्त पसरली आहे. त्याच बरोबर येथे कचरा साचून रस्त्यालाच कचराकुंडीचे रूप प्राप्त झाले आहे. विवेकानंद रस्त्याकडून गांधी भवनकडे जाण्यासाठीचा रस्ता अर्धवट कामामुळे वर-खाली झाला आहे. खोलगट भाग असल्याने वाहनचालकांना कसरत करत वाहने न्यावी लागतात. येथील वाहतूक कोंडीस अर्धवट रस्ताच कारणीभूत आहे.
विलंबासाठी कारणांची मालिका
कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अमोल काळे म्हणाले की, मार्च २०२२ पासून येथील रस्त्याचे काम थांबले आहे. याबाबत महापालिकेच्या पथ विभागाशी सातत्याने संवाद साधला आहे. महापालिकेकडे लेखी तक्रारही केली आहे. डिसेंबरमध्ये पथविभागाने जी-२० परिषदेचे कारण दिले होते. शहरात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या काळात शहरातील विकासकामे बंद असल्याने दुरुस्ती होऊ शकत नसल्याचे सांगितले. परिषद झाल्यानंतर मेट्रोसाठी भूमिगत वीजवाहिनी नेण्यात येणार असल्याने त्यानंतर रस्ता होईल, असे सांगितले. त्यानंतर पथविभागाला २४ फेब्रुवारी रोजी लेखी निवेदन दिले आहे. त्यात मेट्रोचे केबल टाकण्याचे काम पूर्ण झाल्याची आठवण करून दिली आहे.
प्राध्यापक सुहास शिंदे म्हणाले, रस्त्याचे काम अर्धवट असल्याने या परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होते. सकाळी आणि संध्याकाळी रहदारीच्या वेळी याची तीव्रता जाणवते. रस्त्यावर खडी पसरल्याने अपघाताचा धोकाही वाढला आहे. गेले कित्येक महिने हे काम रेंगाळलेले आहे. योग्य नियोजनाने अशी कामे केली पाहिजेत. शहरातील वाहनांची संख्या पाहता अशा कामांना प्राधान्य दिले पाहिजे.
शास्त्रीनगर परिसरातील रहिवासी कैलास मारणे म्हणाले की, बधाई चौक हा या परिसरातील रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्याचे काम वर्षभराहून अधिक काळ रेंगाळले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सकाळी अकरापूर्वी अथवा सायंकाळी पाचनंतर येथे यावे. म्हणजे येथील नागरिकांना कशा स्थितीतून जावे लागते याची त्यांना कल्पना येईल.
अमोल काळे म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून काम का प्रलंबित आहे याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे. पालकमंत्री देखील कोथरूडमध्ये असल्यावर याच रस्त्याचा वापर करतात. कोथरूडमधील बधाई चौकातील हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे. असे असताना वर्षभराहून अधिक काळ रस्त्याचे काम अर्धवट राहिले आहे. कधी पावसाळा, कधी जी-२० अशी कारणे महापालिका प्रशासनाने यापूर्वी दिली आहेत. मात्र, या कारणांची माहिती जनतेला व्हावी यासाठी इथे फलक लावला पाहिजे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.