Helpless : हेल्पलेस हेल्पलाइन...

नोंदणीसाठी दिलेल्या भाडेकरार दस्ताचे काय झाले? दस्तनोंदणी कधीपर्यंत होईल? संकेतस्थळ नीट का चालत नाही, अशा स्वरूपाच्या सेवेबाबतच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी सारथीची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. मात्र, दस्तनोंदणीचे नक्की काय झाले? ते कोणत्या स्तरावर आहे? संकेतस्थळ कधी सुरू होणार, अशा प्रश्नांची उत्तरेच हेल्पलाइनकडे नसतात.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 24 Apr 2023
  • 01:10 am
हेल्पलेस हेल्पलाइन...

हेल्पलेस हेल्पलाइन...

सारथी हेल्पलाइन घेते फक्त तक्रार, मात्र एका महिन्यानंतरही कळत नाही दस्तनोंदणीची स्थिती, केवळ इश्यू हायलाईट केल्याचे िमळते उत्तर

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

नोंदणीसाठी दिलेल्या भाडेकरार दस्ताचे काय झाले? दस्तनोंदणी कधीपर्यंत होईल? संकेतस्थळ नीट का चालत नाही, अशा स्वरूपाच्या सेवेबाबतच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी सारथीची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. मात्र, दस्तनोंदणीचे नक्की काय झाले? ते कोणत्या स्तरावर आहे? संकेतस्थळ कधी सुरू होणार, अशा प्रश्नांची उत्तरेच हेल्पलाइनकडे नसतात. केवळ ‘आपला इश्यू हायलाईट केला आहे,’ असे साचेबद्ध उत्तर दिले जाते. त्यामुळे मुद्रांक आणि नोंदणी विभागाची हेल्पलाइन हेल्पलेस झाल्याचे चित्र आहे.

मुद्रांक आणि नोंदणी विभागाकडे २०२२-२३ या गेल्या आर्थिक वर्षात ३१ मार्चच्या दुपारपर्यंत २६ लाख ४५ हजार ४१३ दस्तांची नोंदणी झाली होती. त्यातून ३७ हजार ८५ कोटी रुपयांचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा झाला, तर सुमारे दीडशे कोटींहून अधिक रक्कम घरभाडे करारातून मिळाली आहे. उत्पादनशुल्क विभागाखालोखाल राज्याला सर्वाधिक महसूल देणारा विभाग म्हणून मुद्रांक आणि नोंदणी विभागाचा क्रमांक लागतो. या विभागाने भाडेकरार दस्ताची स्थिती नेमकी काय आहे आणि इतर सेवाविषयक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सारथी हेल्पलाइन सुरू केली आहे. त्याचा क्रमांक ८८८८००७७७७ असा आहे. त्यावर फोन केल्यानंतर सेवेविषयी तक्रार नोंदवून घेतली जाते. त्याचा टोकन क्रमांक संबंधित व्यक्तीला दिला जातो. नंतर त्या तक्रारीचे काय झाले? आपल्या दस्त नोंदणीचे काय झाले, याची काहीच माहिती हेल्पलाइनकडे उपलब्ध नसते. आपला इश्यू हायलाईट केला असल्याची माहिती तेवढी दिली जाते.

सिंहगड रस्त्यावरील मान्यताप्राप्त एजंट हरिदास मेरुकर म्हणाले, ‘‘नियमानुसार घरभाडे करार २४ तासांत नोंदवला गेला पाहिजे. मात्र, तीन-चार आठवडे झाले तरी, दस्तनोंदणी होत नाही. काही दस्त तर महिना-दोन महिनेही नोंदवले जात नाहीत. आपले दस्त नोंदवले गेले की नाही, याची तक्रार सारथीच्या हेल्पलाइनकडे केल्यास टोकन क्रमांक मिळतो. मात्र, नंतर या तक्रारीचे काय झाले, याची माहिती मात्र उपलब्ध होत नाही. केवळ ‘आपला इश्यू हायलाईट केला,’ असे उत्तर मिळते... तर कधी संबंधित अधिकाऱ्याला आपली तक्रार पाठवल्याचे सांगितले जाते. मात्र, दस्त नेमका कोणत्या पातळीवर आहे, याची माहितीच उपलब्ध होत नाही. हेल्पलाइनवरील व्यक्ती नागरिकांना जी माहिती संकेतस्थळावरदेखील मिळेल तिच उपलब्ध करून देते. त्यापलीकडे संबंधित दस्ताचे काय झाले हे त्यांना माहीतच नसते.’’

हेल्पलाइन हवी मदत करणारी...

सारथीच्या हेल्पलाइनने मदतनीस म्हणून काम केले पाहिजे. केवळ तक्रार नोंदवणे आणि ती पुढे पाठवणे इतकेच त्यांचे काम नसावे. त्या तक्रारीची सोडवणूक झाली पाहिजे. त्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच दिली पाहिजे. अन्यथा आपले दस्त नोंदले का जात नाही? ते कोणत्या पातळीवर आहे, याची माहितीच मिळणार नाही. नियमानुसार घरभाडेकरार २४ तासांत नोंदवला जाणे आवश्यक असूनही प्रत्यक्षात त्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी जात असेल तर ऑनलाइन सुविधा करून उयोग काय? याबाबत मुद्रांक आणि नोंदणी विभाग तसेच राज्य सरकारकडे अनेकदा तक्रार केली आहे. मात्र, त्यानंतरही कामकाजात सुधारणा होत नाही,’’ अशा शब्दांत हरिदास मेरुकर यांनी या प्रकरणातील गांभीर्याकडे लक्ष वेधले.    

असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडरचे अध्यक्ष सचिन शिंगवी म्हणाले, ‘‘हेल्पलाइनही मदतीसाठी केली की केवळ दिखावा म्हणून, हेच समजत नाही. हेल्पलाइनमुळे नागरिकांची मदत झाली पाहिजे. उलट या हेल्पलाइनमुळे आपल्या तक्रारीचे आणि दस्तनोंदणीचे काय झाले, हे कळत नाही. इतकेच काय अनेकदा संकेतस्थळ व्यवस्थित चालत नाही. याबाबत विचारले असता त्यांच्याकडे माहिती नसते.’’ त्यांच्याकडे ना दस्ताची माहिती असते ना इतर प्रश्नांवर काही ठोस उत्तर असते. मग, सामान्य नागरिकांनी त्यांच्या तक्रारीचा माग कसा काढायचा, असा सवालही शिंगवी यांनी उपस्थित केला.

या समस्येबाबत विचारले असता मुद्रांक आणि नोंदणी विभागाचे उपमहानिरीक्षक (संगणक) अभिषेक देशमुख म्हणाले, ‘‘सारथीच्या हेल्पलाइनबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. त्यातील नेमक्या अडचणी कोणत्या आहेत, याची पडताळणी करून त्या सोडवल्या जातील.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story