‘तो’ व्हीडीओ व्हॉट्सॲप स्टेटस ठेवला, युवतीला गाठून थेट धमकी

दिल्लीतील साक्षी या अल्पवयीन मुलीच्या डोक्यात २१ वार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा व्हीडीओ स्टेटस म्हणून ठेवणाऱ्या चिंचवडमधील युवतीला संपवून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 6 Jun 2023
  • 08:05 am
‘तो’ व्हीडीओ व्हॉट्सॲप स्टेटस ठेवला,  युवतीला गाठून थेट धमकी

‘तो’ व्हीडीओ व्हॉट्सॲप स्टेटस ठेवला, युवतीला गाठून थेट धमकी

दिल्लीतील अल्पवयीन मुलीच्या डोक्यात २१ वार करून हत्या केल्याच्या घटनेचा व्हीडीओ ठरला वादाचे कारण

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

दिल्लीतील साक्षी या अल्पवयीन मुलीच्या डोक्यात २१ वार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा व्हीडीओ स्टेटस म्हणून ठेवणाऱ्या चिंचवडमधील युवतीला संपवून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपवरून अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिल्यानंतर आरोपीने प्रत्यक्ष भेटून युवतीला संपवून टाकायची धमकी दिल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. आलम राजबकसावर शेख (वय २०, रा. काळाखडक, झोपडपट्टी, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी चिंचवड गावात राहणाऱ्या २३ वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे.

संबंधित युवती आणि आरोपी पूर्वी एका कंपनीत काम करीत होते. तसेच तिच्या एका मित्राचा आरोपी हा मित्र आहे. त्यामुळे आलम हा संबंधित युवतीला सोशल मीडियावर फॉलो करीत होता. दिल्लीतील साक्षी या युवतीचा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या साहिलने अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. यावेळी उपस्थितांनी मोबाईलमध्ये केलेले हत्येचे व्हीडीओ रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही फुटेज देशभर व्हायरल झाले आहे.

अनेक नेटिझन्सनी हे व्हीडीओ रेकॉर्डिंग स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केले होते. याबाबत अनेक चर्चा आणि वाद सध्या देशभरात सुरू आहे. अशातच चिंचवड गावात राहणाऱ्या २३ वर्षीय युवतीने हे व्हीडीओ रेकॉर्डिंग व्हॉट्सॲप स्टेटस म्हणून ठेवले होते. तसेच ‘मुलींनो काळजी घ्या’ असा आणि इतर संदेश असलेला मजकूरही लिहिला होता.

हे बघितल्यानंतर आरोपी आलम याने सुरुवातीला या घटनेचा राग म्हणून संबंधित युवतीला इंस्टाग्राम अकाऊंटवर अन्य एका अकाऊंटवरून अश्लील शिवीगाळ केली. तसेच ‘‘स्टेटस ठेवायचं बंद कर. नीट राहायचं आहे ना? परत मला स्टेटस दिसले ना मग मी तुला दाखवेन मी कोण आहे. बघायचं आहे का तुला मी काय करू शकतो,’’ अशी धमकी ३१ मे रोजी दिली होती.

संबंधित युवती ३ जून रोजी कंपनीत कामावर असताना आरोपी आलम याने तिला गाठले आणि हात पकडून थांबविले. त्यानंतर ‘‘मीच तुला इंस्टाग्राम वरून मेसेज केले होते. आज संध्याकाळपर्यंत तुला संपवितोच. तुम्हाला काय शिकवण आहे ते आम्हाला माहीत आहे. तू दिल्लीला होती का, तेथे काय झाले ते पाहायला? तुला आता सोडणार नाही,’’ अशी पुन्हा धमकी दिली.

व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवर ठेवलेल्या स्टेटसप्रकरणी इंस्टाग्रामवरून धमकी आल्याने अन्य राज्यातून कोणी तरी मेसेज केला असेल, असा समज करून संबंधित तरुणीने त्या धमकीकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले होते. मात्र, आलम याने प्रत्यक्ष भेटून धमकी दिल्याने संबंधित तरुणीने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. चिंचवड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित आलम याला शोधून अटक केली. चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कृष्णदेव खराडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना नेटिझन्सनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. आपण केलेल्या एखाद्या पोस्टवर जर कोणी व्यक्त होताना धमकावत असेल तर नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरील पोस्टमुळे समाजात तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी, अशा सूचनादेखील पोलिसांनी केल्या आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून विनयभंग करण्याचे अनेक प्रकार सध्या शहरात घडत आहेत. कट्टरतावाद सोशल मीडियावर ओसंडून वाहात असल्याने धार्मिक तणाव निर्माण होईल, अशा पोस्ट करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सायबर पोलिसांच्या पथकातील काही कर्मचारी पिंपरी-चिंचवड शहरातील सोशल मीडियावर होणाऱ्या पोस्टवर लक्ष ठेवून आहेत. शहरात कोणत्याही वादाला तोंड फुटणार नाही, यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

Share this story