संकटात पोहणाऱ्यांची घेणार मदत

यंदा पावसाळ्यात दोन वर्षांपू्र्वीप्रमाणे पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना वाचविण्यासाठी पोहता येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची, नागरिकांची यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच पवना, मुळा, मुठा, इंद्रायणी नदीपात्रामुळे शहरात कोण-कोणत्या भागात पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते याचे गुगल मॅपिंग करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Thu, 15 Jun 2023
  • 11:43 pm
संकटात पोहणाऱ्यांची घेणार मदत

संकटात पोहणाऱ्यांची घेणार मदत

पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलिसांनी केला नियोजन आराखडा, नदीपात्रातील पूरस्थितीचे गुगल मॅपिंग तयार

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

यंदा पावसाळ्यात दोन वर्षांपू्र्वीप्रमाणे पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना वाचविण्यासाठी पोहता येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची, नागरिकांची यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच पवना, मुळा, मुठा, इंद्रायणी नदीपात्रामुळे शहरात कोण-कोणत्या भागात पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते याचे गुगल मॅपिंग करण्यात आले आहे. 

सध्या बिपोरजॉय वादळ देशातील सागर किनाऱ्यावरील काही राज्यांत धडकत असून अशा वादळातून होणारी हानी मोठी असते. त्याचप्रमाणे पुण्या-पिंपरीत अनपेक्षित मोठा पाऊस झाला तर अवघड स्थिती तयार होते. त्यामुळे पाऊस, पुराच्या पाण्यात अडकणाऱ्या नागरिकांची सुटक करण्यासाठी अशावेळी कुशल मनुष्यबळ हाती असणे गरजेचे असते. त्याचीच तयारी म्हणून पोहता येणाऱ्या पोलिसांची यादी तयार करण्याचे काम सुरू असून गरजेप्रमाणे त्यांची मदत घेणे सोपे होणार आहे.    

पावसाळापूर्वीची नालेसफाई आणि अरूंद होत गेलेले नाले या प्रश्नावर कायमच पिंपरी-चिंचवडमध्ये वादंग उठले आहे. त्याचबरोबर नदीपात्रालगत झालेल्या बांधकामांमुळे दोन वर्षांपूर्वी शहरातील अनेक मध्यवर्ती भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

वाकड-कस्पटेवस्ती रस्त्यावर गुढघाभर पाणी साठले होते.  पिंपळेगुरव, सांगवी भागातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. त्याचबरोबर पुणे-बंगळुरू महामार्गावरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरल्याने रुग्णांना बाहेर काढताना बचाव पथकाला अनेक कसरती कराव्या लागल्या होत्या. एनडीआरएफला शहरात बोलावून परिस्थिती हाताळण्याची गरज पिंपरी-चिंचवडमध्ये निर्माण झाली होती.

यासगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आणि बिपरजॉय वादळाच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलिसांनी एकत्रित येत नियोजन आराखडा तयार केला आहे. शहरातील पवना, मुळा, मुठा, इंद्रायणी नदीपात्रामुळे शहरात कोण-कोणत्या भागात पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते याचे गुगल मॅपिंग करण्यात आले आहे.

आपत्तीव्यवस्थापन विभाग, एनडीआरएफ यांच्याशी समन्वय ठेवून हा आराखडा तयार करण्यात आला असून, याभागातील स्थानिकांपैकी कोणाला पोहता येते याचीही यादी तयार झाली आहे. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड पोलिसांपैकी किती जणांना पोहता येते याची विचारणा करून २५० जणांची यादी तयार करण्यात आली आहे.

या पोलीस कर्मचाऱ्यांचे निवासस्थान, नियुक्तीचे ठिकाण आणि मोबाईल क्रमांक याची यादी तयार करून, ती सर्व पोलीस ठाण्यांना पाठविण्यात आली आहे. त्याचबरोबर महापालिककडे देखील ही यादी असणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी एक रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयाच्या उपायुक्त स्वप्ना गोरे आणि सहायक आयुक्त सतीश माने यांनी या आराखड्याचे नियोजन केले आहे.

पूरपरिस्थीत निर्माण झाल्यास नागरिकांना तात्पुरत्या निवाऱ्यासाठी शहरातील महापालिकेच्या शाळा, खासगी मंगलकार्यालये, लॉन्स कुठे उपलब्ध होऊ शकतील याची चाचपणी करण्यात आली आहे.

शहरातील नदीपात्राच्या लांबी-रुंदीनुसार पाटबंधारे विभागाने आणि महापालिकेने निश्चित केलेली ‘रेड लाईन’ आणि ‘ब्लू लाईन’ तसेच या क्षेत्रात झालेली अतिक्रमण काढून घेण्यासाठी आवश्यक बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. पावसाळा तोंडावर असल्याने अशा स्वरूपाची अतिक्रमणे काढून घेण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.

नदीपात्रालगत झोपड्या नकोत

दुसरीकडे नदीपात्राला लागून असलेल्या वस्त्यांमध्ये नव्याने झोपड्या होणार नाही याची काळजी घेण्याचे विनंती पोलिसांनी महापालिकेला केली आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास सर्वप्रथम येथील नागिरकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी धावपळ करावी लागते. त्याचबरोबर येथे अनधिकृत वीजजोड घेण्यात आल्याने त्याचाही धोका निर्माण होतो. त्यामुळे जीवहानी होण्याचा धोका अधिक असल्याने यासाठी महापालिका, आपत्तीव्यवस्थापन विभाग, विद्युत महापारेषण यांच्याशी आम्ही समन्वय ठेवून आहोत अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी “सीविक मिरर”शी बोलताना दिली. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story